Home > मॅक्स रिपोर्ट > गवंडी काम करणाऱ्या मजुराची लेक झाली अधिकारी

गवंडी काम करणाऱ्या मजुराची लेक झाली अधिकारी

आज काम मिळाले तर काम उद्याची शाश्वती नाही.. पण शिका संघटीत व्हा संघर्ष करा असा संदेश घेऊन एका गवंड्याची पोरीनं उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आहे. संघर्ष करत या खडतर प्रवासातून मजूराची पोरगी काजल सरवदे अधिकारी झाली आहे, तीच्या प्रवासाच्या यशोगाथेचा अशोक कांबळेचा ग्राऊंड रिपोर्ट...

गवंडी काम करणाऱ्या मजुराची लेक झाली अधिकारी
X

सोलापूर : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यात कामाचा भरोसा नाही कधी काम मिळत असे तर कधी नाही,अशातच गवंडी काम करून संसाराचा गाडा ओढण्याचे काम मसू सरवदे करत होते. आपल्या सारखे हाल आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मसू आणि त्यांच्या पत्नीने काबाडकष्ट करत मुलांना उच्च शिक्षित केले. त्यांना हवे नव्हे ते पुरवले. पण दोघांनी मुलांच्या जीवनात आनंदच निर्माण केला. मसू आणि त्यांच्या पत्नीने पडत्या काळातही मुलांना शिक्षण देण्याचे सोडले नाही. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकच संदेश डोक्यात ठेवला तो म्हणजे शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा. मुलांच्या शिक्षणासाठी वेळप्रसंगी त्यांनी मोलमजुरीचे काम केले. पण मुलांना शिक्षणच दिले आणि अधिकारीही बनवले. मसू सरवदे यांना पाच अपत्ये असून त्यात तीन मुली व दोन मुलांचा समावेश आहे. एवढे मोठे कुटुंब असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कोठेही कमतरता भासू दिली नाही. कधी काळी राहायला झोपडी होती. ही झोपडी पावसाळ्यात गळत असे आणि झोपडीत रस्त्यावरचे पाणी येत असे. घरात लाइटची सोय नव्हती तरीही मूल रॉकेलच्या चिमणीवर अभ्यास करत. काही वेळेस त्यांचे केस ही जळण्याचे प्रकार घडले. पण मुलांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. अशाही कठीण परिस्थितीत दोघा पती-पत्नीन कुटूंबाच्या प्रगतीसाठी काबाडकष्ट करीत संसार उभा केला. त्यात मोठा मुलगा बीएसएफ मध्ये भरती झाला. त्यामुळे आर्थिक प्रगती होण्यास मदत झाली. त्यानंतर त्यांनी झोपडीच्या ठिकाणी दोन खोल्या बांधल्या. सध्या त्यांचा मुलगा आसाम येथे ड्युटी बजावत आहे. तर त्यांची सून पुणे शहर पोलिसात नोकरी करत आहे. त्यांच्या दोन मुलींची लग्ने झाली आहेत. तर शेवटच्या काजलने एम टेक पर्यंत मजल मारत अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली आहे. 2019 साली झालेल्या एमपीएससी च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत तिने यश संपादन केले असून तिची सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे. तिने सेल्फ स्टडी करत हे यश मिळवले आहे. अत्यंत हलखीच्या परिस्थितीतून तिने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. काजलने स्वतः कमवा आणि शिका या योजनेत काम करून शिक्षणाचा खर्च भागवला आहे. काजलचे प्राथमिक शिक्षण बाभूळगाव ता.पंढरपूर येथे झाले असून माध्यमिक शिक्षण रोपळे येथे तर इंजिनिअरिंग पर्यंत चे शिक्षण पंढरपुरात झाले आहे. ती सध्या औरंगाबाद येथे अभियांत्रिकी शाखेत एम टेक करत आहे. एका गवंडी काम करणाऱ्या मजुराच्या लेकीने मिळवलेल्या यशामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





