Home > मॅक्स रिपोर्ट > मुंबई विमानतळावर गरबा, महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न?

मुंबई विमानतळावर गरबा, महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न?

मुंबई विमानतळावर गरबा, महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न?
X

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा आता पूर्णपणे अंदानी समुहाकडे गेला आहे. मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन आधी GVK समुहाकडे होते. पण हा समूह आर्थिक संकटात सापडल्याने अदानी समुहाने विमानतळ खरेदीची प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

गेल्या काही दिवसात वादग्रस्त ठरलेल्या अदानी समुहाने विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाला आहे. अदानी समुहाने विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर विमानतळावर याचे सेलिब्रेशन करण्यात आले. यामध्ये विमानतळावरील कर्मचारी गरबा खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मुळात मुंबई विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर गरबा खेळून त्याचे सेलिब्रेशन करण्याचा अदानी समुहाचा हेतू काय, हा मराठी अस्मितेशी खेळ आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे. या प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे, सेलिब्रेशननंतर प्रसिद् उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे "Mumbai airport celebrating the takeover by Gujarat!"

मुंबई विमानतळ गुजरातने ताब्यात घेल्याचे सेलिब्रेशन, अशा आशयाचे हे ट्विट आहे. पण आता गोयंका यांच्या या ट्विटला कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून यावर आक्षेप नोंदवला आहे.

"हर्ष गोयंका यांना ह्या ट्वीद्वारे काय म्हणायचे आहे. मुंबई विमानतळाची मालकी अदानीकडे गेल्यामुळे मुंबई विमानतळाचा मालक गुजरात आहे म्हणून गुजराती लोक तेथे आनंदोत्सोव साजरा करता आहेत हे त्यांचे म्हणणे आहे काय?"

असा सवालच रेड्डी यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकाराला मनसेनेही आक्षेप घेतला आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट करुन इशारा दिला आहे.

"मुंबई विमानतळावरून GVK चे रेड्डी गेले आणि अदानी आले. व्यवस्थापन कोणाचे ही असो पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'आवाज' हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या. फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलय … विमानतळ मुंबईमध्येच आहे …. आम्हाला डीवचण्यासाठी 'गरबा' कराल तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल."


हर्ष गोयका यांना अशाप्रकारे ट्विट करुन कोणता संदेश द्यायचा आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच अदानी यांनीही कर्मचाऱ्यांना गरबा खेळायला लावून महाराष्ट्रातील मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे का, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.

यासंदर्भात आम्ही ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी सांगितले की, "हर्ष गोयंका यांनी गुजरातने विमानतळावर ताबा मिळवला आहे, असे वक्तव्य करणे योग्य नाही. अशाप्रकारे वक्तव्य करुन मराठी-गुजराती वाद निर्माण करण्यात अर्थ नाही. कोणताही उद्योगपती हा एका राज्याचा नसतो. हा विजय गुजरातचा आहे असे त्यांचे म्हणणे तर असेल अदानी यांचे जगभरात अनेक ठिकाणी उद्योग सुरू आहेत, अदानी यांनी हे सर्व उद्योग गुजरातचे आहेत किंवा आपण गुजराती आहोत म्हणून मुंबई विमानतळावर गुजराती डान्स केला असे जाहीर करावे. उद्योगपतींनी अशा संकुचित विचार करु नये. एवढेच नाही तर हर्ष गोयंका हेसुद्धा मुंबईत वाढले आहेत. त्यामुळे मराठी आणि गुजराती असा वाद निर्माण करण्यात अर्थ नाही." अशी भूमिका देसाई यांनी मांडली आहे.

Updated : 20 July 2021 10:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top