Home > News Update > भारतीयांच्या पेशीत कोरोनाचे घुसणे अवघड ?

भारतीयांच्या पेशीत कोरोनाचे घुसणे अवघड ?

भारतीयांच्या पेशीत कोरोनाचे घुसणे अवघड ?
X

अमेरिका निवासी मिलिंद पदकी कोरोनाचा फैलावर आणि संबंधित घडामोडींवर नियमित लक्ष ठेवून असतात. सर्वसामान्यांना उपयुक्त माहिती ते सहजसोप्या भाषेत समाजमाध्यमात मांडत असतात. दक्षिण आशियाई जनुकसंच कोरोनाविरोधात तुलनेने प्रतिकारक्षम आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

जगात आता चार हजाराहून अधिक मृत्यू झाले असून, चीन नंतर त्यात इटली, साऊथ कोरिया आणि इराण या देशात मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. हा आपला "दक्षिण आशियाई" जनुक-संच, या व्हायरसला विशेष प्रतिकार-क्षम दिसतो आहे. हे कशामुळे घडत असावे?

नऊ मार्चपर्यंतच्या बातम्यांनुसार भारतात करोनाच्या केवळ ४४ केसेस झाल्या आहेत. (दिल्ली : ४, हरियाणा : १४, जम्मू : १, केरळ : ९, लडाख : २, पंजाब : १, तामिळ नाडू :१. तेलंगण : १, उत्तर प्रदेश : ९. ) बारा मार्च रोजी कर्नाटकात एका ७६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे, जो भारतातील पहिलाच मृत्यू आहे.

व्हायरसेस हे दुसऱ्याच्या पेशींच्या आतच आपले जीवनकार्य करू शकतात. करोना व्हायरस हा एक आर एन ए व्हायरस आहे. म्हणजे त्याच्या आतली आर एन ए ची माळ ही त्याची सूत्रधार किंवा मालक असते. तिच्या भोवती प्रथिनाचे कवच असते. या कवचाच्या बाह्य पृष्ठभागावरचे एक काट्यासारखे प्रथिन , अनेक मानवी इंद्रितांच्या पेशींच्या बाह्य पृष्ठभागावरील ACE2 नावाच्या रिसेप्टर बरोबर प्रथम संलग्न होते. त्या दोघांचा हा कॉम्प्लेक्स मग पेशींच्या आत घेतला जातो, आणि व्हायरसची आर एन ए ची माळ मग मानवी पेशींच्या प्रथिन-निर्मितीच्या यंत्रणेवर कबजा मिळवून शेकडो नवे व्हायरस तयार करते.ते पेशीला फोडून, ठार करून बाहेर पडतात, आणि इतर पेशींमध्ये घुसतात. हळूहळू अनेक इंद्रियांचे काम बंद पडून पेशंटचा मृत्यू ओढवितो.

या व्हायरसला सहज बळी पडणारे चिनी आणि बऱ्यापैकी प्रतिकारक्षम असणारे भारतीय, यांच्या, ACE2 या रिसेप्टरच्या दहा अमिनो आम्लांमध्ये (residues near lysine 31, and tyrosine 41, 82–84, and 353–357) बराच फरक असून , त्यामुळे त्या रिसेप्टरची बाह्य रचना बदलते. या वेगळ्या रचनेच्या रिसेप्टरला बांधून घेऊन भारतीयांच्या पेशींमध्ये शिरणे या व्हायरसला अवघड होत असावे असा कयास आहे. "करोना से डरोना" या लोकप्रिय झालेल्या संदेशात थोडेफार तथ्य जरूर आहे.

पाळावयाची काही पथ्ये नव्याने पुढे येत आहेत, ती पुढील प्रमाणे:

१. करोना व्हायरस वरचा उत्तम उपाय म्हणजे साबणाने वारंवार हात धुणे. मात्र ते "झटपट" न करता, दोनतीन मिनिटे साबण हातावर राहील असे धुणे. दिवसातून निदान चार-पाच वेळा.

२. आपला मोबाईल फोन अल्कोहोल किंवा बाजारातले सॅनिटायझर्स वापरून वारंवार पुसत रहाणे (तसेच तो फोन बाथरूम मध्ये न वापरणे !!!!). काँप्युटरच्या की-बोर्डबद्दलही हेच.

३. मुले या व्हायरसला उत्तम प्रतिकार करू शकतात, त्यांची काळजी न करणे.

४. नाकातोंडाचे मास्कस हे आजारी लोक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे. आजारी लोकांना मास्क्स दिल्यास इन्फेक्शन पसरण्यावर उत्तम कंट्रोल येऊ शकेल.

५. नाक आणि तोंडानंतर, चेहऱ्यावरचे व्हायरस-प्रवेशाचे तिसरे स्थान म्हणजे डोळे. डोळे वारंवार न चोळणे. बाहेर जाताना टाईट गॉगल घालणे.

या आधी पुढील सूचनाही मांडल्या होत्याच:

१. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा . त्यासाठी

- रोज निदान १५ मिनिटे जोरकस, दमविणारा व्यायाम करा.

- दररोज पुढील व्हिटॅमिन्स घ्या: व्हिटॅमिन डी (१००० आय यू) , व्हिटॅमिन सी (१००० मिलिग्रॅम, जमल्यास दोन हजार मिलिग्रॅम . यासाठी ५०० मिलिग्रॅमच्या गोळ्या दिवसभरात काही काही तासांनी घ्या , म्हणजे पोटाला त्रास होणार नाही) आणि एक मल्टीव्हिएटमिन टॅब्लेट .

२.. गर्दीशी संपर्क जमेल तितका टाळा. घरी राहून काम करणे शक्य असल्यास जरूर करा. अनोळखी व्यक्तीशी बोलताना निदान सहा फूट दूर रहा .

समजलेल्या नव्या गोष्टी यापुढेही मांडत राहीनच. खबरदारी घ्यावी, पण या साथीमुळे भीतीने गर्भगळीत होण्याचे अजिबात कारण नाही.

Updated : 13 March 2020 5:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top