पुण्यातून स्पर्धा परीक्षेला केली सुरुवात

प्राथमिक शिक्षण घेत असताना काजलच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे काम मुख्याध्यापक चौधरी यांनी केले. त्यामुळेच तिच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली. तर केबीपी कॉलेज पंढरपूर येथे शिक्षण घेत असताना तिच्यात गणितामध्ये रुची निर्माण झाली. म्हणून ती अभियांत्रिकी शाखेकडे वळली. अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतल्यानंतर आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आर्थिक संकटाना न घाबरता त्याला कसे सामोरे जायचे याचे मार्गदर्शन तेथील पवार सरांकडून मिळाले. काजलने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तिने थेट पुणे गाठले. तेथे अभियांत्रिकी शाखेचे तिचे सिनियर विद्यार्थी एमपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. तेथून काजलने एमपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. तिने सेल्फ स्टडी करण्यावर भर दिला. त्यावेळी तिला तिच्या अभियांत्रिकीच्या सिनियर मित्रांनी मदत केली. अभ्यासाच्या सुरुवातीच्या काळात ती थोडीशी गोंधळून गेली होती. त्यानंतर तिने अभ्यासावर फोकस करून पुस्तके वाचण्यास सुरुवात केली.





कमवा आणि शिका व शिष्यवृत्ती च्या जोरावर एम टेक पर्यंत मजल

सध्या काजल औरंगाबाद येथे अभियांत्रिकी शाखेत एम टेक करत आहे. ती सांगते की, घरची परिस्थिती नसतानाही कमवा आणि शिका व शिष्यवृत्ती च्या जोरावर एम टेक पर्यंत शिक्षण घेता आले. जेंव्हा ती ग्रॅज्युएट झाली, त्यावेळेस तिचे सीनियर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यामुळेच एमपीएससी च्या परिक्षेकडे वळली. तिने कॉलेज मध्ये आलेले कॅम्पस इंटरव्ह्यू किंवा प्लसमेंट न करता एमपीएससी स्पर्धा परिक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला. सिनियर मित्रांच्या मार्गदर्शनाखाली तिने अभ्यास सुरू केला. एमपीएससी च्या परीक्षेसाठी लागणाऱ्या मटेरियल साठी तिला तिच्या सिनियर मित्रांची मदत झाली. त्यांच्या नोट्स वगैरे यांचा वापर करून काजलने अभ्यास सुरू केला. अभ्यासाच्या काळात तिने सेल्फ स्टडिवर भर दिला.

क्वांटीटी अभ्यासापेक्षा क्वालिटीबाज अभ्यासावर भर

काजलने अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका वगैरे जॉईन केली नव्हती. ती दररोज 7 ते 8 तास अभ्यास करत होती. काजलच्या मते तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा तुम्ही किती परिणामकारक अभ्यास करता हे जास्त महत्वाचे आहे. एमपीएससी चा अभ्यास करताना सगळीच पुस्तके वाचू वाटतात. पण तसे न करता एमपीएससी ने ठरवून दिलेल्या सिलँबस प्रमाणे किंवा प्रिव्हियस प्रश्न पत्रिका यांच्या जोरावर अभ्यास केला पाहिजे. उगीच हे सांगतोय म्हणून ते पुस्तक वापरू दुसरे काही सांगतोय म्हणून दुसरे वेगळेच पुस्तक वाचू, असे करत राहिलो तर आपले जे पाठ आहे, त्यावरूनही आपण भरकटत जातो. त्यामुळे एमपीएससीच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अभ्यास केला की इफेक्टिव्ह होतो. क्वांलिटीबाज अभ्यास होते. यामध्ये क्वांटीटीबाज अभ्यासापेक्षा क्वांलिटीबाज अभ्यासाला महत्व आहे.





