Home > Election 2020 > देवेंद्रजी ३६ लाख रोजगारांचं काय झालं ?

देवेंद्रजी ३६ लाख रोजगारांचं काय झालं ?

देवेंद्रजी ३६ लाख रोजगारांचं काय झालं ?
X

मेक इन इंडीया कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 58 हजार 439 रोजगाराची प्रत्यक्ष निर्मिती झाली आहे. मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्या माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या अर्जाच्या उत्तरादाखल महाराष्ट्र सरकारच्या उद्योग खात्याने ही माहिती दिली आहे. मेक इन इंडीया कार्यक्रमांतर्गत 28,869 कोटींची गुंतवणूक अपेक्षित होती तर 1 लाख 77 हजार 845 लोकांना रोजगार उपलब्ध होणार होता. यातील 9 हजार पाच कोटींची गुंतवणूक पूर्ण झाली असून 58439 लोकांना रोजगार मिळाला असून इतर प्रकल्पांचं कार्यान्वयन सुरू असल्याचं उद्योग खात्याने म्हटलं आहे.

राज्यात 2020 पर्यंत मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होणार असून 36 लाख बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 फेब्रुवारी 2018 रोजी मॅग्नेटीत महाराष्ट्रच्या सांगता समारंभात केला होता.

या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले होते की,

“ देशांतर्गत व परदेशी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 12 लाख 10 हजार 464 कोटी रूपयांची गुंतवणूत राज्यात होणार आहे. केंद्र तसेच राज्य सरकारची मान्यता असलेल्या प्रकल्पांची सुमारे 3 लाख 90 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून 36 लाख 77 हजार 185 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. एकूण गुंतवणुकीतील सर्वाधिक गुंतवणूत उद्योग क्षेत्रात होणार असून पाच लाख 48 हजार 166 कोटी रूपये उद्योग क्षेत्रात गुंतवले जातील. गृहनिर्माण क्षेत्रात तीन लाख 85 हजार कोटी, ऊर्जा क्षेत्रात 1 लाख 60 हजार 268 कोटी गुंतवणूक होणार आहे. सरकारच्या पायाभूत प्रकल्पांचे 104 सामंजस्य करार झाले. त्या माध्यमातून तीन लाख 90 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून दोन काळ 6 हजार 266 रोजगार निर्मिती होणार आहे.”

मेक इन इंडीया कार्यक्रम घोषित झाल्यानंतर राज्यात किती करार झाले, किती गुंतवणूक आली, किती रोजगार निर्मिती झाली याबाबत रवींद्र आंबेकर यांच्याकडून माहिती विचारण्यात आली होती. या अर्जावर उत्तर देताना उद्योग खात्याने 27 फेब्रुवारी 2019 ला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की,

आपल्या माहितीचा अधिकार 2005 अर्ज दिनांक 03.12.2018 च्या अनुषंगाने आपण मागितलेली सर्वसमावेशक माहिती या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येत नाही. तथापि मेक इन इंडीया कार्यक्रमांतर्गत या कार्यालयामार्फत सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांबाबत सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात झालेल्या गुंतवणूक व रोजगाराबातची खालील प्रमाणे माहिती पाठलवण्यात येत आहे.

दिनांक 13 फेब्रुवारी 2016 ते दिनांक 18 फेब्रुवारी 2016 या कालावधीत मुंबईत भरलेल्या मेक इन इंडीया सोहळ्यामध्ये राज्य शासनाच्या उर्जा, गृहनिर्माण, सिडको, उद्योग संचालनालय, पर्यटन, बंदर विभाग, सार्वजनिक आरोग्य, कृषी, पशू संवर्धन व दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग, कौशल्य विकास विभाग तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे मार्फत एकूण 2984 उद्योजकांनी सामंजस्य करार केलेले आहेत. याद्वारे आठ लाख चार हजार 898 कोटींची प्रस्तावित गुंतवणूक व 30 लाख 46 हजार 441 अपेक्षित रोजगारांची निर्मिती होणार आहे.

यातील उद्योग संचालनालयामार्फत मेक इन इंडीया कार्यक्रमात सुक्ष्म, लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसमवेत केलेल्या एकूण 2512 सामंजस्य करारनामे साक्षंकित झालेले आहेत. त्यातील प्रस्तावित गुंतवणूक 28869.12 कोटी आहे. त्यापैकी आतापर्यंत 1056 घटक कार्यान्वित झाले असून त्यात रूपये 9005 कोटी गुंतवणूक आणि 58439 रोजगाराची संधी उपलब्ध झाल्या आहेत. 312 प्रकल्पांचे बांधकाम सूरू झाले असून त्यात 5420 कोटी रूपये गुंतवणूक आणि 40599 व्यक्तींना रोजगार अपेक्षित आहेत. 821 प्रकल्पात प्राथमिक पाऊल उचललेले असून त्यात 13124 कोटी रूपये प्रस्तावित गुंतवणूक व 94022 व्यक्तींना रोजगार अपेक्षित आहे.

ही पहा सरकारच्या उद्योग विभागाने दिलेली आकडेवारी :

Updated : 25 April 2019 9:49 AM GMT
Next Story
Share it
Top