Home > मॅक्स रिपोर्ट > आडनाव बदलल्याने जात बदलते का ?

आडनाव बदलल्याने जात बदलते का ?

आडनावावरून जात ओळखून त्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष अप्रत्त्यक्ष जातीय व्यवहार केला जातो. या गोष्टीला कंटाळून आडनाव बदलून त्याजागी गावाचे नाव लावण्याचा प्रघात महाराष्ट्रात सुरु झाला होता. पण आडनाव बदलल्याने तरी जातीय त्रास कमी होतो का ? वाचा सागर गोतपागर यांचा विशेष रिपोर्ट….

आडनाव बदलल्याने जात बदलते का ?
X

बाईकवरून जात असताना एका व्यक्तिने हात केला. मी बाईक थांबवली. त्यांना गाडीवर घेतलं. गाडी पुन्हा सुरु केली. मागे बसलेली व्यक्ती साधारण पन्नाशीतील होती. थोडं पुढे जाताच त्यांनी हळूच विचारलं.

“पावणं कुठन आला “?
“माझ्या गावाकडून”

मी म्हणालो.
गावाकडनं मजी आळसुंद ?
“नाय ओ कमळापूर वरून, कमळापूर माझ गाव”.
थोडा वेळ ते शांत राहिले. त्या शांततेनंतर लगेच त्यांनी दुसरा प्रश्न विचारला.

“कमळापूरऽऽऽऽ मजी साळुंखेच ना”….. त्यांच्या त्या प्रश्नावलीतून त्यांना कोणतं संशोधन करायच आहे त्याचा अंदाज मला आला. मी थोडं चढ्या आवाजात म्हणालो “ ते नव्ह कमळापुरात फकस्त साळुंखेच राहतात का” ?

“कमळापुरात गायकवाड राहतात , कमळापुरात जाधव राहतात,कमळापुरात चव्हाण राहतात, शिरतोडे, गवळी, काळोखे, कुंभार आणि गोतपागर ही राहतात”. मी त्यातील कुणी असू शकत नाही का ? ते हसायला लागले. तिथून पुढच्या प्रवासात त्यांनी माझ आडनाव विचारलं नाही.

आडनावावरून जात शोधणे ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी आढळते. पण आडनावाचा पत्ता लागल्यावर तो स्वजातीय उच्चवर्णीय असेल, तर तो वरचा का खालचा असा देखील शोध घेतला जातो.

केवळ आडनावामुळेच नाही तर गावाच्या नावात वाडी असलेल्या सवर्ण समलजल्या जाणाऱ्या व्यक्तींना देखील नावाचा मोठा फटका बसतो याबाबत सडेतोड चे संपादक विक्रांत पाटील सांगतात “गावाचे नाव वाडी असल्याने पोरांची लग्नं होईना म्हणून पट्ट्यांनी गावाचं नाव बदलून वाडी काढून पुर केलं. तरी लग्नाचा पूर येईना हो. कारण, जुने म्हणतात की, काही केलं तरी ती वाडीच हो. आडनाव बदलून सुध्दा जात काढणारी हाईतच. शिवाय, चव्हाण, जाधव, पाटील, मोरे अशी आडनावे वेगवेगळ्या जातीत आहेतच म्हणून तुम्ही कुठले मोरे, कुठले चव्हाण असं म्हणून जातच उकरून काढणारे महाभाग कमी नाहीत.

अथक प्रयत्न करुन एकदा समोरील व्यक्तिच्या जातीचा पत्ता लावला की उस्वास टाकला जातो. जात समजली की त्या व्यक्तीसोबतचा काही व्यवहार हा जात डोक्यात ठेऊन केला जातो. जातीनुसार आचरण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केले जाणे हे वास्तव आहे. यामध्ये जातीने कनिष्ठ ठरवले गेलेले ही अपवाद नाहीत. सोबतचा माणूस आपला आहे का हे त्यांच्याकडून देखील तपासले जाते. स्वजातीय व्यक्तीसोबत सुरक्षित आहोत. त्यांच्यासोबतच्या व्यवहारांत कन्फर्ट वाटणे ही बाब सवयीची झालेली आहे. उच्च वर्णीय जातीकडून वर्षानुवर्षे होत असलेला जातीय भेदभाव हे कारण देखील त्याच्यामागे आहे.

माणसाचे आडनाव ही एक ओळख आहे. पण ही ओळख केवळ त्या व्यक्तिचीच नाही तर त्याच्या जातीची, जातीअंतर्गत उच्च निचतेची ओळख आहे.

