Home > मॅक्स रिपोर्ट > जातपंचायतीच्या जाचाचे ३ कुटुंब पुन्हा शिकार, यंत्रणेला जाग कधी येणार?

जातपंचायतीच्या जाचाचे ३ कुटुंब पुन्हा शिकार, यंत्रणेला जाग कधी येणार?

जातपंचायतीला मूठमाती दिल्याच्या घोषणा होतात, पण प्रत्यक्षात आजही राज्यात अनेक ठिकाणी जातपंचायतींनी गरिबांचा जिणे मुश्किल केले आहे. रायगड जिल्ह्यातील असाच एक प्रकार आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी उघड केला होता. आता पुन्हा त्याच कुटुंबांना गावकीतील पंचांनी त्रास देण्यास सुरूवात केल्याची तक्रार केली आहे. जातपंचायतींच्या जाचाचा पर्दाफाश करणारा रिपोर्ट....

जातपंचायतीच्या जाचाचे ३ कुटुंब पुन्हा शिकार, यंत्रणेला जाग कधी येणार?
X

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवघर कोळीवाडा येथे तीन कुटुंबांना गाव पंच कमिटीकडून पुन्हा एकदा वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैफल्यग्रस्त पीडित कुटुंबांनी प्रशासनाकडून अर्ज विनंत्यांद्वारे न्यायाची अपेक्षा केली आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा तोडगा अद्याप निघालेला नाही. या जातपंचायतीचा जाच व त्रास असह्य होत असल्याने आता सहनशक्ती संपली आहे, जीवनमरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे सामूहिक आत्मदहनातून आम्ही जीवन संपविणार आहोत, असा इशारा पीडित कुटुंबांनी दिला आहे. होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असे पीडित कोळी कुटुंबीय संतापाने सांगत आहेत.

सामाजिक बहिष्कारासह गाव कमिटीचे जाचक नियम, अटी आणि शर्तीमुळे व दंडेलशाहीने रायगड जिल्ह्याची प्रतिमा खराब होत आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवघर कोळीवाडा येथे तीन कुटुंबांना गाव पंच कमिटीकडून वाळीत टाकण्याच्या धक्कादायक प्रकाराबाबत संताप व्यक्त होतोय. आपल्या कुटुंबांना गाव पंच कमिटीकडून पुन्हा वाळीत टाकल्याचा आरोप देवेंद्र मारुती कोळी आणि त्यांच्या कुटुंबांनी केला असून या पंच कमिटीची सखोल चौकशी होऊन प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

"गावातील कुणी आमच्याशी आर्थिक व्यवहार केले तर दंड आकारला जातोय , शिवाय आमच्या मुलांना गावच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी करून घेतले जात नाही. कुणालाही बोटींवर कामाला येऊ देत नाहीत, आमच्या सुख दुःखात सहभागी होत नाहीत, आमच्या बोटींवर कुणी मजूर कामाला येत नाहीत, आमची चहूबाजुंनी आर्थिक कोंडी केली आहे, असा आरोप या कोळी कुटूंबाने केला आहे. आमच्यावर बिनबुडाचे आरोप लावून समाजात नाहक बदनामी केली जात आहे. तसेच या कुटुंबातील मुले व मुलींना शिवीगाळ देखील केली जात असल्याचा आरोप केला जातो आहे. तीन कोळी कुटुंबांनी गाव पंच मंडळीकडे प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची रक्कम भरावी मगच तुम्हाला गावच्या सामाजिक, धार्मिक जडणघडणीत सामावून घेऊ असे दत्तात्रेय कोळी व प्रगती देवेंद्र कोळी यांनी सांगितले. जात पंचायतीची अघोरी प्रथा अनेक कुटुंबियांना मृत्यूच्या खाईत लोटत आहेत, बेकायदेशीर दंडात्मक कारवाईचे भय ग्रामस्थांच्या मनात असल्याने सारेच या जाचक धोरणाचे बळी ठरत आहेत, कोळी कुटुंबीयाला देखील या मरणयातना सोसाव्या लागत आहेत. जातपंचायतीच्या मनमानी कारभाराने आम्ही प्रचंड त्रस्त झाले असून आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही तिन्ही कुटुंबातील सदस्य आमचे जीवन संपवित आहोत अशी व्यथा या पीडित कुटुंबियांनी मांडली आहे.

"नवघर कोळीवाडा येथील पंच कमिटी यांचा जाच व जुलूम आता पुन्हा सुरू झाला आहे, आमच्या रेशन दुकानातून गावातील कुणी धान्य घेऊ नये, अशा सूचना गावबैठकीत देण्यात आल्या आहेत. शिवाय आमचा उदरनिर्वाह असलेली मासेमारी ठप्प व्हावी, व्यवसाय बंद होऊन कुटुंबाची उपासमार व्हावी यासाठी गावातील कोणत्याही खलाशाला अशोक कोळी व दत्तात्रेय कोळी यांच्या बोटींवर कामास पाठवले जात नाही, तसेच गजानन कोळी यांच्या टेम्पोत कुणी जाऊ नये, तसेच त्यांच्याकडून कुणीही मासे खरेदी करू नये, असे जाचक व अन्यायकारक निर्बंध लादण्यात आले आहेत, हे जगजाहीर असताना प्रशासन कारवाईची भूमिका घेत नाही, तक्रारी देऊन संपूर्ण आयुष्यभर गावात वैर राहिल आणि त्या द्वेषाने वाळीत कुटुंबियांच्या जीवाला धोका होण्याची भीती आहे," अशी शक्यता कोळी कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. यावर प्रशासनाने कारवाई करावी व पीडित कुटुंबियांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी देवेंद्र कोळी व पीडित कुटुंबांनी केली आहे.

यासंदर्भात पेणचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले की, "कोळी कुटुंबातील सदस्यांना समाजातून होत असलेल्या त्रासाबाबत सात महिन्यांपूर्वी गावकमिटी, सरकारी वकील, पीडित कुटुंबीय, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्यासमवेत गावात सामाजिक बहिष्काराचे प्रबोधन करण्यात आले व दोन्ही बाजू समजून घेऊन गाव कमिटीला समन्स देण्यात आले होते, त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला होता, आता पुन्हा कोळी कुटुंबाची तक्रार आल्याने यावर चर्चा विनिमय करू".

तर पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी सांगितले की, "कोळी समाजातील तीन कुटुंब व गावकमिटी, सरकारी वकील यांच्यासह प्रांताधिकारी कार्यालयात लवकरच बैठक लावू, व संबंधीत व्यक्तींना समन्स देऊ, व यावर तोडगा काढू". असे सांगितले आहे. मॅक्स सातत्याने या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहे.

तर पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सांगितले की, "दि.24 जून 2022 रोजी संबंधित कोळी कुटुंबीय हे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करणार असल्याचा अर्ज पेण पोलीस ठाण्यात चौकशीसाठी प्राप्त झाला आहे. यासंदर्भात कायद्यामध्ये प्रशासनाने कारवाई करण्याची तरतूद नसून सदर बाबत वाळीत कुटुंबीयांनी फिर्याद देणे आवश्यक आहे, त्यामुळे वाळीत कुटुंबियातील सदस्यांनी पंच कमिटी विरुद्ध फिर्याद द्यावी." असे आवाहन त्यांनी केले आहे.

Updated : 17 Jun 2022 3:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top