Home > मॅक्स रिपोर्ट > बर्ड फ्लू घाबरु नका; पण काळजी घ्या

बर्ड फ्लू घाबरु नका; पण काळजी घ्या

जागतिक महामारी कोरोनाच्या प्रादुर्भावाने अवघं जग बेजार असताना आता बर्ड फ्लूच्या बातम्या येत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेमधे संभ्रम आणि भिती निर्माण झाली असताना बर्डफ्लू बाबत शास्त्रीय माहीती आणि वस्तुस्थिती मांडणारा हा सविस्तर अहवाल....

बर्ड फ्लू घाबरु नका; पण काळजी घ्या
X

कोरोनानंतर आता देशात पुन्हा एक जुना रोग डोकं वर काढतो आहे. या रोगाचं नाव बर्ड फ्लू . जशा बर्ड फ्लूच्या बातम्या येतात, तशा कोंबड्यांच्या पोल्ट्री खाली केल्या जातात, लाखो पक्षांना मारलं जातं, चिकनचे दर एकाएकी खाली उतरतात. उलटसुलट चर्चा सुरु होता, आणि लोकांमध्ये दहशत पसरते. पण, हा रोग आहे तरी काय? हा कोरोनाहूनही अधिक घातक आहे का? आतापर्यंत बर्ड फ्लूमुळं जगभरात किती लोक दगावले आहेत?

सगळ्या पहिला प्रश्न, बर्ड फ्लू आहे तरी काय?

बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुयेन्झा (avian influenza) असंही म्हणतात. जो पक्षांच्या लाळेवाटे, विष्ठेवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले, तरी हा विषाणू इतरत्र पसरु शकतो. ज्या पक्षांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ते पक्षी यामुळे दगावतात. पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात, वा कोंबड्या वा इतर पक्षांची ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते.

बर्ड फ्लूच्या नावातील 'H','N'चा अर्थ काय?

पक्षांमध्ये पसरणाऱ्या फ्लूचे म्हणजेच बर्ड फ्लूचे अनेक उपप्रकार आहेत. त्यातील H म्हणजे हेमाग्युलेटीन (Hemagglutinin) आणि N म्हणजे न्यूरामिनीडिज (Neuraminidase) हे दोन्ही या विषाणूचे प्रोटीन स्ट्रेन आहेत. आणि याच्याच उपप्रकारांना नंबर दिलेले आहेत. H म्हणजेच हेमाग्युलेटीनचे 18 उपप्रकार आहेत, तर N म्हणजेच न्यूरामिनीडिजचे 11 उपप्रकार आहेत. यातील फक्त H5, H7 आणि H10 याच स्ट्रेन माणसाच्या मृत्यू कारण ठरु शकतात. त्यामुळं H5N1 हा माणसांसाठी अधिक धोकादायक मानला जातो.यामधील H17N10 आणि H18N11 हे फक्त वटवाघुळांमध्येच आढळतात. बाकी पक्षांमध्ये याचा प्रसार होत नाही.

बर्ड फ्लू सर्वात आधी कुठे आढळला, आणि त्याचा इतिहास काय?

१९०० च्या दशकात इटलीमध्ये सर्वात आधी हा फ्लू आढळला होता. त्यानंतर 1961 मध्ये दक्षिण आफ्रिकेत या फ्लूमुळे लाखो पक्षी संक्रमित झाले. डिसेंबर 1983 ला पेन्सिलवेनिया आणि व्हर्जिनियात या फ्लूनं थैमान घातलं. त्यानंतर 50 लाख कोंबड्या आणि बदकांना मारण्यात आलं. 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये 18 लोकांना हा फ्लू झाला. त्यातील 5 लोकांचा मृत्यू झाला. बर्ड फ्लूमुळे मृत्यू होण्याची ही जगातील पहिलीच घटना होती. त्यानंतर हाँगकाँगमद्ये तब्बल 15 लाख पक्षांना मारण्यात आलं. 2003 साली नेदरलँडमध्ये 84 लोकांना H7N7 या नवी स्ट्रेनचा फ्लू झाला, त्यातील एकाचा मृत्यू झाला.

31 जुलै 2012 ला H3N8 या नव्या फ्लूच्या स्ट्रेनमुळं तब्बल 160 सील माशाच्या पिलांच्या मृत्यू झाल्याचं शास्रज्ञांनी उघड केलं. 2019 ला जगभरात तब्बल 1568 लोकांना या फ्लूची लागण झाली,तर त्यातील 616 लोक दगावले, हा H7N9 प्रकारातला फ्लू होता.

भारतातील बर्ड फ्लूचा इतिहास काय?