आडनावाने जात ओळखुन त्या व्यक्तीसोबत जातीय व्यवहार केला जातो. त्यामुळे आडनावामुळे जातच ओळखु देऊ नये या उद्देशाने पूर्वीचे आडनाव बदलून त्याऐवजी गावाचे नाव लावण्याचा प्रघात सुरु झाला. उदा. कांबळे आडनाव असेल तर मिणचेकर कोल्हापूरकर, पुणेकर अशी नावे लावली जाऊ लागली. यामध्ये काही प्रमाणात जातीची ओळख अस्पष्ट झाली देखील पण लावलेल्या या नव्या नावांना देखील जात चिकटलीच. याबाबत पहिल्या पिढीतच आपले आडनाव बदललेले प्रा. अमोल मिणचेकर सांगतात, “मी १९५० चा ७/१२ पाहीला आहे. यात माझ्या आजोबांचे आडनाव महार आहे. कांबळे आडनाव वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर दिसून येते. ते बहुतेक मास्तर ने दिले असावे. आमचे आडनाव गावाच्या नावाने लावून आज दोन पिढ्या झाल्या. दुसऱ्या पिढीत सर्व कागदपत्रांवर नाव लागले. त्या आधी अर्धे कांबळे तर अर्धे मिणचेकर होते. पण मिणचेकर या नावाशी पण आता जात चिकटली आहे. गावातील सवर्ण लोक मिणचेकर ही आयडेंटिटी कधीच लावत नाहीत. कारण ती आता महार जातीशी चिकटली आहे. जात इतकी खोलवर रुजली आहे की ती आर्थिक दर्जा, व्यवसाय, नामांतर, धर्मांतर तसेच देशांतर केल्यावर सुद्धा सुटत नाही हे जळजळीत वास्तव आहे”.

याबाबत जेष्ठ पत्रकार किरण सोनवणे सांगतात, “जे जातीयवादी असतात ते समोरच्या व्यक्तीची जात बरोबर शोधून काढतात, मग तुम्ही गावाचे नाव लावा नाहीतर आई वडिलांचे, अगदी तुम्ही जोशी -कुलकर्णी -देशपांडे नाव लावले तरी ते शोधून काढतील.

मग ते गाव विचारतील, मग गावात कुठे रहाता विचारतील किंवा मग तुमचे इथे कुणी नातेवाईक रहातात का? तुमच्या घरातील फोटो बघतील किंवा तुमच्याकडे कोण पाहुणे येतात अश्या वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या जातीचा शोध लावल्या शिवाय ते गप्प बसणार नाहीत.

कारण तुमची जात कळल्या शिवाय तुमच्याशी किती, कसे, काय संबंध ठेवायचे हे ठरणार असते. तुम्ही खूप उच्च पदावर असलात तर तुमच्याशी छुपे जातीयवादी संबंध, तुम्ही गरिबी असलात तर मुजोर जातीयवादी संबंध, तुम्ही बरोबरीचे असलात तर हेटाळणीचे जातीयवादी संबंध ठेवतील. कारण या देशात माणसाची ओळख त्याच्या जातीशिवाय अपूर्ण आहे. हा देश माणूस नाही तर जातीयवादी जन्माला घालतो”.

जातीचे आडनाव बदलल्याने जातीय त्रासाची दाहकता काही प्रमाणात कमी होत असल्याचा अनुभव संतोषकुमार ताई रामभाऊ यांचा आहे ते सांगतात, “जातीच्या आडनावा ऐवजी गावाचे नाव लावल्यास जातीयवादी त्रासातून सुटका होते किंवा नाही होत असा एकतर्फी निष्कर्ष काढता येत नाही. परंतु जातीवादाची दाहकता निश्चित कमी होऊ शकते. कारण कट्टर जातीवादी तुमची जात शोधल्याशिवाय राहणार नाहीत. मग तुम्ही कोणतंही आडनाव लावा अगर नका लावू. आणि दुसऱ्या टोकाची लोकं तुम्ही कोणतंही आडनाव लावलं तरी जातीवाद करणार नाहीत. परंतु या दोन्हींच्या मधला जो मोठा गट आहे तो सायलंट किलर आहे. तो कोणत्याही बाजूला झुकू शकतो. तुम्ही गावाचे नाव लावल्यास त्याला तुमची जात मात्र सहज कळणार नाही. त्यामुळे तो तुमची जात शोधण्याच्या फंदात पडणार नाही त्यामुळे तुम्ही जातीवादापासून काही प्रमाणात वाचू शकाल. गावाच्या आडनावांमुळे जातीच्या आयडेंटिटी बद्दल म्हणाल तर महाराष्ट्रा पुरता विचार केला तर महाराष्ट्रात 50-60 हजार गावे आहेत. त्यामुळे 50-60 हजार नवीन गावांची आडनावे तयार होतील. आडनावांची जेव्हडी व्हरायटी जास्त होईल तेवढा जातीवाद्यांना जात शोधण्यासाठी त्रासच होईल हे निश्चित. त्यामुळं जातीच्या आडनावापेक्षा गावचे आडनाव लावल्यास जातीची इतकी सहज आयडेंटिटी चिकटणार नाही”.

जातीचे आडनाव बदलल्याने अंशतः तरी फरक पडतो असा निष्कर्ष काढता येईल. पण हा बदल जातीचा व्यवहार पाळणाऱ्यांवर अवलंबून आहे. जातीय व्यवहार हे केवळ भौतिक आचरण नाही. तर ते नेणिवेतील आचरण आहे. जोपर्यंत मनातील जात जाणार नाही तो पर्यंत आडनावावरून जातीचे संशोधन करणाऱ्या पिढ्या निर्माण होतच राहणार.

सागर गोतपागर

Updated : 21 Feb 2023 7:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top