Home > मॅक्स किसान > शेतातील पैसेवारी कशी काढली जाते ?

शेतातील पैसेवारी कशी काढली जाते ?

शेतातील पैसेवारी कशी काढली जाते ?
X

मराठवाड्यातील 7281 गावांची पैसेवारी 50 पैशाच्या आत आली असल्याचे अहवाल शासनाने तयार केला आहे.आणि या आधारेच मराठवाडा दुष्काळ असल्याने सिद्ध झाले आहे मात्र ज्या पैसेवारी च्या आधारे दुष्काळ जाहीर केला जातो ती पैसेवारी म्हणजे काय आणि नेमके कशाप्रकारे ही पैसेवारी जाहीर करण्यात येते.

पैसेवारी काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक गावात एक समिती तयार करण्यात येते. प्रत्येक गावाला तेथील मंडळ अधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर समितीत तलाठी, ग्रामसेवक, सरपंच हे पदसिद्ध सदस्य असतात. तसेच शेतकरी प्रतिनिधी म्हणून एक प्रगतीशील शेतकरी व दोन अल्पभूधारक शेतकरी यांची निवड केली जाते. यात एक महिला शेतकरीचा समावेश असतो. शेतकरी प्रतिनिधीची निवड त्या गावची ग्रामपंचायत करत असते. त्यानंतर ही समिती गावातील हलकी, मध्यम व चांगली अशा प्रकारच्या शेतीची निवड करते. त्यानंतर ही समिती निवडलेल्या शेतीतील लावलेल्या पिकाची वाढ, पावसाचे प्रमाण, जमिनीचा प्रकार याची नोंद घेतात. नोंदी घेताना शेतातील प्रमुख पिकांची यात निवड केली जाते.

कापसाची नोंद घेताना दोन गुंठ्यांची जागा यात निवडली जाते, निवडलेल्या दोन गुंठ्यातील कापसाची तीन ते सहा वेळेस वेचणी केली जाते व वेचणी झालेल्या कापसाचा वजन केले जाते आणि त्यानंतर पिकाचा अंदाज काढला जातो. तर दुसरीकडे मका बाजरी ज्वारी यांची पैसेवारी काढताना या पिकांची कणसे घेतली जातात, घेतलेल्या कणसांची स्थिती आणि त्याचे वजन केले जाते आणि त्या वजनावरून पिकाची परिस्थिती आणि पैसेवारी चे अंदाज काढले जाते. त्यानंतर पहिल्यांदा ही पैसेवारी जाहीर केली जाते त्यावर आक्षेप मागवले जातात जर नागरिकांनी यावर आक्षेप घेतला तर ही समिती गावात जाऊन पुन्हा वरील प्रमाणे पाहणी करते आणि त्यानंतर अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. खरीप पिकांची पैसेवारी 15 डिसेंबरच्या आत जाहीर केली जाते.

प्रशासनाने जाहीर केलेल्या पैसेवारी वरून दुष्काळ जाहीर केले जातात. जर 50 पैश्याच्या आत ही पैसेवारी असली तर दुष्काळ समजला जातो.

''प्रत्येक गावात तेथील मंडळ अधिकारी हे तेथील पदसिद्ध अध्यक्ष असतात. पैसेवारी जाहीर करण्यासाठी गावातील काही जमिनी निवडून त्यातील पिकांची पाहणी केली जाते यात पिकांची वाढ, पाऊसाचे प्रमाण, जमिनीचा प्रकार याची नोंद घेऊन निघालेल्या पिकाचा वजन करून अंदाज बांधला जातो.आलेल्या अंदाज वरून पैसेवारी जाहीर करण्यात येते.'' असे मंडळ अधिकारी अविनाश निळेकर यांनी सांगितले आहे.

Updated : 19 Dec 2018 1:24 PM GMT
Next Story
Share it
Top