अतिवृष्टी आणि त्यांनतर अवकाळी या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा कोरोनाचा संकट येऊन उभे राहिले आहे....कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. यात आठवडी बाजारपेठाही बंद ठेवण्याचा निर्णय अनेक जिल्ह्यात घेण्यात आला आहे. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय.
औरंगाबाद जिल्ह्यातील चिंचोली गावातील दिनकर कोळगे यांची साडेतीन एकर जमीन आहे. शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. खरीप हंगामात लावलेल्या कापसाला अतिवृष्टीने आणि नंतर अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने त्यांच्या हातात रुपयाही पडला नाही, त्यामुळे किमान उन्हाळी पीकातून दोन पैसे मिळतील म्हणून कोळगे यांनी एक एकरात काकडीच पीक लावलं...चांगली मेहनत घेतल्याने पीकही चांगलं आलं.. मात्र काकडी विक्रीसाठी निघाली आणि लॉकडाऊनची घोषणा झाली... त्यात आठवडी बाजार सुद्धा बंद असल्याने आता कोळगे हतबल झाले आहेत.
केंद्राच्या नवीन कायद्याप्रमाणे शेतकरी आपला माल खाजगी कंपनीला सुद्धा विकू शकतो...पण या कायद्याची शेतकऱ्यांना अजूनही माहिती नसल्याने माल विकावा कुठं असा प्रश्न कोळगे यांना पडला आहे. आता आठवडी बाजारही बंद असल्याने कोळगे आणि त्यांचा मुलगा मनोहर गावातील शिवारावर काकडी विकण्यासाठी बसतात. मात्र आठवडाभरात 500 रुपयेसुद्धा त्यांना मिळाले नाही. त्यामुळे आता शेतातील काकडी फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
कोळगे कुटुंबासारखीच अवस्था कुतुबखेडा येथील पठाडे कुटुंबाची झाली आहे. गेल्यावेळी टरबूज लावले आणि अचानक लॉकडाऊन लागले, त्यामुळे माल विकलाच गेला नाही. आता पुन्हा नव्या जोमाने दोन एकरमध्ये टरबूज लावून दोन पैसे येतील अशी अपेक्षा रमेश पठाडे यांना होती...मात्र आता आठवडी बाजारच बंद असल्याने ते हतबल झाले आहे. कोळगे आणि पठाडे यांच्यासारखीच राज्यातील अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे...आधीच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणातून स्वतःला सावरत हिमतीने कुठंतरी असा प्रयोग करायचा, मात्र त्याचवेळी कोरोनासारखं संकट छाताडावर येऊन उभा राहिल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलं आहे.