Home > मॅक्स किसान > गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा नागपूरात रास्ता रोको

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा नागपूरात रास्ता रोको

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा नागपूरात रास्ता रोको
X

मराठवाडा- विदर्भात आसमानी संकट म्हणजे गारपीटामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालेलं आहे. नागपूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी गारपिटीनं नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे तातडीनं करा आणि तात्काळ नुकसान भरपाई दया या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. आक्रमक झालेल्या गारपिटग्रस्त शेतकऱ्यांनी नागपूर-अमरावती रस्त्यावर आंदोलन सुरु केलं असून या आंदोलनात भाजपचे आमदार आशिष देशमुखही सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: येऊन नुकसान भरपाईची पाहणी करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे.

गारपीट आणि अवकाळी पावसाचा विदर्भ, अमरावती आणि बुलडाण्याला सर्वाधिक फटका

विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलडाणा जिल्ह्याला बसला आहे. चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या 10 तालुक्यातील 286 गावांमधील 32 हजार 700 हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, कांदा, फळ आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे.

अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजणगाव सुरजी आणि चिखलदरा या आठ तालुक्यातील 270 गावातील 26 हजार 598 हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे.

अकोला - जिल्ह्यातील मुर्तीजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्यातील 101 गावांमधील 4 हजार 360 हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहु, कांदा या पिकांचे नुकसान झालं आहे.

वाशिम - जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील 36 गावांमधील 8 हजार 509 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. अशा पद्धतीने एकूण 1086 गावातील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, यासंदर्भात कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यावर काय म्हटलं पाहा...

Updated : 13 Feb 2018 6:27 AM GMT
Next Story
Share it
Top