Home > Election 2020 > जाहिरातबाजीत काँग्रेसची आघाडी, भाजप बॅकफूटवर

जाहिरातबाजीत काँग्रेसची आघाडी, भाजप बॅकफूटवर

जाहिरातबाजीत काँग्रेसची आघाडी, भाजप बॅकफूटवर
X

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामध्ये आक्रमक जाहिराती, सोशल मीडियाचा पुरेपुर वापर आणि त्यातील सातत्याचाही मोठा वाटा होता. मात्र, आता २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचारात प्रसिद्धीच्या बाबतीत तोच भाजप बॅकफूटवर असल्याचं दिसतंय. वर्तमानपत्रांची पहिली पानं ही काँग्रेसच्या जाहिरातींनी व्यापून टाकत काँग्रेसनं जाहिरातीमध्ये आघाडी घेतल्याचं दिसतंय. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्वच वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर भाजपच्या जाहिरातींना स्थान मिळालं होतं. मात्र, २०१९ मध्ये सर्वच वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर काँग्रेसच्या तर आतील पानांवर भाजपच्या जाहिराती दिसत आहेत.

काँग्रेसनं आपल्या जाहिरातींमध्ये जाहीरनाम्यातील ठळक मुद्द्यांना स्थान दिलेलं आहे. तर भाजपनं जाहिरातींमध्ये काँग्रेसनं काय चूका केल्या होत्या, काँग्रेसची धोरणं कशी चूकीची होती हेच जाहिरातींमधून सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं काँग्रेसनं आपला स्वतःचा अजेंडा पुढे रेटत भाजपला आपल्या अजेंड्यावर आणलंय, हे यातून अधोरेखित होतंय. भाजपनं स्वतःची रणनीती राबवण्याऐवजी, स्वतःच्या जाहिराती आक्रमकपणे पुढे आणण्याऐवजी काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं खोडून काढण्यामध्येच शक्ती वाया घालवली असल्याचं दिसतंय.

चौकीदार ही चोर है, लाज वाटत नाही का ?

अशी आक्रमक लाईन काँग्रेसच्या जाहिरातींमधून घेण्यात आलेली आहे. त्याला काऊंटर करण्यातच भाजपची शक्ती खर्ची पडल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या बरेच दिवसआधीपासून काँग्रेसनं सोशल मीडियातून सरकारला लक्ष्य करायला सुरूवात केली होती.

सोशल मीडियावरही राजकीय जाहिरातींचा धडाका

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावरही राजकीय जाहिरातींचा धडाका सुरू झाला आहे. फेब्रुवारी ते मार्च या एका महिन्यात फेसबुकवर ५१, ८१० जाहिराती प्रसिद्ध कऱण्यात आल्या होत्या. या राजकीय जाहिरातींसाठी १० कोटी ३२ लाख रूपये खर्च करण्यात आले होत, अशी माहिती फेसबुक अँड लायब्ररीच्या अहवालातून देण्यात आली आहे. भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी फेसबुकवर सर्वाधिक जाहिराती केल्या आहेत. भाजपनं ‘भारत के मन की बात’ या फेसबुक पेजवर ३७०० जाहिराती केल्या असून त्यासाठी २.२३ कोटी रूपये खर्च केले आहेत. तर नेशन विथ नमो, माय फर्स्ट व्होट फॉर मोदी यासाठी ३६ लाख रूपये खर्च केले आहेत. काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवर ४१० जाहिराती प्रसिद्ध कऱण्यात आल्या आहेत. त्यावर ५.९१ लाख रूपये खर्च केले आहेत. बीजेडी (बिजू जनता दल) ने फेसबुकवरील जाहिरातींसाठी ८.५६ लाख तर टिडीपी (तेलुगू देसम पार्टी) ने १.५८ लाख आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ५८ हजार ३५५ रूपये फेसबुकवरील जाहिरातीसाठी खर्च केलेले आहेत.

Updated : 9 April 2019 10:47 AM GMT
Next Story
Share it
Top