2006 साली पहिल्यांदा महाराष्ट्रातच बर्ड फ्लूनं संक्रमित पक्षी आढळले होते. महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणाऱ्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची नोंद झाली होती. त्यावेळी राज्यभरात तब्बल अडीच लाख कोंबड्या मारल्या गेल्या. तर 5 लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली. या संक्रमण काळात कुठल्याही मृत्यूची नोंद सापडत नाही

बर्ड फ्लूची लक्षणं काय?

बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो

बर्ड फ्लूवर औषध आहे का?

बर्ड फ्लूवर औषध उपलब्ध आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. त्यामुळं बर्ड फ्लू आल्यानंतर सरकार टॅमी फ्लूच्या (tamiflu) गोळ्यांचा साठा करणं सुरु करतं. याशिवाय रेलेन्झा (relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये. कारण, टॅमी फ्लूसह इतर गोळ्यांची दुष्परिणामही होऊ शकतात.

बर्ड फ्लू- अफवा आणि वास्तव

2006 पासून दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात बर्ड फ्लूच्या अफवा उठतात, त्याचा परिणाम थेट पशूपालन आणि पोल्ट्री उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांवर होतो. कोंबड्यांचे दर पडतात. लाखो कोंबड्या मारल्या जातात, आणि लाखो शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. बर्ड फ्लूमुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पाहिलं तर ते अतिशय कमी आहे. मात्र, त्याचा प्रसार होऊ न देणंही गरजेचं आहे. त्यामुळंच या सगळ्यामध्ये सुवर्णमध्य साधणं गरजेचं आहे. खरंच आपल्यापर्यंत बर्ड फ्लू आला आहे का? आणि आला असेल तर कुठली काळजी घ्यायला हवी हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण, आस्मानी-सुलतानी संकटानंतर शेतकऱ्याचं सर्वाधिक नुकसान कुठली गोष्ट करत असेल तर ती आहे अफवा.

कोरोनाला आपण जितकं गांभीर्यानं घ्यायला हवं होतं, तितकं सुरुवातीला घेतलं गेलं नाही, मात्र, जेव्हा बर्ड फ्लूचा प्रश्न येतो, तेव्हा तातडीनं पावलं उचलली जातात. जी अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र, बर्ड फ्लू लगेच सगळ्या राज्यात पसरला असं होत नाही. ज्या राज्यात सध्या बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आली आहेत, तिथल्या प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, गुजरातमध्ये पशूसंवर्धन विभागानं हायअलर्ट जारी केला आहे. त्यामुळं घाबरुन न जाता, अफवांना बळी न पडता तथ्य़ जाणून घेणं जास्त गरजेचं आहे.

पलूस जि. सांगली येथील शेतकरी संदिप येवले म्हणाले, कोरोना सुरवातीच्या काळात सर्वप्रथम पोल्ट्री उद्योगाला फटका बसला. त्यानंतर लोकांचे प्रबोधन झाल्यानंतर मागणी वाढली. परीस्थिती आता कुठे पूर्वपदावर येत असताना पुन्हा एकदा बर्डफ्लूच्या बातम्या आल्या आणि पुन्हा एकदा पोल्ट्री उद्योगाला फटका बसला आहे, आता ४० टक्क्यांनी लिफ्टींगचे दर पडले आहेत. उत्पादन खर्च प्रतिकिलो ६५ रुपये असताना साठ रुपये दर मिळत आहेत.कोणीही माल उचलायला तयार नाही. बर्डफ्लूच्या केसेस परभणीमधे आढल्यात परंतू संपूर्ण महाराष्ट्रातील पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

बर्डफ्लूची शास्त्रीय माहीती देताना पोल्ट्रीशास्त्रज्ञ डॉ. माणिक धुमाळ म्हणाले, बर्डफ्लू हा पक्षांचा रोग आहे. अपवादात्मक परीस्थितीमधे या मानवामधे प्रादुर्भाव होत आहे. भारतात आजपर्यंत अशी कोणतीही केस आढळून आली आहे. परभणीत सापडलेले सॅम्पल बर्डफ्लू पॉझीटिव आहे. घाबरुन जाण्याची गरज नाही. बर्डफ्लूमुळे पोल्ट्री उत्पादकांचे मोठे नुकसान होते. मोठ्या प्रमाणात पक्षाची मर असते. मागणी नसल्याने विनाकारण खाद्य देऊन पक्षी जगवावे लागते. लोकांमधे अफवा पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात अंडी आणि चिकनची मागणी घटून आर्थिक नुकसान होते.

