Home > मॅक्स रिपोर्ट > दोन एकर कांद्यातून पाच लाखाची कमाई

दोन एकर कांद्यातून पाच लाखाची कमाई

निसर्ग शेतकऱ्याला कधी हसवेल तर कधी रडवेल हे सांगता येत नाही.यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला असताना,अपार मेहनत करीत पावसाच्या पाण्यापासून कांद्याची जोपासना करून शेतकऱ्याने तब्बल 484 पोती कांदा पीक घेतले आहे.शेतकऱ्यांने कांदा सोलापूर येथील मार्केटला 2 हजार 600 रुपये क्विंटल भावाने विकून तब्बल 5 लाख रुपयांचे उत्पादन मिळवले आहे.या शेतकऱ्याचे नाव लक्ष्मण सोपान गरड असून ते रानमसले ता.उत्तर सोलापूर येथील रहिवासी आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...

दोन एकर कांद्यातून पाच लाखाची कमाई
X

निसर्ग शेतकऱ्याला कधी हसवेल तर कधी रडवेल हे सांगता येत नाही.यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला असताना,अपार मेहनत करीत पावसाच्या पाण्यापासून कांद्याची जोपासना करून शेतकऱ्याने तब्बल 484 पोती कांदा पीक घेतले आहे.शेतकऱ्यांने कांदा सोलापूर येथील मार्केटला 2 हजार 600 रुपये क्विंटल भावाने विकून तब्बल 5 लाख रुपयांचे उत्पादन मिळवले आहे.या शेतकऱ्याचे नाव लक्ष्मण सोपान गरड असून ते रानमसले ता.उत्तर सोलापूर येथील रहिवासी आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...



त्यांच्या या कांदा उत्पादनाची येथील परिसरात सध्या जोरदार चर्चा आहे.कांदा पीक कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणेल तर कधी चेहऱ्यावर हसू आणेल याची शाश्वती नाही.कांदा पिकाचे भाव अचानक वाढतात तर अचानक कमी होतात.याच्यामुळे कांदा पीक बेभरवशाचे समजले जाते.काही वर्षापूर्वी कांदा 20 हजार रुपये क्विंटलने मार्केटमध्ये विकला गेला होता.त्यावेळेस शेतकरी वर्गाला कांदा पिकाच्या उत्पादनातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचे समोर आले होते.त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु हा भाव जास्त दिवस राहिला नाही.काही दिवसातच भाव गडगडला होता. सध्या सोलापूरच्या मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून मार्केटमधील कांदा बाहेर काढल्याशिवाय शेतकऱ्यांचा कांदा मार्केटमध्ये घेतला जाणार नाही.त्यासाठी कांदा मार्केट एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते.कांद्याची आवक वाढत चालल्याने मार्केट कमिटीकडून पर्यायी जागेचा लिलावासाठी विचार केला जात आहे.त्यामुळे मार्केटमध्ये आलेल्या कांद्याची विक्री दररोज होणार आहे.परंतु कांद्याचे भाव जैसे थे असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुका कांदा पिकाच्या उत्पादनात अग्रेसर समजला जातो.याच तालुक्यातील लक्ष्मण गरड यांनी दोन एकरात कांद्याची योग्य देखभाल करीत तब्बल 5 लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.त्यामुळे त्यांची शेती चर्चेचा विषय ठरली आहे.

कांदा दोन महिने पाण्यात होता तरीही भरघोस उत्पन्न निघाले.

लक्ष्मण गरड यांनी बोलताना सांगितले की,कांदा पिकाची खुरपणी करून पोटँश,सुपर 24:24,10:26 तीन वेळा कांदा पिकाला टाकले.यासाठी एकरी 15 पोती खत लागला.तर दोन एकरासाठी 30 पोती खत गेला होता.कांद्याला 10 ते 12 वेळा फवारण्या केल्या गेल्या.कांदा पेरल्यानंतर साधारण 5 महिन्यानंतर काढला गेला.पावसामुळे कांदा पीक दोन महिने पाण्यात होता.पावसाचे पाणी पिकात साचल्याने त्याची वाढ खुंटली होती.त्यामुळे पाऊस उघडल्यानंतर पुन्हा त्याची वाढ सुरू झाली.पिकाला पाणी लागल्याने पीक पिवळे पडले होते.अवकाळी पावसामुळे कांदा पिकावर भरपूर प्रमाणात विघ्ने पडली होती.त्यामुळे फवारणीसाठी दुप्पट पैसे लागले.पिकावर महागडी औषधे फवारली गेली.फवारणी केली नसती तर एवढा जास्त कांदा झालाच नसता.दोन एकरात 5 लाख रुपयांचा कांदा झाला पण खर्च दीड ते दोन लाख रुपयांचा झाला आहे.या कांदा पिकाच्या विक्रीतून 3 ते साडेतीन लाख रुपयांचा फायदा झाला.कांदा सोलापूर येथील मार्केटला 2 हजार 600 रुपये दराने विकला गेला.कांद्याची एक पिशवी कमीत-कमी 50 क्विंटल तर जास्तीतजास्त 55 क्विंटलपर्यंत भरली होती.

