Home > मॅक्स रिपोर्ट > उपेक्षितांचा नायक मृत्यूनंतरही गावकुसाबाहेरच

उपेक्षितांचा नायक मृत्यूनंतरही गावकुसाबाहेरच

दलितांच्या वंचितांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडणारे ज्येष्ठ साहीत्यिक शंकरराव खरात यांच्या निर्वाणाला वीस वर्षे उलटली तरी खरातांचे स्मारक होऊ शकले नाही.. आता तरी शंकरराव खरातांचे स्मारक बनवा साहित्यिकांचा सरकारला सांगावा सांगणार सागर गोतपगार यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

उपेक्षितांचा नायक मृत्यूनंतरही गावकुसाबाहेरच
X

मुंबईवरून आलेले पत्र वाचण्यासाठी रामा खरात गावात मास्तराच्या घरात जातात. दोन ओळींचे पत्र वाचून घेण्यासाठी मास्तर त्यांच्याकडून लाकडे फोडून घेतो. लाकडे फोडून झाल्यानंतर मास्तर त्यांना विचारतो " आरं रामा तुझी बहिण मुंबईला होती का ? हो हुती, मावस भण धोंडाबाई. अगदी घरातल्यावानीच. मास्तर सांगतात " तिला देवाज्ञा झाली. आरे देवा माझी धोंडाक्का गेली म्हणून ते हंबरडा फोडतात..

केवळ दोन ओळी वाचून घेण्यासाठी शंकरराव खरात यांच्या वडिलांना लाकडे फोडावी लागली होती. हि वेदना त्यांनी आपल्या साहित्यात ज्वलंत मांडली. त्यांचे तराळ अंतराळ आत्मचरित्र जगभर गाजले. "सरकार डॉ शंकरराव खरात यांचे स्मारक बनविण्यास दिरंगाई करत आहे. त्यामुळे आता आमच्याकडे जे आहे ते विकून, जमेल तसे झोपडीवजा स्मारक बनविण्याच्या विचारात आम्ही आहोत".

हि उदासीन प्रतिक्रिया आहे. डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी चे सचिव विलास खरात यांची. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, बँक ऑफ इंडियाचे माजी संचालक ,ऑफिसर्स सिलेक्षण कमिटीचे चेयरमन, तराळ अंतराळ जगप्रसिद्ध आत्मचरित्रासोबतच दहा कादंबऱ्या, पाच ललित वाडमय, आठ विवेकग्रंथ याव्यतिरिक्त अनेक साहित्याचे निर्माते असलेले डॉ शंकरराव खरात यांना सरकारने आजदेखील आटपाडीच्या गावकुसाबाहेर उपेक्षित ठेवलेले आहे.

दलित वंचित घटकांची वेदना आपल्या साहित्यातून मांडणाऱ्या या महान साहित्यिकाचे निर्वाण होऊन वीस वर्षे उलटली. त्यांच्या स्मारकाच्या पोकळ आश्वासनाखेरीज एक फोटो देखील आटपाडी येथे उभा राहिला नाही.

आटपाडी गावाच्या गावकुसाबाहेर असलेल्या वस्तीत प्रवेश केल्यावर एका अडगळीतल्या बोळातून वाट काढत पुढे गेल्यावर त्यांचे राहते घर येते. आज हे ऐतिहासिक घर देखील शेवटच्या घटका मोजत आहे. तराळ अंतराळ आणि त्यांच्या गाजलेल्या कथांचे नायक ज्या घरातून ज्या परिसरातून निर्माण झाले ते घर आज अडगळीत आहे. ज्या महाराष्ट्र पंचायतराज व्यवस्थेची घटना लिहिण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली त्यातील एक स्तर असलेल्या ग्रामपंचायतीने अद्याप त्यांच्या घरासमोर दिवाबत्तीची सोय देखील केलेली नाही.

९ एप्रिल २००१ रोजी डॉ शंकरराव खरात यांचे निर्वाण झाले. त्यानंतर वीस वर्षापासून त्यांच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी स्मारक उभारण्याची मागणी शंकरराव खरात प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक साहित्यिकांनी केली आहे. पण सरकारने याबाबत कोणतेही पाऊल अद्याप उचलले नाही.

कसे असावे स्मारक

विलास खरात सांगतात स्मारक म्हणजे आम्हाला केवळ सिमेंटच्या भिंती आणि पुतळा अपेक्षित नाही. ज्या ठिकाणी त्यांचे तसेच इतर साहित्यिकांचे साहित्य उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांसाठी तसेच वाचकांसाठी अभ्यासिका असेल आणि साहित्यिकांच्या आदानप्रदानाचे ते एक केंद्रबिंदू असेल अशी संकल्पना डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठानची आहे.