पोल्ट्री अभ्यासक दीपक चव्हाण म्हणाले, बर्डफ्लू बाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यांचे पालन केले जात नाही.

केंद्र सरकारनेही आज पोल्ट्री लिफ्टींगवर बंदी घालू नये असे आदेश दिले आहे. २००६ मधे महाराष्ट्रातील नवापूरमधे बर्डफ्लू आढळल्यानंतर देशभरातील कोंबड्या मारल्या. त्यानंतर २००८-०९ पासून आपण झोन पध्दती तयार केली. त्यानंतर बर्डफ्लूच्या उद्रेकासाठी सर्व कोंबड्या न मारता झोनींग पध्दतीने पक्षी मारले जाते. केंद्र आणि राज्याच्या धोरणकर्त्या संस्थांमधे समन्वय नसतो. देशात परसबागेतील पोल्ट्री ही अनियंत्रीत असते. परंतू व्यावसायिक पोल्ट्री ही नियंत्रीत व्यवस्थेत केली जाते. प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात अतिरंजीत वृत्तांकन केल्यामुळं मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायाचे नुकसान होते. या केंद्र सरकार पोल्ट्री व्यवसाय बंधने आणु नयेत असे सांगत असताना राज्य सरकारं मात्र राज्या-राज्यामधे बंधन आणत आहेत, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

परभणीतील बर्डफ्लूच्या उद्रेकाची दखल घेऊन पशुसंवर्धन विभाग आणि विद्यापीठाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशानं एका किलोमीटरचे पक्षी मारण्यात आले. जैवसुरक्षेसाठी आवश्यक काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. लसीकरण आणि माहीतीचे देखील प्रसारण करण्यात आल्याचे डॉ. धुमाळ यांनी सांगितले. शासकीय प्रोटोकोल बरोबरच प्रसारमाध्यमांनी बर्डफ्लू सारख्या रोखाचे वृत्तांकन करताना प्रोटोकोल घालून दिला पाहीजे.

संरक्षित पोल्ट्री फार्मिंगमधे जैवसुरक्षीत वातावरणात उत्पादन होत असताना देशपातळीवर एकसमान धोरण निश्चित केले जाते. बर्डफ्लूचा फटका केवळ पोल्ट्री उद्योगाला बसत नसून मका आणि सोयाबीनच्या उद्योगाचे मोठे नुकसान होते. या संकटामुळे छोटा पोल्ट्री उत्पादक शेतकरी संपत आहे. कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर बर्डफ्लूची इंत्यभुत माहीती उपलब्ध नाही, असे दीपक चव्हाण म्हणाले.

बर्डफ्लू हा रोग स्थलांतरीत पक्षांच्या माध्यमातून प्रसारीत होतो. व्यावसायिक पोल्ट्रीमधे याचा प्रादुर्भाव होत नाही. बर्डफ्लू आल्यानंतर चिकन आणि अंडी घावीत का असा प्रश्न उपस्थित राहतो. ७० डीग्री तापमानामधे बर्डफ्लूचा वायरस जिवंत राहत नाही. आपली खाद्यसंस्कृती शिजवून खाण्याची आहे. त्यामुळे शिजवलेले चिकन आणि उकडलेल्या अंड्यातून संक्रमण होत नाही, असे ड़ॉ. माणिक धुमाळ म्हणाले. सरकारी पातळीवर बर्डफ्लूचे जनजागरण करण्याची गरज आहे. ताबडतोब पॅकेज मिळेल अशी अपेक्षा नाही. परंतू शासकीय पातळीवर चिकनचा खप वाढेल यासाठी प्रबोधन करण्याची गरज असल्याचे पोल्ट्री उत्पादक शेतकरी संदिप येवले म्हणाले.

२००६ मध्ये नवापूरमधील बर्डउद्रेक वार्तांकन केलेले पत्रकार सुभाष शिर्के म्हणतात, आम्ही नवापूर, नंदूरबार चा बर्ड फ्लू कव्हर केला होता. बहुतेक पत्रकार- आरोग्य अधिकारी सगळे जण तेव्हा सुरत वरून ये-जा करायचे किंवा नवापूर च्या बाहेर राहायचे. नवापूरलाच एका पोल्ट्री शेजारच्या हॉटेलमध्ये राहिलो. रोज चिकन खायचो. दिवसा-रात्री खूप फिरलो. हॉटेलचा मालक हौशी तरूण मुलगा होता. ज्या तापमानाला आपण चिकन शिजवतो त्या तापमानात कुठलाच व्हायरस जिवंत राहत नाही त्यामुळे बिनधास्त खा अशी त्याची थिअरी होती. तेव्हा सुरक्षेच्या उपायांची इतकी जागरूकता नव्हती. पीपीई किट ही उपलब्ध नव्हते सर्वांसाठी. आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांकडून उरलेले किट मागायचो. फक्त लाइव्ह पुरतं वापरायचं. खूप तापमान होतं म्हणून नंतर ते ही वापरणं बंद केलं. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खूप कोंबड्या मान पिरगळून मारून टाकल्या गेल्या. हा बर्ड फ्लू फेक होता, पोल्ट्री व्यवसाय संपवण्यासाठी गाजावाजा केला गेला वगैरे वगैरे खूप थिअरी आल्या नंतर पुढे. मग चिकन खाण्याचे जाहीर कार्यक्रम आणि स्पर्धा ही झाल्या. छोट्या छोट्या कालखंडाने इतिहास असा रिपीट होत राहतो, ते आता आपण पाहतोय असं ते म्हणाले.

