Home > मॅक्स रिपोर्ट > महिला राजकारणी होणे सोप्पं असतं का?

महिला राजकारणी होणे सोप्पं असतं का?

पाठबळ नसताना राजकारणात वावर आणि पावर दाखवणाऱ्या महिला नक्की कशा घडतात? कसा असतो त्यांचा संघर्ष? वाचा मॅक्स महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

महिला राजकारणी होणे सोप्पं असतं का?
X

देशात राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या क्षेत्राला असतो? अर्थात राजकीय क्षेत्रातील लोकांना. कारण राजकीय नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद या इतर सर्व क्षेत्रावर पडत असतात. थोडक्यात Decision Making चं काम हे राजकीय लोक करत असतात. आता हे राजकीय लोक कोण असतात? नाही म्हणजे कोण असतात म्हणजे अर्थात... पुरुष मंडळीच...

महाराणी नावाची एक वेबसीरीज सोनी लाईव्हवर खूप गाजली. त्यामध्ये एक महिला जेव्हा मुख्यमंत्री होते आणि ती राज्याच्या विधानसभेत जाते. तेव्हा ती विधानसभेला... 'कसली विधानसभा ही तर मर्द सभा' म्हणत महिलांच्या प्रतिनिधीत्वावर चपखल पणे बोट ठेवते.

मात्र, आपल्याला कधी हा प्रश्न का पडला नाही. 1960 पासून आत्तापर्यंत 11 कोटी जनतेमध्ये 50 टक्के असलेल्या महिला वर्गाला राज्याचं मुख्यमंत्री पद का मिळालं नाही. याची नक्की कारण कोणती?

आपल्या देशात महिलांचा राजकीय क्षेत्रातील वावर आणि पावर कमी का असतो?

अपघाताने राजकारणात आलेल्या महिला... आजही राज्यात महिला राजकारण्यांची संख्या किती आहे. राज्यातील अनेक महिला त्यांचे वडील, सासरे, नवरा राजकारणात असल्यामुळे राजकारणात आल्याचं पाहायला मिळतं. मात्र, प्रस्थापितांच्या या पुरुष प्रधान राजकारणात सर्वसामान्य घराण्यातून येणाऱ्या महिलांना राजकारणात संधी मिळते का?

महाराष्ट्रात एकूण ८ महिला खासदार आहेत. त्यांच्या मागे राजकीय पार्श्वभूमी आणि पाठबळ असं दोन्ही पाहायला मिळतेय. तर महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण महिला आमदार २४ आहेत. यापैकी अनेक महिलांना राजकीय पार्श्वभूमी आहे. बोटावर मोजता येतील इतक्याच महिलांना राजकीय पार्श्वभूमी नसताना त्या उभ्या राहिल्या? असं का होतं. महाराष्ट्रातील मतदारांना महिला लोकप्रतिनीधी चालत नाही की, राजकीय पक्ष महिलांना प्रतिनिधीत्व देत नाहीत? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.

या सर्व प्रश्नांचा वेध घेण्यासाठी नव्यानं राजकारणात आलेल्या आणि मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वत:चं मोठ्या पक्षामध्ये स्थान निर्माण करणाऱ्या महिला राजकारण्यांचा संघर्ष आम्ही जाणून घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर सांगतात की,


एक महिला म्हणून काम करत असताना निश्चितच या समाजात चॅलेंज आहे. हे चॅलेंज स्विकारत काम करता आलं पाहिजे. कॉलजेमध्ये असताना कमी वयातच मला राजकारणात काम करण्याची संधी मिळाली. मी जिल्हा परिषद निवडणुक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेस युवतीचं काम सध्या मी पाहत आहे. मला कुठलही राजकीय पार्श्वभूमी नाही. घरातून कधीच कुणी राजकारणात नाही अशा परिस्थितीत एक मुलगी म्हणून राजकारणात काम करणं माझ्यासाठी चॅलेंजिंग होतंच. परंतु या सगळ्यात मला असं जाणवलं की तुम्ही प्रचंड मेहनती, जिद्दी आणि चिकाटीने हातात घेतली आणि तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल. तसेच आव्हानांचा धीरोदत्तपणे सामना करण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे. राजकारणात कुठलीही पार्श्वभूमी आणि पाठबळ नसलेल्या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु तिने स्वतःला सिद्ध केलं पाहिजे स्वकर्तृत्वावर पुढं गेलं पाहिजे.

