Home > Max Political > देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील वजन घटले आहे का?

देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील वजन घटले आहे का?

महाराष्ट्र भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अंतिम असतो, असे समीकरण तयार झाले होते. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडात उद्धव ठाकरेंएवढाच धक्का देवेंद्र फडणवीस यांनाही बसला. त्यानंतरही पक्षात दीड महिन्यात घडलेल्या घडामोडींमुळे देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील वजन कमी झाले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील वजन घटले आहे का?
X

माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्री एवढाच त्यांचा प्रवास नाहीये तर राज्याच्या राजकारणातील नवे चाणक्य अशीही त्यांची ओळख निर्माण झाली. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जे आक्रमण सुरू केले होते, ते उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतरच थंड झाले.

या दरम्यान राज्यसभा निवडणूक असो, विधान परिषदेची निवडणूक असो किंवा एकनाथ शिंदे यांचे बंड असो देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धीबळातील एकेक चाल अशी सुरेख खेळली की शरद पवारांसारख्या मुरब्बी राजकारण्यालाही त्यांच्या या खेळीचे कौतुक करावे लागले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकार कोसळले आणि राज्यात फडणवीस पुन्हा येणार हे निश्चित झाले. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र भाजपमधील सगळ्यात वजनदार नेता असल्याचे सिद्ध झाले होते.

पण सगळे फासे फडणवीस यांच्या बाजूने पडत असताना अचानक पक्षश्रेष्ठींच्य़ा मनात आले आणि फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले...एवढेच नाही तर फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासही भाग पाडण्यात आले. आणि इथूनच देवेंद्र फडणवीस यांचे पक्षात वाढलेले वजन पक्षश्रेष्ठींनी कमी करत बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीस आणि शिंदेंना मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागल्या...एवढेच नाही तर पक्ष संघटनेत देखील देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट कापलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षद देण्यात आले. आशिष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्षपद देण्यात आले. यानंतर आशिष शेलार यांनी बावनकुळेंवर अन्याय झाला होता हे जाहीरपणे सांगत एकप्रकारे फ़डणवीस यांनाच टोला लगावला.

तिकडे पंकजा मुंडे यांनीही मंत्रीपद न मिळाल्याने जाहीर नाराजी तर व्यक्त केलीच पण आता आपण राजकीय वजन वाढवत आहोत, असेही सांगत एकप्रकारे इशाराच दिला आहे. त्यांनाही पक्षाने राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देत नाराजी थोपवण्याचा प्रयत्न केला आहे. एरवी राज्याच्या राजकारणापासून चार हात लांब असणाऱ्या नितीन गडकरींनीही संधी साधत फडणवीसांना केंद्राचे मार्ग खुले असल्याचे संकेत दिले. फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे यांना संधी आहे, अशी गडकरी यांनी चेष्टा केली असली तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा तर होणारच हे नक्की...

एकूणच फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद घेण्यास भाग पाडणे, फडणवीसांनी तिकीट कापलेल्या बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष पद देणे, पक्षांतर्गत गटात फडणवीसांसोबत नसलेल्या आशिष शेलार यांना मुंबईचे अध्यक्षपद देणे, विनोद तावडे यांना राष्ट्रीय पातळीवर प्रमोशन असे गेल्या काही महिन्यातील निर्णय पाहिले तर महाराष्ट्र भाजप म्हणजे फडणवीस हे समीकरण पक्षश्रेष्ठींनी मोडून काढल्याचे दिसते आहे.

Updated : 2022-08-16T18:45:45+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top