Home > मॅक्स रिपोर्ट > ढोराळे येथील दलितांचे ढोराचं जिण!

ढोराळे येथील दलितांचे ढोराचं जिण!

ढोराळे येथील दलितांचे ढोराचं जिण!
X

"पाऊस पडला की मोडक्या पडक्या घरात पाण्याच तळ भरतय. मी म्हातारी भगुल्यान घरातलं पाणी काढती. तवा मी बसती तिथ. ती पण ...च्याखाली काहीतरी ठेऊन अशा परिस्थितीत मला पावसाळा काढावा लागतो". बत्तासुबाई बुधावले या सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील ढोराळे येथे राहणाऱ्या वृद्ध आज्जीच्या तोंडातून निघालेले हे सत्य कथन आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य या गावात गेले पण अद्याप त्यांना पक्का निवारा मिळालेला नाही.

ही अवस्था केवळ एका बत्तासुबाई यांचीच नाही. तर विकसित समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील ढोराळे या गावातील दलित वस्तीतील सर्व घरांचीच ही व्यथा आहे. या परिसरातील दलितांच्या वाट्याचा भोग अजूनही संपलेला नाही. देशाच्या स्वातंत्र्याला ७४ वर्षे उलटली. तरीही डिजिटल स्वप्नांच्या दिशेने झेपावणाऱ्या, मंगळावर चंद्रावर पाउल ठेवणाऱ्या देशातील ग्रामीण वास्तव आजही भीषण आहे. या ग्रामीण भागातील दलित समुहाचे जगणे तर याहूनही वेदनादायी आहे.




तालुका मुख्यालय असलेल्या विटा शहराच्या पूर्वेकडे भिवघाटच्या दिशेने पुढे गेल्यास ऐनवाडी हे गाव लागते. तेथून डावीकडे वळल्यानंतर साधारण सहा किलोमीटर अंतर पक्क्या चकचकीत रस्त्यावरून गेल्यानंतर ढोराळे गाव येते. मुख्य गावात अंतर्गत रस्ते तसेच टुमदार घरे दिसतात.गावात पोहचल्यावर समोर शुभ्र बोर्डावर सुवाच्च अक्षरात आदर्श ग्राम ढोराळे आपले सहर्ष स्वागत करत आहे असा फलक दिसतो. या फलकापासून जसजसे दूर आणि गावकुसाबाहेर जाऊ लागताच तेथूनच डोंगरावरील उंच टेकडीवर ढोराळे येथील मातंग समाजाची वस्ती दिसते. या वस्तीकडे जाणारा रस्ता म्हणजे एक पाउलवाट आहे. दोन ठिकाणी ही वाट तारेच्या कुंपणाने बंद केल्याचे दिसते. त्याच्यासमोरूनच दोन मोठ्ठ्या दगडांच्या चिंचोळ्या जागेतून कच्च्या रस्त्याने हि वाट या वस्तीवर पोहचते. वस्तीवर जाताच समोर दिसतं आदर्श गावाचा बुरखा फाडणारे दलित समाजाच्या अधोगतीच परंपरागत गावकुसाबाहेरील मॉडेल. एक पक्के घर सोडले तर पडकी घरे , त्याच्या तांबरलेल्या गळक्या पत्र्यांवर झाकलेले प्लास्टिचे कागद आणि तो उडू नये म्हणून त्यावर ठेवलेले फिरून निकामी झालेले गाड्यांची चाके .



या वस्तीवरील समस्यांबाबत तेथील नागरिक असलेल्या आशाबाई साठे सांगतात. "आम्ही घरासाठी आमदारांकडे गेलो असता त्यांनी सांगितले कि तुम्ही घरावर पत्रे घालण्याऐवजी कागद अंथरा आणि त्याच्यात रहा. आम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन जाऊन थकलो पण आमची दखल घेतली नाही. आम्हाला स्मशानभूमी नाहीयं आमचे मामा वारले तर आम्हाला प्रेत जाळण्यासाठी जागा नव्हती. प्रेत जाळण्यासाठी आम्हाला पाच सहा ठिकाणी फिरवण्यात आले. आमच्या वस्तीवर एकही शौचालय नाही. बाजूला सर्व शेती आहे दिवसा शौचाला जाता येत नाही . आजूबाजूला शेती असल्याने कुठे जाणार हा प्रश्न पडतो. वस्तीत असलेल्या खांबावर बल्ब लावला जात नाही. वेळेवर पाणी सोडले जात नाही. पंधरा टक्के निधी प्रतिवर्षी खर्च केला जात नाही. घरे पडलेली असतानाही घरकुल योजनेची अंमलबजावणी केली जात नाही."

