News Update
Home > Election 2020 > बांदिवडेकर हटाओ, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीकडे पक्षश्रेष्ठींचं दुर्लक्ष

बांदिवडेकर हटाओ, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीकडे पक्षश्रेष्ठींचं दुर्लक्ष

बांदिवडेकर हटाओ, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीकडे पक्षश्रेष्ठींचं दुर्लक्ष
X

स्वतःला समाजवादी, पुरोगामी म्हणवणाऱ्या काँग्रेसवर अलिकडच्या काळात सॉफ्ट हिंदुत्वाचे आरोप होत आहेत. त्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचंही काही घटनांमधून सिद्ध झालंय. सनातन या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता वैभव राऊत याच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या नवीनचंद्र बांदिवडेकर या उमेदवारालाच काँग्रेसनं रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

कोण आहेत नवीनचंद्र बांदिवडेकर ?

भंडारी समाजाचे नेते म्हणून बांदिवडेकर यांची ओळख आहे. ते अ.भा.भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. २००५ मध्ये बांदिवडेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ३ वर्षांनी ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी भंडारी समाजाचं कार्य करायला सुरूवात केली. एरव्ही भंडारी समाजाच्या कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असलेले बांदिवडेकर अचानक चर्चेत आले ते काँग्रेसनं त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी दिल्यानंतर. कारण बांदिवडेकर यांनी हिंदुत्ववादी संघटनांचा समर्थक असलेल्या वैभव राऊतलला एटीएसनं अटक केली. राऊतच्या घरातून २२ गावठी बॉम्ब आणि जिलेटिनच्या कांड्या एटीएसनं हस्तगत केल्या. त्यानंतर बांदिवडेकर यांनी राऊतच्या समर्थनार्थ नालासोपारा इथं मोर्चाही काढला होता.

सौजन्य : सनातन प्रभात

[button color="" size="" type="square" target="" link=""]वैभव राऊत याच्या समर्थनासाठी १७ ऑगस्ट ला नालासोपारा येथे वसईवासियांकडून काढण्यात येणार्‍या मोर्च्याला नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा पाठिंबा[/button]

काँग्रेसनं उमेदवार बदलावा जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेसनं रत्नागिरी-सिंधुदुर्ग इथला उमेदवार बदलण्याची मागणी करणारं ट्विटच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येचा आरोप असलेल्या सनातन संस्थेशी संबधित वैभव राऊतचं समर्थन करणाऱ्याला काँग्रेसकडून उमेदवारी मिळत असेल तर हे भविष्यातील राजकारणासाठी घातक असल्याचं मत आव्हाड यांनी व्यक्त केलंय.

काँग्रेसनं हा उमेदवार बदलावा ही माझी वैयक्तिक मागणी आहे. सनातनशी संबंधित माणूस धर्मनिरपेक्ष असेल असं मला कधीच वाटत नाही," असं मतही आव्हाड यांनी व्यक्त केलं होतं.

वैभव माझ्या समाजाचा म्हणून त्याला समर्थन नवीनचंद्र बांदिवडेकर

सनातन या संस्थेशी माझा कसलाही संबंध नाही. केवळ तो आमच्या भंडारी समाजाचा असल्यानं त्याला मी समर्थन देण्यासाठी सनातनच्या व्यासपीठावर गेलो होतो. वैभवच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला त्यावेळी भंडारी समाजाचा नेता म्हणून मी त्यात सहभागी झालो होतो.

बांदिवडेकर यांच्या उमेदवारीला आक्षेप का ?

नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेसकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराचा शोध सुरू होता. मात्र, प्रतिमा आणि जातीय गणितामध्ये बांदिवडेकर यांना काँग्रेसनं झुकतं माप दिलं. कारण बांदिवडेकर यांच्या भंडारी समाजाची या मतदारसंघात एक ते दीड लाख मतं आहेत. त्याचा फायदा बांदिवडेकरांच्या रूपानं काँग्रेसला होईल, असा कयास लावण्यात आला आहे. शिवाय काँग्रेसची हक्काची मतं आहेतच. कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचं उघडपणे समर्थन करणाऱ्या बांदिवडेकरांच्या उमेदवारीला स्थानिक काँग्रेस नेते-कार्यकर्ते, राष्ट्रवादीकडूनही विरोध होतोय.

काँग्रेसची भूमिका

बांदिवडेकरांच्या उमेदवारीवर आक्षेप घ्यायला सुरूवात झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खुलासा करत, यासंदर्भात सखोल चौकशी करून पक्षच त्यांच्या उमेदवारीबाबत योग्य तो निर्णय घेईल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच बांदिवडेकर यांची सखोल चौकशी करण्यात आली असून त्यांचा सविस्तर खुलासाही प्राप्त झाला आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत उठलेलं वादळ शमलं असून बांदिवडेकरांची उमेदवारी कायम असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं होतं.

त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बांदिवडेकर यांच्या उमेदवारीबाबत वेगळाच खुलासा केला. चव्हाण म्हणाले, बांदिवडेकर यांच्या उमेदवारीबाबत पक्षाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळं त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाकडून पुनर्विचार होईल, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

सनातनचा साधक असलेल्या वैभव राऊतच्या आई आणि बायकोला पोलिसांनी डांबल होतं. या घटनेनं लोकांमध्ये चिड निर्माण झाली. त्यामुळं बांदिवडेकर हे तिथं गेले होते. वैभवला कायद्यानं काहीही शिक्षा झाली तरी त्यावर मला काहीच आक्षेप नसेल, असं बांदिवडेकर यांनी सांगितल्याचं काँग्रेसचे नेते, खासदार हुसेन दलवाई यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसचे ३० टक्के उमेदवार सनातनशी संबंधित - प्रकाश आंबेडकर

अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील ३० टक्के उमेदवार हे सनातन या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला होता.

बांदिवडेकरांच्या उमेदवारीनंतर काँग्रेसमध्ये बंडखोरी

नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीला स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनीही विरोध केला आहे. बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द न केल्यास स्वतः निवडणूक लढवण्याचा इशारा काँग्रेसचे कसबा संगमेश्वर येथील कार्यकर्ते अकबर खलफे यांनी दिला आहे. खलफे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविली जातेय. बांदिवडेकरांचे सनातनशी असलेले संबंध यापूर्वीच उघड झालेले आहेत. त्यामुळं काँग्रेसनं अशा लोकांना उमेदवारी देणं म्हणजे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यासारखंच आहे, अशी खंत खलफे यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली. मात्र, तरीही काँग्रेसनं बांदिवडेकर यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळं काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्ते बांदिवडेकर यांच्यासाठी मनापासून काम करण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा आहे.

Updated : 2 April 2019 1:23 PM GMT
Next Story
Share it
Top