राजकीय पार्श्वभूमी नाही म्हणून महिलांना स्थान दिलं जात नाही. अशी जी काही ओरड समाजात होते यावर सक्षणा सलगर म्हणतात की, राजकीय पार्श्वभूमी नसणं हा काही दोष नाही स्वत:ला सिद्ध करता आलं पाहिजे. अनेक अडचणी, संकट येत असतात विशेषत: महिलांच्या आयुष्यात हे काही नवीन नाही परंतु संकटातूनच तुम्ही उभे राहू शकता हे ही तिकचं खरं आहे असं मतं सलगर यांनी व्यक्त केलं आहे.

तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या मुलींनी ही राजकारणात आपला पावर दाखवला पाहिजे असं म्हणत शिवसेनेच्या शर्मिला येवले यांनी त्यांची राजकारणातली एन्ट्री आणि येणाऱ्या समस्या सांगितल्या आहेत.

शर्मिला येवले सांगतात की,


माझं शिक्षण बीएससी अॅनिमेशन, एमए झालं असून एनएसडब्लूचे शिक्षण घेत आहे. टीव्ही चॅनेल एका डिबेट शो मधून माझ्या संघटनेची वाटचाल सुरु झाली आहे. त्याआधी मी सक्रीय नव्हती. ज्यावेळी मला चळवळीत आणि राजकीय पक्षात येण्याची ऑफर दिली. त्यावेळी मी सांगितलं की, तुमच्या संघटनेत किंवा राजकीय पक्षात फक्त आक्रमक चेहरा म्हणून येण्यात मला रस नाही. मला जर तळगळापर्यंत काम करू देणार असाल तर मी इच्छुक आहे.

त्यावेळी मला त्यांच्याकडून तुम्ही स्वतंत्रपणे काम करा, आमच्या पक्षाचा तुम्हाला पाठिंबा आहे असं सांगितलं. त्यानंतर शेतकरी आंदोलनातून माझा सहभाग वाढत गेला. आणि दररोज नवीन एका प्रश्नावर बोलायचं असं मी ठरवलं. शिक्षण सुरु असतानाच माझा असा दिनक्रम सुरु झाला. त्यावेळी लोकांनी असा प्रश्न उपस्थितीत केला की, तू शेतकऱ्याची मुलगी आहेस, अभ्यास सोडून तू राजकारणाकडे का वळतेय? तर माझं त्यांना असं उत्तर होतं. की, घराणेशाहीचं राजकारण महाराष्ट्रात आपण आता पर्यंत पाहत आलोय...

सर्वसामान्यांच्या चेहऱ्यांना कुठेच संधी नाही. त्याही व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या मुलांना कुणीही पुढे घेत नाही. माझ्या आई वडील जर मुलींला समाजासाठी काम करण्यासाठी मुभा देत असतील. तुम्ही-आम्ही बोलण्यापेक्षा ती मुलगी आणि तिची आई वडील हा एकच दुवा महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला माझं नेतृत्व सिद्ध करायचं असल्यामुळे मला राजकारणात यायचं आहे. मला जर विद्यार्थ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर ते रस्त्यावर उतरूनच मार्गी लावावे लागतील. जो पर्यंत रस्त्यावर उतरत नाही तो पर्यंत हे प्रश्न मार्गी लागत नाही.

२०१५ ला मी राजकारणात सक्रीय झाली. स्वाभिमानी संघटनेत उपाध्यक्ष पदावर मी कार्यरत होते. त्यावेळी मला फारसं समजत नव्हतं. लोकांपर्यंत कसं पोहोचावं, जनसंपर्क कसा वाढवावा. या सगळ्या परिस्थिती स्वतःला कसं सिद्ध केलं पाहिजे. हे सगळं माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. ज्यावेळी मी रस्त्यावर उतरले त्याची मीडियाने दखल घेतली आणि एका शेतकऱ्याच्या मुलीच्या मागे कुणी तरी उभं राहतं. मग ती लोक असो किंवा प्रसारमाध्यमं असो त्यावेळेस कुठेतरी नेतृत्व विकसित होत जातं.

घराणेशाहीच्या राजकारणाला अमुकांची सुन, मुलगी, पत्नी म्हणून प्रसिद्धी मिळते किंवा संधी मिळते. परंतु लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं. त्यावेळेस फक्त आपली भूमिका आपला निर्णयाची प्रशासनाला दखल घ्यावीच लागेल. असा आत्मविश्वास माझ्याकडे होता. म्हणून माझ्या कार्याची दखल घेतली गेली. माझं नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मला प्रसारमाध्यामामुळे मिळाली. त्यामुळे आपसुकचं माझं वलय ग्रामीण भागात तयार झालं. ही शेतकऱ्याची मुलगी आहे. शहरात राहून ती आपल्या प्रश्नांसाठी लढतेय.

