Home > Top News > ‘ठाकरे’ ब्रँडचे पतन म्हणजे मुंबईचे पतन – संजय राऊत

‘ठाकरे’ ब्रँडचे पतन म्हणजे मुंबईचे पतन – संजय राऊत

कंगना रानावत आणि अर्णब गोस्वामी यांच्याशी सध्या राज्य सरकार आणि शिवसेनेचा संघर्ष गंभीर वळणावर पोहोचला आहे. पण मुंबईबाबतची टीका हा एका मोठ्या कटाचा भाग असल्याचे सांगत संजय राऊत यांनी कंगना आणि अर्णबविरोधात मराठी माणसाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

‘ठाकरे’ ब्रँडचे पतन म्हणजे मुंबईचे पतन – संजय राऊत
X

सुशांत सिंह प्रकरणावरुन अभिनेत्री कंगना रानावत आणि अर्णब गोस्वामी यांनी सातत्याने राज्य सरकावर हल्ला केला आहे. कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकिस्तानशी केलीये तर अर्णबव गोस्वामीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अरे तुरे केले आहे. हा संघर्ष चिघळलेला असताना आता संजय राऊत यांना सामनाच्या रोखठोक सदरातून गंभीर आरोप केले आहेत. कंगना आणि अर्णबच्या माध्यमातून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा कट आखला गेला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसंच या कटाविरोधात आता मराठी माणसाने एकत्र येण्याची वेळ आली आहे असे आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे. या सदरात काय म्हटले आहे ते पाहूया...

मुंबईविरुद्ध कट

“मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे; मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक यांच्या मागे कोण आहेत? महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. हे ग्रहण ‘उपरे’ लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्य़ा एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने कारवाई करताच महापालिकेचा उल्लेख ‘बाबर’ असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवे.

काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका

मुंबईविरोधात 60-65 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पद्धतशीर कारस्थाने केली. त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी माणसाने संयुक्त महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवला. भाजपचे एक प्रमुख नेते श्री. आशीष शेलार यांचे असे म्हणणे आहे की, ‘ज्या काँग्रेसने मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत कशी?’ भाजप नेत्यांचा इतिहास कच्चा आहे. श्री. मोरारजी देसाई त्या वेळी मुख्यमंत्री होते. गोळीबाराचे आदेश त्यांचेच होते. देसाई यांच्या आदेशाने जशी मुंबईत मराठी माणसे शहीद झाली तशी गुजरातमध्येही 16 गुजराती बांधव शहीद झाले. आता इतिहास असे सांगतो की, हेच मोरारजी देसाई पुढे काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी स्वतःची वेगळी काँग्रेस काढली. हेच देसाई पुढे देशाचे पंतप्रधान झाले व त्यांच्या मंत्रिमंडळात श्री. अटलबिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण आडवाणींपर्यंत सर्व जनसंघीय दिग्गज सामील झालेच होते. खरे तर हा इतिहास आता खरवडून कशासाठी काढायचा? प्रत्येक इतिहासाला एक काळी बाजू असतेच.

काँग्रेसने म्हणजे मोरारजी देसाई यांनी गोळीबार केला त्याच्या निषेधार्थ केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा पंडित नेहरूंच्या तोंडावर फेकणारे चिंतामणराव देशमुख हेसुद्धा तेव्हा काँग्रेसवालेच होते व महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सक्रिय समर्थक होते.

मुंबईचे महत्त्व, मुंबईचे वैभव कमी केले की महाराष्ट्राचे आपोआप पतन होईल, असे ज्यांच्या मनात आहे ते मराठी माणसाला कमी लेखत आहेत. पु. रा. बेहेरे यांनी एकदा म्हटले आहे, ‘मुंबईला निसर्गानेच महाराष्ट्राच्या बाहुपाशात ठेवले आहे. भूगोलानेच तिला महाराष्ट्राच्या अंगावर बसविले आहे.’ हा भूगोल बिघडवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले तेव्हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे ‘जंतर मंतर’ प्रयोग सुरू झाले. ते आजही सुरूच आहेत.

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर हवा, राज ठाकरेंना साद

मुंबईस पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय रजपूत, क्षत्रिय मते मिळविण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल. हे धोरण ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाऱ्य़ांना शोभणारे नाही. महाराष्ट्राचा अवमान केला म्हणून दिल्लीतील एकाही मराठी केंद्रीय मंत्र्यास वाईट वाटले नाही तेथे संतापून राजीनामा वगैरे देण्याची बातच सोडा. ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल.

कंगनाबाबत बॉलिवूड गप्प का?

मुंबईला पाकिस्तान बोलायचे व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिकल स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ? संपूर्ण नव्हे, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठय़ा कलावंतांनी तरी समोर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. मुंबईने प्रत्येकाला दिले आहे. पण मुंबईबाबत कृतज्ञता व्यक्त करताना अनेकांना यातना होतात. जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात. मुंबईचे महत्त्व फक्त ओरबाडण्यासाठी व पैसे कमवण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळय़ांनी एक लक्षात घेतले पाहिजे, ‘ठाकरे’ यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून मराठी अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. जेव्हा जेव्हा मुंबईला डिवचले तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने प्रतिकार केला

Updated : 13 Sep 2020 6:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top