जीवनाचा प्रवास करत असताना मार्गदर्शनाची जास्त गरज

आपण जेंव्हा जीवनाचा प्रवास करत असतो. तेव्हा मार्गदर्शनाची जास्त गरज असते. मग तुम्ही मार्गदर्शन घेत असताना क्लास च्या बेसिकवर घ्या. तुमचे सिनियर असतील त्यांच्याकडून घ्या. योग्य मार्गदर्शन मिळाले तर तुम्ही जे ध्येय गाठणार आहात,त्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार आहेत. त्यात तुम्ही कमी कालावधीत यशस्वी व्हाल. अभ्यासाच्या बाबतीत सिनियरकडून मार्गदर्शन घेतले तर तुम्हाला नक्कीच व्यवस्थित माहिती मिळेल. कशा पद्धतीने अभ्यास करायचा याची ही माहिती देतील.

शिक्षण घेत असताना आई-वडिलांचा सपोर्ट जास्त महत्त्वाचा

मुलींनी शिक्षण घेत असताना आई-वडिलांचा सपोर्ट जास्त महत्त्वाचा असतो. समाज वगैरे व इतर बाकीचे लोक म्हणत असतात की, मुलीला एवढे कशाला शिकवता. पण माझ्या आई-वडिलांनी समाजाचा आणि इतरांचा विचार न करता माझ्यावर विश्वास ठेवला. मला सपोर्ट केला आणि त्यामुळेच तर अधिकारी बनू शकले. पालकांनी मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव करू नये. दोघांनाही शिक्षणाची समान संधी दिली पाहिजे. आपल्या संविधानामध्ये शिक्षणाचा हक्क दिला आहे. खरे तर तो त्यासाठीच दिला आहे. आई-वडील मुलींच्या लग्नासाठी पैसे साठवून ठेवतात. आई-वडिलांनी तसे न करता मुलींच्या शिक्षणासाठी तो पैसा खर्च केला पाहिजे. तो खर्च नसून ती एक गुंतवणूक आहे. कारण मुलगी शिकली तर दोन घरे सुधारू शकते. आतापर्यंत च्या इतिहासात मुली व महिलांचे योगदान जास्त आहे. समाजातील विकासामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदभाव नाही केला पाहिजे.





मानसिक तणावातून बाहेर येण्यासाठी पालकांनी मुलांना मदत करावी

नैराशामुळे मुले आत्महत्या करू लागली आहेत. आनंदाच्या यशामध्ये सर्वजण सहभागी होतात,पण अपयशामध्ये खरी साथ दिली पाहिजे. तर ते साथ देणे योग्य आहे. मित्र- मैत्रिणी पेक्षा आई-वडीलानी मुलांना जास्त आधार दिला,तर ती या नैराशातून बाहेर येऊ शकतात. तू एखादी गोष्ट आता नाही करू शकत,पण तू ही गोष्ट करू शकतोस असा विश्वास त्याच्यामध्ये जर निर्माण केला तर ती मुले निश्चितच यशस्वी होतात. त्यामुळे आई-वडिलांचे कर्तव्य पूर्ण करत असताना मुलांबरोबर एक मित्र-मैत्रीण म्हणून संवाद साधला पाहिजे.

अभ्यास करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श ठेवला डोळ्यासमोर

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना काजल सरवदे ने सांगितले की, अभ्यास करत असताना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून अभ्यास केला. खरे तर त्यांना प्रज्ञासूर्य म्हणून ओळखले जाते. भारतीय संविधान त्यांनी लिहले असून संविधान कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे प्रतिनिधित्व करत नाही. त्यात समता, स्वतंत्र, न्याय ही सगळी मूल्ये डोळ्यासमोर ठेवून संविधान माणसाने माणसाबरोबर कस जगायला पाहिजे हे शिकवते. या सगळ्यांचे श्रेय तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते. त्यांच्यामुळेच शिक्षणाचा अधिकार मिळाला. सध्या महिला आणि मुलींना जो मान मिळत आह,तो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच मिळत आहे.

Updated : 24 May 2022 2:24 PM GMT
Next Story
Share it
Top