Home > मॅक्स रिपोर्ट > शेतकरी पाहतायत सरकारच्या नुकसानभरपाईची वाट; मदत न मिळाल्याने दिवाळी ठरली दुष्काळी

शेतकरी पाहतायत सरकारच्या नुकसानभरपाईची वाट; मदत न मिळाल्याने दिवाळी ठरली दुष्काळी

शेतकरी पाहतायत सरकारच्या नुकसानभरपाईची वाट; मदत न मिळाल्याने दिवाळी ठरली दुष्काळी
X

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात यावर्षी कधीनव्हे एवढा पाऊस झाला. त्यामुळे या दोन्ही विभागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. अतिवृष्टीमुळं मराठवाड्यात मोठे नुकसान झालं आहे. शेतीपिके, जनावरे वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. तलाव, रस्ते वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानभरपाईची घोषणा केली. सोबतच ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळायला हवी असे आदेश सुद्धा दिले. पण 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ह्या आपल्या नेहमीप्रमाणेच सरकारी यंत्रणेच्या कारभाराची सुरवात झाली, ज्यामुळे दिवाळीत शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही.
राज्यात जेव्हा सर्वत्र दिवाळी आनंदात साजरी होत केली जात होती त्यावेळी शेतकऱ्यांसाठी मात्र ही दिवाळी दुष्काळी ठरली आहे. कारण महसूल विभागाच्या भोंगळ कारभारामूळे अनेक भागात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमाच झाली नाही. महसूल विभागाने तयार केलेल्या याद्या बँकेत उशिरा पोहचल्या तर काही ठिकाणी अजूनही याद्या बँकेत पोहचल्या नसल्याने शेतकऱ्यांना दिवाळीत मदत मिळू शकली नाही.

मराठवाड्यात तब्बल 47 लाख शेतकऱ्यांचे 36 लाख 62 हजार 782 हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून मराठवाड्याच्या वाट्याला २ हजार ८२१ कोटी रुपये येणार आहेत. ज्यात जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ७ हजार ५०० रुपये, बागायतीसाठी ११ हजार २५० रुपये आणि फळपिकांसाठी १८ हजार रुपये ७५० रुपये प्रति हेक्टरी मदतीची घोषणा सरकारने केली होती.

मात्र दिवाळीचे दोन दिवस उलटले तरीही औरंगाबाद, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही मदतीची रक्कम जमा झाली नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण,गंगापूर तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहे. तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना आणखी काही दिवस नुकसानभरपाईच्या मदतीसाठी वाट पाहावी लागणार आहे.
मदतही पूर्ण मिळणार नाही....

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजमधून मराठवाड्याला ३ हजार ७६२ कोटी रुपयांची मदत मिळणार होती. मात्र आता ती ७५ टक्क्यानुसार २ हजार ८२१ रुपये मिळणार आहे. त्यामुळे ७५ टक्क्यांच्या तुलनेत पाहिले तर,जिरायती क्षेत्रासाठी १० हजार जाहीर करण्यात आल्यापैकी आता ७ हजार ५०० रुपये मिळणार आहे, तर बागायतीसाठी १५ हजारांच्या तुलनेत ११ हजार २५० रुपये मिळतीत तसेच फळपिकांसाठी २५ हजाराच्या मदती पैकी आता १८ हजार ७५० रुपयेच मिळणार आहे.

महसूल विभागाचा गोंधळ

शेतकऱ्यांना दिवाळीत मदतीपासून वंचित राहण्याची वेळ महसूल विभागाच्या गोंधळामुळे आली आहे. कारण महसूल विभागाने वेळेवर याद्या तयार केल्या नाहीत. तर अनेक ठिकाणी दिवाळीच्या एक दिवस आधी याद्या बँकांना देण्यात आल्या, त्यातच बँकांच्या खात्यावर थेट पैसे न टाकता महसूल विभागाने चेक दिले. त्यामुळे चेक क्लियर होण्यासाठी किमान दोन दिवस जाणार आहे. त्यात बँकां सोमवारपर्यंत बंद असणार असल्याने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही.

सरकारने केला टक्केवारीचा गोंधळ

विशेष म्हणजे महसूलप्रमाणे सरकारचा गोंधळ सुद्धा नुकसानभरपाईला होणाऱ्या उशीरासाठी कारणीभूत आहे. कारण सुरवातील झालेल्या नुकसानभरपाईची शंभर टक्के रक्कम देण्याचे आदेश होत, त्यानुसार महसूल विभागाने याद्या तयार केल्या होत्या. मात्र ऐनवेळी नुकसानभरपाईची रक्कम ७५ टक्के देण्याचे ठरले आणि त्याप्रमाणे याद्या दुरुस्त करून घेण्याचे आदेश आले. त्यामुळे आधीच्या याद्या रद्द करून पुन्हा नव्याने ७५ टक्क्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. यामुळे उशीर झाला आणि याद्या बँकेत उशिरा पोहचल्या.

शेतकरी म्हणतात...

दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळणार होती, मात्र ती मिळालीच नाही. शेतात यावर्षी पीकच राहिले नाही, त्यामुळे पैसे तरी कुठून येणार. त्यात १० हजाराची मदत ७ हजार ५०० रुपये केली आहे. मात्र किमान ती तरी दिवाळीत मिळाली असती तर आमची दिवाळी सुद्धा गोड झाली असती, असं औरंगाबाद जिल्ह्यातील निलजगाव येथील शेतकरी दत्तात्रय मोगल म्हणाले.

तर सरकराने घोषणा केली एक आणि देणार आता वेगळीच. त्यात दिवाळी दोन दिवसांवर आली असतांना सुद्धा मदत मिळाली नाही. आता बँक सुद्धा दोन-चार दिवस बंद राहणार आहेत.त्यामुळे खात्यातच पैसे जमा झाले नाहीतर दिवाळी कशी साजरी करणार असा प्रश्न निलजगाव येथील शेतकरी बाळू मोगल यांनी उपस्थित केला. त्यातच सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी ५० हजारांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत येताच ५० सोडा पण जी मदत जाहीर केली ती सुद्धा पूर्ण देत नसल्याचे सुद्धा बाळू मोगल म्हणाले.
विरोधीपक्षांकडून सरकारवर टीका

राज्य सरकारकडून देण्यात येत असलेल्या मदतीवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यावर बोलतांना म्हंटले आहे की, " आघाडी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ५ एक्कर मर्यादेसह एक्करी ४००० रुपयांची मदत आणि त्यापैकी दिवाळीपूर्वी ७५% (एक्करी ३००० रु.) मदत खात्यावर जमा करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात मात्र एक्करी फक्त १ हजार ८७ रुपये म्हणजे ४ एक्कर शेत असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावर ४ हजार ३५० रुपये इतकी तुटपुंजी मदत जमा केली आहे. गोड बोलून सरकारने शेतकऱ्यांची उघड उघड फसवणूक केली असून शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार, असं पवार म्हणाले आहे.

प्रशासनाची प्रतिक्रिया

शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान आमच्याकडून आम्ही सर्वच बँकांना पाठवले आहे. तामुळे त्यांच्याकडून नुकसानभरपाई वाटप करण्याची सुरवात झाली की नाही हे एकदा पाहावे लागेल. माझ्या मते काही बँकांनी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा केले असेल. पण ज्या बँकांना आम्ही चेक पाठवले आहे त्यसाठी थोडा उशीर झाला असेल. पण या बाबत महिती घेऊन मी तुम्हाला कळवतो. निखिल धुळधर, प्रभारी तहसीलदार पैठण

Updated : 2021-11-26T13:56:18+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top