याबाबत त्यांच्या साहित्याचे अभ्यासक संताजी देशमुख सांगतात. शंकरराव खरात यांनी दलितांच्या वंचितांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या. आटपाडीत ज्याप्रमाणे इतरांची स्मारके करण्यात आली त्याप्रमाणे तत्परतेने शंकरराव खरात यांचे स्मारक तातडीने उभे करण्याची मागणी ते करतात.

या परिसरातील साहित्यिक सुनील दबडे खंत व्यक्त करतात की शंकरराव खरातांबद्दल आटपाडी तालुक्यात काय आहे असा प्रश्न जर आम्हाला कोणी विचारला तर आम्ही त्यांना पडक्या बोळातून जाऊन त्यांचे खिंडार झालेल्या घराची जागा दाखवावी का ? शहरात त्यांचे एकही स्मृती जतन करण्यात आलेली नाही. तात्काळ सरकारने ती स्मारक उभे करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

डॉ शंकरराव खरात स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर खासदार संजय पाटील या यांना निवेदने दिली आहेत. वारंवार निवेदने देऊनही स्मारकाच्या जागेचा प्रश्न सुटू शकला नाही.

याबाबत महाराष्ट्रातील नामवंत शाहीर लेखक सचिन माळी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सांगतात गावकुसाबाहेरील उपेक्षितांची वेदना आपल्या साहित्यातून मांडणाऱ्या खराताना गावकुसाबाहेर ठेवण्याचा करंटेपणा या सरकारने केलेला आहे. इतकी मोठी पदे भूषविणाऱ्या या महान साहित्यिकाचे यथोचित स्मारक तात्काळ उभारण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलावीत अन्यथा या विरोधात महाराष्ट्रभर फिरून रान उठविण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक ग्रामीण कथाकार हिम्मत पाटील यांची प्रतिक्रिया मॅक्स महाराष्ट्रने जाणून घेतली असता ते म्हणाले

"सांगली जिल्हाचे आणि अवघ्या महाष्ट्राचे भूषण असणारे मराठी साहित्यातील एक अलौकिक अनमोल रत्न, थोर साहित्यिक दिवंगत शंकरराव खरात यांच्या जन्मगावी त्यांचे यथोचित स्मारक व्हावे अशी मागणी गेली दोन दशकं सातत्याने होऊनही आजवर या मागणीकडे सोईस्करपणे दुर्लक्ष होत आले आहे. ही मराठी साहित्यिकांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

तराळ अंतराळ, सांगावा सारख्या अनेक महत्त्वाच्या कलाकृती निर्माण करणारे शंकरराव खरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. नवकथेनंतर दलित, ग्रामीण, प्रादेशिक साहित्यिक चळवळींना बळ देत नव्या जोमाने चाकोरीबाहेर उपेक्षित जग त्यांनी नव्या आशयाविषयांसोबत नव्या जाणीवांनी मराठी साहित्यात मोठ्या ताकदीने आणलं. साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय चळवळींचं भान पेरणारे, नव्यानं लिहिणाऱ्या साहित्यिकांना बळ देणारे ते एक महत्त्वाचे लेखक असूनही त्यांच्या स्मारकाची अशी घोर उपेक्षा मनाला वेदना देणारी आहे.

त्यांच्या जन्मगावी आटपाडी येथे त्यांच्या कार्यकृर्त्वत्वाला शोभेल असे नेटके चालते बोलते स्मारक व्हावे. या स्मारकात सुंदर वाचनालय व्हावे. त्यात इतर पुस्तकांसोबत त्यांच्या सर्व साहित्यकलाकृती अनेक प्रतिंमध्ये उपलब्ध असाव्यात. त्यांच्या साहित्यकृतींवरील सर्व संशोधन आणि संदर्भग्रंथ उपलब्ध असावेत. त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सोय असावी. या अभ्यासासाठी आणि परिसरातील विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या साहित्यिकांना तिथे निवासाची सोय असावी की जेणेकरून शंकरराव खरात यांच्या साहित्यावर चर्चा होऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळत रहावा. त्यातून नव्यानं लिहिणाऱ्यांना प्रेरणा मिळावी.

शंकरराव खरात यांच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक उभे करावे हा त्यांच्या कुटुंबीयांचा सांगावा कित्येक वर्षापासून त्यांचे कुटुंबीय तसेच महाराष्ट्रातले साहित्यिक सरकारला देत आहेत. पण हा सांगावा न समजण्याईतपत सरकार अडाणी आहे का ? की सरकारला या उपेक्षितांच्या नेत्याला गावकुसाबाहेर उपेक्षित ठेवण्याचा परंपरागत पायंडा जतन करायचा आहे असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.


Updated : 16 Nov 2021 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top