Home > मॅक्स रिपोर्ट > वहिवाट रोखल्यानं शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ

वहिवाट रोखल्यानं शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ

वहिवाट रोखल्यानं शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ
X

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढतोय, अशातच येथील जमिनीला सोन्याचा भाव आलाय.नवनवीन प्रकल्प , इमारती उभारताना गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ बसली जाते, शेतकरी पुरता उध्वस्त होतो, मात्र त्याच्याकडे ना प्रशासन पाहते, ना धनधांडगे, असाच प्रकार रायगड जिल्ह्यात घडला आहे. पेण तालुक्यातील वडखळ येथील मागासवर्गीय समाजाचे असणारे शेतकरी सुभाष गायकवाड यांच्या शेतजमिनीत जाण्यासाठी पूर्वापार असणारा रस्ताच न राहिल्याने त्यांना आपल्या शेतात नांगर, ट्रॅक्टर अथवा इतर शेतीची अवजारे नेता येत नसल्याने त्यांना आपल्या शेतजमिनीत कोणतेही पीक घेता आले नाही. त्यामुळे त्यांची शेतजमीन गेली १० वर्षांपासून ओसाड बनली असून शासन दरबारी देखील या शेतकऱ्याला न्याय न मिळाल्याने या शेतकऱ्यावर अक्षरशः आत्महत्या करण्याची पाळी आली आहे.

सदर परिस्थितीची माहिती ग्रामपंचायत, तलाठी, मंडळ अधिकारी ते तहसीलदार यांना दिली असताना देखील या शेतकऱ्याला अद्याप न्याय मिळाला नाही. या शेतकऱ्याच्या सभोवताली असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन परप्रांतीयांना विकली असून या ठिकाणी चार चार मजली इमारती, गॅरेज, दुकानांचे गाळे बांधले असून या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी पूर्वापार बैलगाडी जाण्यासाठी असणारी वहिवाटच ठेवलेली नाही. तसेच या शेतकऱ्याच्या समोरच्या जागेत ज्या चार मजली इमारती बांधल्या आहेत त्याचे बांधकाम करताना शासन नियमांचे उल्लंघन केलेले दिसून येत आहे. कारण कोणतेही बांधकाम करताना कोणाच्याही जागेत अतिक्रमण होता कामा नये तसेच शेतकऱ्याच्या जागेत जाणारी वहिवाट सोडून बांधकाम करावयाचे असते असे शासकीय नियम आहेत.

परंतू वडखळ ग्रामपंचायत प्रशासनाने देखील हे शासन नियम पायदळी तुडवित डोळे मिटून अशा बेकायदेशीर बांधकामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे मला शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ताच न राहिल्याने शेतजमीन असतानाही मी शेती पिकवू शकत नाही अशी माझी विदारक आणि अन्यायकारक परिस्थिती करून ठेवल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. तसेच माझ्या शेताला लागून ज्या इमारती बांधल्या आहेत त्यांचे सांडपाणी, मलविसर्जन माझ्याच शेतात सोडले जात आहे. तसेच या ठिकाणी असणारा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह देखील अडवला असल्याने या नाल्याचे पाणी माझ्या शेतात येऊन साचले आहे.

त्यामुळे एकेकाळी भरघोस पिकाचे उत्पन्न देणारी सोन्यासारखी जमीन आज कवडीमोल भावाची बनली आहे. सदर परिस्थितीची माहिती ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार, प्रांत कार्यालय ते जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी देऊनही मला न्याय मिळाला नाही. तर एकीकडे माझी अर्धी शेती ही रेल्वेमध्ये संपादित झाली असून शासनाकडून मला प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला देखील दिलेला नाही. त्यामुळे माझी दोन्ही बाजूकडून कोंडी झाली असून तोंड दाबून बुक्क्यांचा मार द्यावा अशी अवस्था माझी बनली असून मला जर प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही तर शासन दरबारी जाऊन माझ्या परिवारासह आत्महत्या करेन असा इशारा या मेटाकुटीला आलेल्या त्रस्त शेतकरी सुभाष गायकवाड व कुटुंबियांनी दिला आहे.

यासंदर्भात आम्ही पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की सदर शेतकरी यांनी आमच्याकडे केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने पेण तहसीलदार यांच्या माध्यमातून लवकरच बैठक लावू, शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन त्यांना जलद न्याय देण्याच्या दृष्टीने प्रशासन सकारात्मक भूमिकेत काम करेल, कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, शोषण होणार नाही याची पुरेपूर खबरदारी आम्ही घेऊ, सदर प्रकरण आम्ही गांभीर्याने हाताळू, असे प्रांताधिकारी इनामदार यांनी सांगितले.


Updated : 2021-11-25T20:17:31+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top