विजय सकट सांगतात "आम्ही लाज बाजूला ठेवून तुम्हां सांगतोय कि आमची वस्ती उंचावर आहे. आजूबाजूला शेती आहे. आमच्या महिला दिवसा तसेच रात्री शौचाला जाणार कुठे ? आम्हाला रस्ता नाही. पेशंटला गावातील रस्त्यापर्यंत कसेबसे खांद्यावरून न्यावे लागते. या रस्त्यावर चार चाकी वाहन येऊ शकत नाही. गावातील अनेक श्रीमंतांची नावे दारिद्र्य रेषेखाली आहेत. पण पडक्या घरात राहणाऱ्या आमच्या वस्तीतील अनेक लोकांचे नाव नाही. आमच्या गळक्या आणि कागद फडकी झाकलेल्या घरात या सरकारला कोणती श्रीमंती दिसते".




दिवाबत्तीची सोय नाही नाही, शौचालये नाहीत, रस्ता नाही, अंतर्गत रस्ते नाहीत, दलित वस्ती सुधार योजनेचे एकहि काम झालेले नाही. पावसाळ्यात गळक्या घरांमध्ये भांडी ठेऊन रात्री जागून काढणाऱ्या या कुटुंबातील नागरिकांचा हा भोग मेल्यावरही संपत नाही. कारण या वस्तीसाठी स्मशानभूमीच नाही. संतोष सकट सांगतात "एखाद प्रेत झाल तर स्मशानभूमी नाही मग ते जाळायच कुठ? प्रेताला दहन करायचे झाले तर पहिल्यांदा परवानगी काढावी लागते.आम्ही दलित आहोत म्हणून मराठ्याची माणस म्हणतात इथ जाळायच नाही. मग आम्ही जाळायच कस?

या असंख्य समस्यांना तोंड देत या कुटुंबांची तिसरी पिढी आज कसेबसे आयुष्य कंठत आहे. या वस्तिमध्ये विकासाच्या तसेच सोयीसुविधांची अंमलबजावणी का झाली नाही या बाबत आम्ही या गावाचे सरपंच प्रकाश पवार यांना संपर्क केला असता त्यांनी याला जबाबदार अगोदरची ग्रामपंचायत बॉडी असल्याचे सांगत ही वस्ती गायरानाच्या जमिनीवर असल्याने या ठिकाणी शासकीय योजनांची अंमलबजावणी करता येत नसल्याचे सांगितले. यानंतर तीस ते पस्तीस वर्षापासून अतिक्रमित असणारी भूमिहीन दलितांची हि अतिक्रमणे नियमित का झाली नाहीत असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी चक्क ग्रामपंचायतीमधील अतिक्रमण रजिस्टर गहाळ असल्याचे सांगितले. याबाबत लवकरच तोडगा काढून विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



याबाबत आम्ही गायरान हक्क अभियानचे नेते एड. विलास लोखंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते सांगतात "२८ नोव्हेंबर १९९१ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार विहित जमिनी नियामाकुल करण्याबाबत आदेश आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक प्रकरने प्रलंबित आहेत.भूमिहीन असलेल्या अनुसूचित जातीसाठी गायरान हे हक्काचे आहे. परंतु या असलेल्या अतिक्रमणाची नोंद करून घेण्यास स्थानिक राजकारणातून तसेच जातीय मानसिकातेतून दिरंगाई केली जाते. या लोकांना या जमिनी मिळू नयेत अशा प्रकारची काळजी प्रस्थापीत घेत असतात. राज्य आणि केंद्र सरकारचे घरा बद्दल चे धोरण सकारात्मक आहे. पण घरकुल योजना .निकष नियम वेगळे आहेत. म्हणजे सरकार जागेच्या मालकी संबंधी कागद पत्र मागणी करते.त्यामुळे सरकारी धोरणात ताळमेळ नाही..या गोंधळामुळे बेघर असलेल्यांना याचा लाभ होत नाही.

गावाच्या नावातच ढोर असलेल्या या वस्तीतील नागरिकांची अवस्था ढोराइतकीच भीषण आहे. परंतु याची शरम ना इथल्या प्रशासनाला आहे ना लाल दिव्यांच्या ताफ्यात लोकप्रतिनिधी म्हणून कडक पांढऱ्या कपड्यात लाल दिव्याच्या ताफ्यात फिरणाऱ्या पुढार्यांना आहे. ढोराळे येथील या लोकांची वेदना बहि-या लोकप्रतिनिधींच्या कानावर पडणार का ? गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला कळणार का ? की यासाठी या लोकांना संघर्षाची ठिणगी पेटवावी लागणार हे येत्या काळात कळेल.....


Updated : 28 Nov 2021 5:07 AM GMT
Next Story
Share it
Top