ट्रॅक्टरच्या सहाय्याने कांदा पिकाच्या बियांची पेरणी केली

रानमसले येथील राघव गरड यांनी बोलताना सांगितले की,गेल्या वर्षी लक्ष्मण गरड यांनी शेतात ढोबळी मिर्चीचे उत्पन्न घेतले होते.त्यामुळे या जमिनीला आवश्यक असणारे NPR पूर्णपणे मिळाले.लक्ष्मण गरड यांनी कांद्याची लागण सरीवर किंवा वाफ्यावर न करता ट्रॅक्टरच्या सहाय्याने कांदा पिकाची पेरणी केली.कांदा पिकाची पेरणी सुरू असताना ते दाट सोडण्यात आले. त्यामुळे पेरणीसाठी जास्त बियाणे लागले.त्यामुळे कांद्याची संख्या वाढून आकार मोठा झाला.परिणामी कांद्याचे उत्पन्न वाढले.या शेतकऱ्याने कांदा पिकाची पहिल्यापासूनच काळजी घेतली.शेतकऱ्याची मुले दररोज शेतात जाणे-येणे किंवा नवीन लोकांसोबत चर्चा करणे,नवीन एखादी प्रॅक्टिस आली का ? त्याचा वापर कसा करायचा याबाबत चर्चा करत असत.या पिकावर महागडी व चांगल्या प्रतीच्या औषधांची फवारणी केली.त्यामुळे भरघोस उत्पन्न निघाले.



योग्य मार्गदर्शनामुळे निघाले चांगले पीक

कांदा पिकाच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे चांगले उत्पादन निघाले.माझ्या माहितीप्रमाणे चालू हंगामात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघाले आहे.चालू परिस्थितीत आणि सध्याच्या वातावरणात या कांदा पिकाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले.सुरुवातीला कांदा एक महिन्याचा झाल्यानंतर ठिबक सिंचनातून पहिल्यांदा 12:61 सोडण्यात आले.तर दोन महिन्यांच्या कालावधीत 13:40:13 ठिबक सिंचनातून सोडण्यात आले.तेथुन 8 दिवसांनी 0:52:34 आणि शेवटी कांदा फुगवण्यासाठी 0:0:50 व सिपीपीचा एक डोस देण्यात आला.कांदा काढल्यानंतर एक किलोमध्ये 4 बसत होते,म्हणजे 1 कांदा 250 ग्रॅमचा झाला होता.माझ्या माहितीनुसार गावातच नाही,तर जिल्ह्यातच कांद्याचे उत्पादन निघाले नाही.येथून पुढे असे भरघोस उत्पादन निघेल की नाही हे सांगता येत नाही.असे शेतकरी राघव गरड यांनी बोलताना सांगितले.

कांदा पिकावर पडले होते रोग

खराब वातावरणामुळे कांदा पिकावर डावऱ्या, भुरी,करपा मूळ कुज या रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता.रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा पीक तग धरणे शक्य नव्हते.योग्य निघा राखत लक्ष्मण गरड यांनी कांदा पिकाचे उत्पादन काढून दाखवले आहे.या शेतकऱ्यांला 5 लाख रुपयांचे उत्पादन झाले.पण याच्या मागे कष्ट आहे.जास्त झालेला खर्च आहे.कांदा पिकाच्या लागवडीसाठी 4 ते 5 वर्षाखाली एकरी 30 ते 40 हजार रुपये खर्च येत होता.परंतु आताचा खर्च 80 हजार ते 1 लाखाच्या आसपास गेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या बरगड्या मोडायला लागल्या आहेत.पाठीमागचा आणि आजच्या खर्चाचा ताळमेळ बसेना गेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा कणा मोडू लागला आहे.कांदा पिकाला हमीभाव मिळावा.पण ते सरकारवर अवलंबून आहे.असे तरुण शेतकरी राघव गरड यांना वाटते.



सोलापूरात वाढली कांद्याची आवक

कांद्याचे भाव अचानक कमी होतील या भीतीपोटी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांदा काढणीला वेग आला आहे.सोलापूर येथील मार्केटला दररोज कांद्याची आवक वाढली असून हजारो टन कांदा मार्केटला येऊ लागला आहे.त्यामुळे कांदा पडून राहू लागला आहे.कांदा लिलावसाठी जागा अपुरी पडू लागल्याने जागेची शोधाशोध सुरू असून लिलावसाठी जागा मिळाली असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.कांद्याची आवक वाढल्याने मार्केटमधील कांदा बाहेर काढण्यासाठी मार्केटला एक दिवसाआड लिलाव केला जाऊ लागला आहे.लिलाव थांबू लागल्याने मार्केट यार्डला कांद्याने भरलेल्या ट्रक, टेम्पो,पिकअप व इतर वाहनांची रांग लागलेली दिसते.त्यामुळे यावर उपाययोजना करण्यात येऊ लागली आहे.


https://fb.watch/aYTEqcgrZh/




Updated : 4 Feb 2022 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top