Home > News Update > सरकार झोपलं वादळग्रस्तांना सोडलं वाऱ्यावर

सरकार झोपलं वादळग्रस्तांना सोडलं वाऱ्यावर

सरकार झोपलं वादळग्रस्तांना सोडलं वाऱ्यावर
X

कोरोनाचं संकट, त्यातच 3 जूनला झालेल्या निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यातून कोकण अद्यापपर्यंत सावरलेलं नाही. रायगडसह कोकणात कोट्यवधींची वित्तहानी तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. वादळाला आता तीन महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणचे नुकसानग्रस्त, बागायतदार आणि वादळग्रस्तांना अजूनही पूर्णपणे मदत मिळालेली नाही. मदत वाटपाचा वेगही आता मंदावला असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे सरकारी मदतीसाठी अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न वादळग्रस्तांकडून उपस्थित केला जात आहे. या चक्रीवादळात राहती घरं, दुकानं, गुरांचे गोठे, झोपड्या, शेती, आदींचे मोठे नुकसान झाले. चक्री वादळामुळे १ लाख ८३ हजार घरांची पडझड झाली आहे.

११ हजार हेक्टर बागायतीचे नुकसान झाले. मच्छिमाराच्या बोटी आणि जाळ्याचेही खूप मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने वादळग्रस्तांना वाढीव मदत देण्याची घोषणा केली. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला. पण मदत वाटपाचे काम अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. तर नुकसान अधिक असून मदतीचा निधी कमी मिळत असल्याच्या अनेक तक्रारी आता समोर येत आहे.

घर, गोठे आणि झोपडी यांच्या नुकसानीसाठी २४५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या २२३ कोटी रुपयांचे वितरण आत्तापर्यंत करण्यात आले आहे. मात्र, २२ कोटी २५ लाख रुपयांची मदत वाटप होणे शिल्लक आहे. मयत व्यक्ती, जखमी व्यक्ती, कपडे भांडी यासाठी अर्थ सहाय्य देण्यासाठी २४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या पैकी १९ कोटी ५९ लाख रुपयांची मदत वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. १४ कोटी ७७लाख रूपयांचे वितरण शिल्लक आहे.

चक्रीवादळात नारळ, सुपारी आणि आंबा पिकांचे अपरिमित नुकसान झाले होते. ११ हजार हेक्टर वरील बागा बाधित झाल्या होत्या. पोटच्या मुलांप्रमाणे वाढवलेली उत्पन्न देणारी फळ झाडे जमीनदोस्त झाले. यामध्ये बागायतदार अक्षरश: उध्वस्त झाले. तर सहा हजार हेक्‍टरवरील शेतीचेही नुकसान झाले होते. आपदग्रस्त शेतकरी आणि बागायतदारांसाठी ५७ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यापैकी ४८ कोटी १७ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. ९ कोटी १४ लाख रुपये वितरित होणे शिल्लक आहे.

आपद्ग्रस्त मच्छिमारांना वाढीव मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यासाठी ९४ लाख ५३ हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ७० लाख ७५ हजार रुपयांची मदत वाटप करण्यात आली. २३ लाख ७८ हजार रुपयाचा निधी अद्याप वितरीत झालेला नाही. उरण आणि महाड तालुके सोडले तर, उर्वरित 13 तालुक्यातील घरांच्या नुकसानीसाठी, आलेल्या मदतीचे वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही.

श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, माणगाव मुरुड या पाच तालुक्यातील मदत वाटपाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे अनेक आपद्ग्रस्त अजूनही शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत. तर आलिबाग,मुरुड, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, सुधागड येथील बागायतदार अजूनही शासकीय मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये खापर बँकांवर फोडलं जात आहे.

