Home > Election 2020 > काँग्रेसमुक्त महाराष्ट्र......

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र......

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र......
X

कॉंग्रेसमुक्त भारत करण्याच्या भाजपाच्या घोषणेची पुर्तता झाली नसली तरी कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्यात युतीला यश आलंय. गेल्या निवडणूकीत दोन जागांवर विजय मिळवलेल्या कॉंग्रेसला कशीबशी एक जागा राज्यात जिंकता आलीय. या निवडणूकीत राज्यात काँग्रेसचं पतन झालंय. महाराष्ट्रात काँग्रेसला जनतेनं नाकारल्याचं चित्र आहे. सर्वच्या सर्व मतदारसंघात काँग्रेसची धूळधाण झाल्याचं दिसतंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झालाय.

काँग्रेसने निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. मात्र इतर छोट्या राजकीय पक्षाबरोबर आघाडी केली नाही. व्यूहरचना आणि रणनीती न आखता पक्ष निवडणूकांना सामोरं गेला. अनेक नेत्यांना निवडणुकीत जबरदस्तीने निवडणूक लढवण्यास सांगितलं. सक्षम उमेदवाराना तिकीट नाकारण्यात आलं. राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी प्रचार केला नाही. राष्ट्रवादी पक्षानं सुजय विखेंना काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक न लढता राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर लढण्यास सांगितलं. त्यामुळं नाराज झालेल्या विखे पाटलंनी आपल्या मुलाला भाजपमधून निवडणूक लढवण्यास सांगितलं. त्याच्या प्रचारातही मदत केली. त्यांनी काँग्रेसचे स्टार प्रचारक असूनही प्रचार केला नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदार संघात दौरे, सभा केले नाहीत. त्याचा फटका पक्षाला बसला. तिकीट वाटपात सांगलीमध्ये हाच परिपाक दिसून आला. तिकिटाचं वाटप योग्य रीतीनं न केल्याचा फटका काँगेसला बसला. प्रचार योग्य प्रकारे झाला नाही. काँग्रेसनं दलित आणि मुस्लिम मतदारांना नेहमीप्रमाणे ग्राह्य धरलं .आपल्या पारंपरिक व्होट बँकेची मतं पक्षाला मिळतील, असं गृहीत धरून काँग्रेसनं निवडणूक लढली.

या निवडणुकीमध्ये इतर छोट्या राजकीय पक्षाना जागावाटप केलं नाही. राजकीय पटलावर नव्याने उदयास आलेल्या राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं नाही. त्यांच्या होणा-या परिणामाचा विचार पक्षानं केला नाही. बहुजन वंचित आघाडीमुळं संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक दिग्ग्ज नेत्यांना पराभव बघावा लागला. काही ठिकाणी नंबर दोन आणि तीन क्रमांकांची मत वंचितने घेतले. दलित आणि मुस्लिम मतांच ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेडमधून निवडणूक लढण्यास तयार नव्हते. पक्षाने त्यांना निवडणूक लढण्यास भाग पडले. प्रदेशाध्यक्ष असूनही ते स्वतःच्या मतदार संघात अडकून पडले. महाराष्ट्रात कोठेही प्रचार करता आला नाही. मुख्य म्हणजे कॉंग्रेस ही निवडणूक एकसंघपणे लढली नाही. पराभूत मानसिकतेतून लढली गेलेली निवडणूक जिंकणं कठीण होतंच त्याचाच परिपाक म्हणजे महाराष्ट्र कॉंग्रेसमुक्त करण्यात युतीला यश आलं.

Updated : 23 May 2019 3:10 PM GMT
Next Story
Share it
Top