२०१९ ला मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर भयंकर ट्रोल झाली. त्यावेळी मी एकच सांगितलं ट्रोलिंग करणं हा तुमचा गुण आहे माझा नाही. तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही काय करावं? काय बोलावं? हा तुमचा भाग कदाचित तुमच्या घरात आई बहिण नाही. त्यामुळे तुम्ही महिलांना अशी भाषा वापरता.

दरम्यान, घराणेशाहीतून आलेल्या अनुराधा पेरे यांनी आपल्या पराभवाबद्दल मॅक्समहाराष्ट्रशी बातचीत केली आहे.


औरंगाबादमधील पाटोद्याचे आदर्श सरपंच म्हणून ओळख असलेले भास्करराव पेरे आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. यांच्या कन्या अनुराधा पेरे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभ्या राहिल्या होत्या, परंतु त्यांना जनतेच्या दरबारात पराभव पत्कारावा लागला. या संदर्भात देखील आम्ही त्यांच्याशी बातचीत केली.

यावर अनुराधा पेरे, सांगतात की, माझं शिक्षण १२वी झालेलं आहे. गेली २५ वर्ष आदर्श सरपंच म्हणून माझे वडील भास्करराव पेरे यांची ओळख असली तरी माझ्यावर जनतेनं तेवढा विश्वास नाही दाखवला किंबहुना माझा तेवढा जनसंपर्क नाही म्हणून कदाचित मला अपयश आलं.

ग्राऊंड लेवलवर महिलांचा राजकारणातील सहभागाविषयी बोलायचं झालं तर, जरी महिला निवडून आल्या तरी त्यांना निर्णय प्रक्रियेत घेतलं जात नाही. त्यांच्या घरातलेचं निर्णय घेतात. त्या फक्त सह्यापूर्ती मर्यादित असतात. ग्रामीण भागात महिला उभं राहणं म्हणजे सर्वात आधी तिचं राहणीमान, बोलणं, वागणं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. माझ्या पराभवानंतर हेच लक्षात येत की, स्त्रियांचं नेतृत्व या समाजाला अजूनही मान्य नाही. त्यांचे निर्णय समाजाने अजूनही स्विकारलेलं नाही. आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या महिलांना समाज लोकप्रतिनिधी म्हणून स्विकारतोच असं नाही. महिलांचं नेतृत्व उभं राहण्यासाठी गावपातळीवर आम्ही महिलांना आर्थिकदृष्या आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उपक्रम हाती घेतले आहे. कारण जोपर्यंत महिला आर्थिकरित्या सक्षम होत नाही. तोपर्यंत हा समाज त्यांच्याकडे त्याच नजरेनं पाहणार आहे.


राजकाराणात महिलांना ट्रोलिंगचा खूप मोठा सामना करावा लागतो यामध्ये कधी नैराश्य ही येतं अशा वातावरणात आपलं राजकीय वलय कसं केलं ? यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे युवती अध्यक्ष संध्या सोनावणे सांगतात की,


राजकारणाकडे मी करिअर म्हणून पाहते. विद्यार्थी संघटनेतून माझी वाटचाल ही राजकारणाकडे झालेली आहे. राजकारणात प्रस्थापित लोकांचं वर्चस्व असलं तरी त्यात एक गोष्ट आहे महिला म्हणून कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तुमची बौध्दिक पातळी, वैचारिक क्षमता आणि खूप काम करण्याची इच्छा असली तर आपणही स्वत:चं वलय तयार करू शकतो.

या एका कारणामुळे माझं राजकारणात करिअर बनवण्याचं स्वप्न सुरु झालं आणि यासाठी मी राजकारणात आले. परंतु मुलगी आणि विस्थापित म्हणून काम करताना अनेक अडचणी येत असतात. त्यापुढे प्रस्थापित लोकांना वारंवार स्वत:ला सिद्ध करावं लागतं. त्याच्या १० पट्टीने आम्हाला स्वतःला दररोज इथे सिद्ध करावं लागतं.


त्यामुळे महिलेला किंवा मुलींना राजकारणात करिअर करायचे असेल किंवा एक उंची गाठायची असेल तर त्यांना दररोज आपल्याला कामात सातत्य ठेवणं गरजेचं आहे. कारण कामात सातत्य नसलं की तुम्हाला नैराश्य येतं, आपण हे का करतोय? आपल्या पाठीशी कुणी नाही असे विचार मनात येतात.