राज्यात फक्त परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यात इतरत्रं बर्ड फ्ल्यू झाल्याचं अद्याप निदान झालेलं नाही. त्यामुळे चिकन, अंडी खाऊ शकता. येऊ पाहत असलेला बर्ड फ्ल्यू हा तेव्‍हासारखा भयावह असल्याचे सध्यातरी दिसत नाहीये. त्यामुळे राज्यातील जनतेने विशिष्ट तापमानावर शिजवलेले चिकन आणि अंडी खाण्यास काहीही हरकत नाही, असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले. परभणीतून घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल आला असून तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. याबाबत मंत्री केदार म्हणाले, अंडी किंवा कोंबड्यांना विशिष्ट तापमानावर अर्धा तास शिजविले, तर त्यामधील जिवाणू मरतात. या महाराष्ट्राने अशा प्रकारचा कहर २००६ मध्ये पाहिला आहे.

त्यावेळी राज्य शासनाने केंद्र शासनाची वाट न पाहता पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा हात दिला होता. यंदाही राज्य शासनाची तीच भूमिका राहील, असेही केदार म्हणाले. मोठे पिट्स खोदतो. त्यामध्ये औषधे टाकून कोंबड्या टाकतो. तेच आपण यावेळीही करणार आहोत. मात्र, पोल्ट्री धारकांनी आम्हाला याबाबत माहिती द्यावी. २००६ मध्ये आलेला बर्ड फ्ल्यू आणि यंदाचा बर्ड फ्लूमध्ये फरक आहे. यंदा कोरोनाचेही संकट आहे. त्यामुळे सर्वांनी शासनाला माहिती द्यावी, असेही पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले. बर्ड फ्लू या नावाने ओळखल्या जाणारा आजार कोंबड्या, बदके, गीस यासारख्या प्रजातीमध्ये दिसून येतो. बर्ड फ्लू इन्फ्लूएजा असे याचे नाव असून हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे न शिजवलेले मांस तसेच अन्य कोणतेही पोल्ट्री उत्पादन कच्च्या स्वरूपामध्ये खाऊ नये. मांस शिजवण्यासाठी वेगळी भांडी वापरावी, बर्ड फ्लूच्या संसर्गामध्ये मासांहार करणे टाळावे, तसेच संक्रमित भागामध्ये मास्कचा वापर करावा, हात कोमट पाणी व साबणाने स्वच्छ धुवावे. कच्ची अंडी खाऊ नयेत, अर्धेकच्चे मांसही सेवन करू नये. मांसाहार करायचा असेल, तर ते पूर्णपणे शिजवावे, कच्च्या स्वरूपातील 'रेडी टू इट' पदार्थांचे सेवन टाळावे, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने ५ डिसेंबर रोजी दिले आहे.

शेतीला कुक्कुटपालन व्यवसायाने मोठा आधार दिला आहे. या व्यवसायातून १ लाख कोटीची उलाढाल व १० कोटी लोकांचा रोजगार अवलंबून आहे.'जीडीपी'मध्ये पोल्ट्री उद्योगाने आपला हिस्सा अधोरेखित केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाच ३० हजार कोटी, राज्याला २ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे मका, सोयाबीन उत्पादन, वाहतूकदारांच्या रोजगारावर परिणाम होतो. त्यामुळे सुजाण नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, अपप्रचारला बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर्स असोशिएशनचे सचिव उद्धव अहिरे यांनी केले.बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पदुम विभागाला दिले आहेत. पशुसंवर्धन विभागाने ७ जानेवारीपासून नियंत्रण कक्ष स्थापित केला असून मृत पक्षांची माहिती घेणे सुरू आहे. बर्ड फ्लू संदर्भांत परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतला आहे.

Updated : 13 Jan 2021 12:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top