Home > मॅक्स रिपोर्ट > दृष्टीहीन कलाकारांची आर्त हाक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का?

दृष्टीहीन कलाकारांची आर्त हाक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का?

दृष्टीहीन कलाकारांची आर्त हाक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का?
X

कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांचे मोठे हाल होत आहे. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. यातच दिव्यांग लोकांसमोर काय खावं असा प्रश्न आहे. आपल्या वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी कुठं जावं असा सवाल या लोकांना पडला आहे. लॉकडाऊन चे नियम शिथिल झाले काहींच्या हाताला कामही मिळालं. मात्र, कलाकारांना कार्यक्रम घेण्यास अद्यापही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कलाकारांनी इतर काम करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, दृष्टीहीन कामगारांनी काय करायचं असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

आम्ही राज्यातील काही दृष्टीहीन कलाकारांशी तसंच या संदर्भात कार्य करणाऱ्या व्यक्तींची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अमरावतीच्या अंध विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ इंगोले सांगतात... आम्ही आमच्या महाविद्यालयाअंतर्गत सूर संगीत संच चालवतो. त्याअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार, दृष्टी बाधित तरुणांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो. या संस्थेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला एका व्यक्तीला 6000 रुपये मिळत असतात. परंतू संचार बंदीच्या या काळामुळे या तरुणांचा हा रोजगार बंद झाला आहे. आमच्याकडे काही कलाकार असे आहेत की, त्यांच्या कुटुंबात पती आणि पत्नी हे दोघेही दृष्टी बाधित आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे या परिस्थितीकडे शासनाने लक्ष द्यावे आणि आमचे संगीत कार्यक्रम सुरू करावे.अशी मागणी प्राचार्य नवनाथ इंगोले यांनी केली आहे.

कलाकार संजय मसनकर सांगतात... मागच्या वर्षी Covid-19 मुळे सरकारने सर्वत्र संचार बंदी लावली होती. त्या काळात आमचे संगीत कार्यक्रम बंद होते. तरी सुद्धा आम्ही त्या परिस्थितीचा स्वीकार करून सरकारला सहकार्य केले होते. परंतु अद्याप सहकार्य करण्याची आमची क्षमता अजिबात नाही. कारण आता आमची आर्थिक अडचण वाढली आहे. जर आता शासनाने आमच्या संगीत कार्यक्रमांना परवानगी दिली नाही तर... आत्महत्या करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा उपाय नाही.

कलाकार धनंजय लोहोटे यांनी मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करून मी जबाबदार ही मोहीम राबवण्याचे आवाहन केले. मग आम्ही आमची जबाबदारी घेऊन संगीत कार्यक्रम करू शकतो. तरी सुद्धा संगीत कार्यक्रम बंद कशाला? असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे.

दृष्टीहीन कलाकार दत्तात्रय डावरे सांगतात... सरकारने आमच्या संगीत कार्यक्रमांवर बंदी आणली असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. कारण आमच्या उदर निर्वाहाचे संगीत कार्यक्रम हे एकमेव साधन आहे. याचा सरकारने विचार करायला हवा आणि कुठल्याही कलेमुळे आजपर्यंत कोणालाही आजार झाला आहे. असे मी कधीच ऐकले नाही. उलट संगीत या कलेमुळे लोकांच्या नकारात्मक मानसिकतेचे परिवर्तन सकारात्मकतेमध्ये होते आणि आज विविध राजकीय कार्यक्रम आंदोलनं हे तर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. मग अशा ठिकाणी हा आजार नसतो का? आम्ही आमची काळजी घेऊन कार्यक्रम करू त्यामुळे आम्हाला परवानगी देण्यात यावी. अशी मागणी या सर्व दृष्टीहीन कलाकारांनी सरकारला केली आहे...

Updated : 28 Feb 2021 1:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top