Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : बैलगाडा शर्यती सुरू करण्याची मागणी कशासाठी?

Ground Report : बैलगाडा शर्यती सुरू करण्याची मागणी कशासाठी?

राज्यात बंदी असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. पण कोर्टानं घातलेली बंदी उठवण्याच्या मागणीसाठी शेतकरी एवढे आक्रमक का आहेत, याचे कारण काय, याचा शोध घेणारा आमचे प्रतिनिधी राजाराम सकटे यांचा ग्राऊंड रिपोर्ट.

Ground Report : बैलगाडा शर्यती सुरू करण्याची मागणी कशासाठी?
X

बैलगाडा शर्यती ह्या महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने खेळल्या जात होत्या....पण शर्यतींमध्ये बैलांचा अनामुष छळ होतो अशी तक्रार करत काही प्राणी प्रेमींनी कोर्टात धाव घेतली आणि या शर्यतींवर कोर्टाने बंदी घातली. पण आता बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी मागे घ्यावी अशी मागणी राज्यातील ग्रामीण भागातून आक्रमकपणे होऊ लागली आहे. यासाठी दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यभरात विविध शेतकरी संघटनांनी तीव्र आंदोलने देखील केली. एवढेच नाही तर बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली गेली नाही, तर मंत्रालयात बैलगाडीसह घुसू असा इशारा काही नेत्यांनी दिला आहे.



बैलागाडा शर्यतीसाठी शेतकरी नेते, संघटना आणि कार्यकर्ते एवढे आक्रमक का झाले आहेत...याचा शोध मॅक्स महाराष्ट्रने प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी बोलून घेण्याचा प्रयत्न केला. या शोधात बैलगाडा शर्यतींमागच्या अर्थकारणाचा संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या बैलगाडा शर्यतींमुळे बैलांना लाखो रुपयांच्या घरात किंमत मिळत होती. पण आता या शर्यतीच बंद झाल्या आहेत. शेतीमध्ये बैलांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे बैलांना आता खरेदीवार जास्त पैसे द्यायला तयार नसतात. काही जण तर बैलाची कत्तल करण्यासाठी खरेदी करत असल्याचेही एका शेतकऱ्याने सांगितले. शेतांमध्ये काळानुरुप ट्रॅक्टरचा वापर वाढला. त्यामुळे बैलांचा वापर कमी झाला. आता बैलांसाठी दिवसाला हजार रुपये खर्च करावा लागतो. पण त्यातून मोबदला काहीच मिळत नाही. काही लोक बैल फुकट मागत असल्याचेही तासगावचे शेतकरी शुभम सुहासे यांनी सांगितले.




त्यामुळे सरकारने बैलांचा समावेश पाळीव प्राण्यांच्या यादीत करावा तसेच बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. तसेच बैलांचा छळ होणार नाही यासाठी निर्बंध घातले तर ते पाळण्याची तयारीही शेतकरी दाखवत आहेत, असे राहुल शिंदे यांनी सांगितले.



बैलगाडा शर्यती ह्या केवळ मनोरंजनाचे नाही तर शेतकऱ्यांच्या अर्थकारणचा देखील आधार होत्या. शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने बैलांचा वापर कमी झाला आणि बैल नामशेष होईल या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. त्यात बैलगाडा शर्यतींना बंदी आहे. त्यामुळे बैलांचे मार्केट डाऊन झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने आणि कोर्टाने योग्य निर्णय घेण्याची विनंती शेतकरी करत आहेत.

Updated : 16 Aug 2021 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top