त्यामुळे स्वतःलाच संधी निर्माण करावी लागते. कारण राजकारणात कुठलीही गोष्ट आपोआप मिळत नाही. मला संधी मिळावी म्हणून मी सातत्याने काम करते, जशी मी संधीच्या शोधात आहेत. त्याचप्रमाणे कुणी तरी एखाद्याला संधी देण्याच्या शोधात असतो. त्यामुळे मी माझं काम जिद्दीने करत राहील. कुणी तरी आपल्या कामाची दखल घेईल. त्यामुळे नैराश्यात न जाता सक्रीय असणं महत्त्वाचं आहे.


राजकारणात महिलांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यात स्वतःचं वलय कसं तयार करावं?



राजकारणच नाही तर अनेक क्षेत्रात महिलांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. मुलगी म्हणून समाजात वावरताना, काम करताना या कुणाशी बोलतात, काय कपडे घालतात, काय खातात, कुठे फिरतात, एकंदरित आपल्यावर अनेकांच्या नजरा असतात. आणि फक्त एखाद्या शाब्दिक चूकीवरही लोकं फार भयंकर पद्धतीने ट्रोल करतात. अश्लील भाषेचा वापर करतात. हे फक्त राजकारणात होत नाही तर अनेक क्षेत्रात होतं असतं. अनेक महिला पत्रकार, अधिकारी इ. महिलांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे याकडे लक्ष न देता आपल्याकडून कुठलीही चूक होऊ न देता आपण आपल्या कामावर फोकस केलं पाहिजे. असं संध्या सोनवणे सांगतात..

राजकारणात नव्यानं येणाऱ्या तरुणींचे मत जाणून घेतल्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आपला वावर आणि पावर कसा तयार केला? यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली...

डॉ. निलम गोऱ्हे सांगतात की,


राजकारण मी आल्यानंतर सर्वात प्रथम मला सामाना करावा लागला तो म्हणजे सामाजिक इच्छाशक्तीचा...स्त्रीला समाजामध्ये जे दुय्यम स्थान आहे ते बदलण्यासाठी, स्त्रियांना मतदार म्हणून जागृक करण्यासाठी १९८० सालापासून ते १९९४ पर्यंत म्हणजे १४ वर्ष मी काम करत होते. ते काम करत असताना त्या कामाची दखल विशेषत: कायदे बदलामध्ये त्यावेळेच्या सरकारानी घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. महिला धोरण असेल किंवा केंद्रीय पातळीवरती चौथं महिला संमेलन असेल. त्यावेळेचं केंद्र सरकार, विविध एजेन्सी, संशोधन केंद्र, विद्यापीठं यांच्या एकत्रित प्रयत्नामधून सुद्धा मला कामाची चांगली संधी मिळाली. १९९८ साली मी शिवसेनेत सहभागी झाले. सुरुवातीच्या काळात काम कुठलं करायचं याची दिशा मिळणं गरजेचं असतं. परंतु ती दिशा मिळाल्यानंतर सातत्याने हे काम करत असताना चार ही स्तंभांचा कामासाठी उपयोग झाला. अडचणी स्त्री-पुरुष दोघांनाही येत असतात. आपल्या कामावर फोकस असला पाहिजे विरोध तर होत असतो. त्यामध्ये एकदा का तुम्ही गुरफटून गेले की मानसिक शक्ती आणि बाकीचे श्रम वाया जातात. आणि कुणी केलेल्या विरोधाला आपल्या कामामधूनच जास्त बोलकं व्हावं असा माझा प्रयत्न असतो... अर्थात प्रवक्ता म्हणून काम करत असताना बोलण्याचं आणि अभ्यासही खूप झाला. समाजामध्ये बदलतं स्त्रियांचं स्थान आहे त्यांच्याबरोबर नातं टिकून राहिल्यामुळे समाजाच्या प्रवाहाबद्दल सातत्याने तुम्ही अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी काम करणं तुम्हाला होऊ शकतं.

स्त्री ला प्रतिनिधित्व का नाकारलं जातं?


