Home > मॅक्स रिपोर्ट > भाजप नेत्यांकडून ओबीसी नेत्यांची मनधरणी सुरु...

भाजप नेत्यांकडून ओबीसी नेत्यांची मनधरणी सुरु...

भाजप नेत्यांकडून ओबीसी नेत्यांची मनधरणी सुरु...
X

‘12 डिसेंबरला मी तुमच्याशी बोलणार आहे. कुठल्या वाटेवर जायचं आहे. याचा निर्णय घेणार आहे’. अशी भावनिक पोस्ट भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक वर टाकल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत ना? पंकजा मुंडे आपल्या पराभवाचे खापर कुणावर फोडणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याचं यावरून स्पष्ट होतं. म्हणूनच एकनाथ खडसे थेट पंकजा मुंडे यांना भेटायला गेले.

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे असे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये नाराज आहेत. ते वेगळ्या वाटेने जायचा विचार करू करत असल्यानं भाजपला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. हे पाहूनच नाराजांना जवळ करण्याचे प्रयत्न भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची बैठक आज जळगाव होत आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्वतः उपस्थित आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्यासाठी थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून सूचना आल्याचे सांगण्यात येतंय.

जळगावातील बैठक ही संघटनात्मक बैठक असली तरी या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपमधील ओबीसी नेत्यांना बाजूला ठेवून त्यांची टिकीट कापल्यामुळेच भाजप सत्तेत आला नाही. असं खुलेआम मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.

त्याचबरोबर पूर्वाश्रमीचे भाजप आमदार प्रकाश शेंडगे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेऊन ओबीसी नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रकाश शेंडगे यांनी तर गंभीर आरोप केले असून गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढण्यासाठी अनेक नेते सक्रिय होते. असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळं भाजपमधील बहुजन नेत्यांची अस्वस्थता बाहेर पडत असल्याचं समोर आलं आहे.

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वादामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला हव्या त्या प्रमाणात यश मिळालं नाही. विदर्भातही फारसा प्रभाव पडला नाही. एकनाथ खडसे यांना क्लीनचिट मिळूनही त्यांना वेळोवेळी बाजूला ठेवण्यात आलं. त्यामुळे ते नाराज आहेत.

एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे एकत्र झाले तर पक्षाचे नुकसान होईल हे केंद्रीय नेतृत्व ओळखून आहे. त्यामुळे एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत. आजच्या बैठकीत एकनाथ खडसे पक्षाच्या बैठकीत कोणती तोफ डागतात. याकडे भाजप मधील सर्व ओबीसी नेत्यांचे लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी भाजपमधील नेतेच पुढे होते. असं खडसे यांनी खुल्या आम म्हटले आहे. खडसे यांचा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. गेल्या पाच वर्षात आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटेत कोणी येणार नाही. याची दक्षता फडणवीस यांनी घेतली होती. त्यामुळेच भाजपमधील जेष्ठ नेते यांची तिकीट कापण्यात आली. एकनाथ खडसे, विनोद तावडे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होऊ शकतात. हे लक्षात आल्यानं त्यांना तिकीट नाकारण्यात आली. असा आरोप भाजपमधील बहुजन नेते खुलेआम करतात.

शिवसेनेने घेतली फारकत आणि एकटे पडलेले देवेंद्र फडणवीस यामुळे भाजपची अवस्था दयनीय झाली आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना प्रकाश शेंडगे यांनी शिवसेनेत यायचं खुलं आवाहन केलं आहे.

याकडे स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खडसे आणि मुंडे यांची नाराजी दूर करा अशा सूचना दिल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ही नाराजी दूर करण्यात भाजप यशस्वी ठरला तर भविष्यात 105 आमदारांच्या जोरावर सत्तापालट करणं सोपं होऊ शकतं. पण भाजप मधील बहुजन नेते जर इतर पक्षात गेले तर भाजपला पुन्हा उभारी घेणं कठीण होईल. असं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळं युद्धपातळीवर भाजपमधील नाराजांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Updated : 7 Dec 2019 7:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top