आम्ही पैसे बँकांकडे वर्ग केले असे अधिकारी सांगतात. मग बँका महसूल अधिकाऱ्यांचे आदेश केराच्या टोपलीत टाकत आहेत... की आपलं अपयश झाकण्यासाठी बँकांना जबाबदार धरलं जात आहे, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. रोहा तालुक्यातील चिले येथील रहिवासी अनिल शिंदे यांच्या घराचे पत्रे फुटून निसर्ग वादळात त्यांच्या घराची मोठी पडझड झाली होती. ते सांगतात...

नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. तसेच निसर्ग चक्री वादळामध्ये मुरुड समुद्रकिनारी असलेल्या सर्व टपऱ्या व दुकाने यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, तीन महिन्यानंतरही शासनाकडून नुकसान भरपाई न मिळाल्याने पदमदुर्ग व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी शासनाला जागे करण्यासाठी मुरुड तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण केले.

यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी लवकरच मदत दिली जाईल. असे आंदोलनकर्ते यांना आश्वासीत केले आहे. नुकसान भरपाई कधी मिळेल? याकडे वादळग्रस्तांचे डोळे लागले आहेत. याबरोबरच दि ४,५ व ६ ऑगस्ट २०२० रोजी महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत नडगांव तर्फे बिरवाडी या गावात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली.

ही दरड माझ्या घरावर येऊन माझ्या घराचे ८० टक्के नुकसान झाले आहे.

४ महिन्या पुर्वी सुमारे सहा ते साडे सहा लाख खर्च करून दिड गुंठे जागेत हे घर मी उभारले होते. दि ५ आँगस्ट रोजी कोसळलेली दरड माझ्या घरावर येऊन पत्र्याची शेड दोन रुम मधील संडास बाथरूम, किचन रुम, बेडरूम,हॉल दरडी खाली गाडले गेले. या दोन्ही रूम मध्ये राहात असलेल्या भाडोत्रीच्या सामानसुमान फर्निचरचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे संडास बाथरूम अन्य रुम मध्ये केलेले फर्निचर व टाईल्स दरवाजे खिडक्या छप्पर याचे पुर्णतः नुकसान झाले आहे.

एकदा अर्धवट व चुकीचा पंचनामा झाला, पुन्हा योग्यरीत्या पंचनामा व्हावा. यासाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, कुणीही सहकार्य करीत नाही, असे संथगतीने काम होत असेल तर मला मदत कधी मिळणार? असा सवाल रामचंद्र पवार यांनी उपस्थित केला आहे.

सुधागड तालुक्यातील नाडसुर विभागातील ग्रामस्त हे देखील नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. पंचनाम्यात मोठी तफावत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी पाली तहसीलदार यांच्याकडे दिली आहे. योग्य भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा वादळग्रस्त ग्रामस्थांनी दिला आहे.

केंद्र सरकारच्या मदतीकडे डोळे

निसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय पथकाने पुन्हा एकदा पाहणी करून, आढावा घेतला आहे. राज्यसरकारने मदत दिली असली तरी केंद्राची मदत मिळाल्यास वादळग्रस्त व बागायतदारांना योग्य न्याय मिळणार आहे. एसडीआरएफचा निधी आला असला तरी तो पुरेसा नाही. ही बाब या पथकाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. रायगड सह राज्यातील अन्य जिल्ह्यातील नुकसानीचा फेरआढावा घेतला जात आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून निसर्ग चक्रीवादळानाग्रस्तांना मदत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

निसर्गचक्री वादळातील नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाहीत. ज्यांचे बँक खाते क्रमांक तसेच नावात चूक झाली आहे, तेच मदतीपासून वंचित आहेत. नुकसानग्रस्त वादळग्रस्त यांची पुन्हा सुधारित माहिती घेतली असून त्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे. मदत वाटपाचे काम पुढील आठ दिवसात पूर्ण केले जाईल. सर्व तहसील कार्यालयांना तशा सुचना देण्यात आल्या आहेत. अशी प्रतिक्रिया मॅक्स महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना रायगडच्या जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

Updated : 19 Sep 2020 11:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top