समाजामध्ये स्त्रीचं काम जे आहे त्याबद्दल आजही पूर्वीच्या ज्या श्रमविभागणी होत्या त्या अधिक घट्ट आहेत. आणि त्यामध्ये स्त्रीची मुख्यत: जबाबदारी ही कुटुंब आणि मुलं जन्माला घालणारी आणि त्यांचं संगोपन करणं हीच आहे. असं समाजात मानलं जातं आणि एका बाजूला स्त्रीला सर्व दृष्ट्या शारीरिक, मानसिक, वैचारिक, बौद्धिक ही तिची क्षमता कशी आहे हे गेले दीड वर्षापासून समोर आलेलं असताना आणि त्याच्या पूर्वी देखील स्त्रियांनी स्वत:चं कर्तृत्व सिद्ध केलेलं असतानाही. ती समाजातील बहुतांश पुरुष वर्गाला असोयीस्कर रचणारं आहे. त्याबरोबर बदलेल्या समाजामध्ये श्रमाबरोबर इतर अनेक जी कौशल्य, संशोधन असतात ते निभावणं असे अनेक क्षेत्रात स्त्रियांनी काम केले आहे. समाजामधले हितसंबंध आडवे आल्यानं स्त्रीला प्रतिनिधित्व नाकारलं जातं. हे महत्त्वाचं कारण वाटतं.

राजकीय पार्श्वभूमी नसताना महिला म्हणून उभं राहणं अवघड आहे. परंतु सामाजिक चळवळींची पार्श्वभूमी आणि सातत्याने काम करत राहणं. यामधूनचं जनतेची चांगल्याप्रकारे सेवा करू शकता. यामधून जी संधी मिळावी लागते ती संधी बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाने मला संधी उपलब्ध करून दिल्यामुळे मला राजकारणात उभ राहणं शक्य झालं. समाजामध्ये अदृश्य असणाऱ्या स्त्रियांच्या कामाची दखलपण शिवसेनेनं घेतली आहे.


दरम्यान, नव्यानं राजकारणात महिला पाऊल टाकत असताना पूर्वीच्या काळात महिलांचं राजकारणात अस्तित्व कसं होतं आणि सध्या महिला राजकारण काय आहे यावर राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात की,



स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा महात्मा गांधी यांच्यामुळे महिला मोठ्याप्रमाणावर आल्या. स्वातंत्र्याच्या काळापासून पाहिलं तर ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत राजकीय प्रतिनिधित्व महिलांना अतिशय कमी प्रमाणात मिळालेलं आहे. नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात राजकुमारी कौर या मंत्री होत्या. केंद्राच्या, राज्याच्या मंत्रिमंडळात आणि पक्षपातळीवर महिलांचा सहभाग फार कमी प्रमाणात राहिलेला आहे.

स्थानिक स्वराज संस्थेमध्ये महिलांना राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर केवळ महिला दाखवायच्या आहेत म्हणून त्यांचा निवडणुकीत उभं केलं जातं आणि त्यांच्या मागे पुरुषांची मक्तेदारी पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर विविध पक्षात महिला आघाडी असते. परंतु त्यांना ठराविक मुद्द्यांवर बोलायला आणि विषयांवर आंदोलन करण्याची संधी दिली जाते.

महाराष्ट्रातील राजकारण पाहिलं तर प्रामुख्याने उच्चवर्गातील महिला किंवा सदोनोवर्गातील महिलांना जास्त वाव मिळतो. आर्थिकरित्या सक्षम आणि उच्च जातीतल्या नसलेल्या महिलांना फार कमी प्रमाणात संधी दिली जाते. मुळातच असा निकष लावला जातो की महिला या निवडून येऊच शकत नाही. त्यामुळे आधी इलेक्टीव्ह महिलांना बघितलं जातं आणि मग तिकिट दिलं जातात. वास्तविकता महिला भरघोस मतांनी निवडून येऊ शकतात असं अनेक महिलांनी सिद्ध केलेलं आहे. परंतु आजही राजकीय पक्षामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं स्थान नसतं.

सुप्रिया सुळे किंवा प्रियंका गांधी या महिला नेत्या घराणेशाहीतून आलेल्या आहेत. पक्षांच्या पातळीवर सुद्धा पक्षांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग कमी असतो. आणि ज्या महिला आहेत त्यांना महिला व बालकल्याण खातं त्यांनी सांभाळावं किंवा महिला अत्याचार, त्यांची प्रश्न यावर त्यांनी बोलावं आंदोलनं करावं अशी अपेक्षा केली जाते. त्याच्यापलीकडे राजकीय निर्णय प्रक्रिया असते त्यात महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी महत्त्वाचं स्थान दिलं जातं आणि ही दुर्देवाची गोष्ट असून सर्व पक्षात अशीच स्थिती आहे असं मला वाटतं. असं मत हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे. एकंदरीत महिलांना आता राजकारणात संधी तर दिली जाते. मात्र, अजुनही महिलांबाबत राजकारणात समता आल्याचं पाहायला मिळत नाही.

प्रियंका आव्हाड

Updated : 31 Aug 2021 1:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top