Home > मॅक्स रिपोर्ट > भीमा नदीला येणाऱ्या वारंवार पुरामुळे भुई समाजाची पुनर्वसनाची मागणी

भीमा नदीला येणाऱ्या वारंवार पुरामुळे भुई समाजाची पुनर्वसनाची मागणी

भीमा नदीला न वारंवार येणाऱ्या पुराच्या पाण्याचा फटका नदीकाठी राहणाऱ्या पिराची कुरोली येथील भूई वस्तीवरील नागरिकांना होत असून शासनाकडे मागणी करून देखील पुनर्वसन केले जात नसल्याची खंत नागरिकांतून व्यक्त केली जात आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट..

भीमा नदीला येणाऱ्या वारंवार पुरामुळे भुई समाजाची पुनर्वसनाची मागणी
X

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीला वारंवार पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकातून संताप व्यक्त करण्यात येत असून येथील लोकांचा जीव सातत्याने टांगणीला लागलेला असतो. पुरामुळे नदीकाठच्या लोकांचे जनजीवन विस्कळित होत असून यामुळे नदीकाठी असणाऱ्या शेती पिकावर देखील मोठा परिणाम पहायला मिळत आहे. नदीला वर्षानुवर्षे पुर येत असल्याने अनेक गावांचे पुनर्वसन देखील झाले असून या पाण्यामुळे नदी पात्रात व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना देखील याचा फटका बसला आहे. त्यांच्या रोजीरोटी वर परिणाम झाला असून आर्थिक कोंडीत सापडले आहेत. तसेच होडीतून भाविकांना नदीच्या पाण्यातून पलीकडे सोडणाऱ्या होडी व्यवसायिकांवर देखील या पुराच्या पाण्याचा परिणाम झाला आहे.

नदीला वारंवार येणाऱ्या पुराच्या पाण्याचा फटका नदी काठी राहणाऱ्या पिराची कुरोली येथील भूई वस्तीवरील नागरिकांना होत असून शासनाकडे मागणी करून देखील पुनर्वसन केले जात नसल्याची खंत नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. भूई वस्ती नदीपासून काही अंतरावर असून नदीला पाणी आल्यास पुराच्या पाण्याचा या वस्तीला चौहोबाजूंनी वेढा पडतो. पुरामुळे या वस्तीच्या खालच्या बाजूनेही पाणी असते तर वरच्या बाजूला ओढा असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी असते. वस्तीच्या खालच्या बाजूला भीमा नदी असून पुराच्या पाण्यामुळे कोठेच पळता येत नाही. वरच्या बाजूने पाण्यातून निघायचे म्हटल्यास ऊस मोठ्या प्रमाणत असतो यातून कसा बसा रस्ता काढत जावे लागते. नदीला वारंवार पूर येत असल्याने भूई वस्तीवरील नागरिकांनी शासनाकडे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. याकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टीने बघावे,असे नागरिकांना वाटत आहे.

जागेअभावी भुई समाज राहतोय नदीच्या काठी

पिराची कुरीली येथील भुई समाज हा प्रामुख्याने मासेमारी करून आपली उपजीविका करत आहे. या समाजातील काही लोकांकडे थोड्याफार प्रमाणात जमिनी आहेत. तर काही लोकांकडे जमिनी नाहीत. शासनाकडे वारंवार पुनर्वसनाची मागणी करूनही देखील शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. येथील नागरिकांची शेती प्रामुख्याने नदी काठी असल्याने सर्वत्र उसाची शेती असून भीमा नदीला बारमाही पाणी असल्याने या ठिकाणी मासेमारी हा व्यवसाय तेजीत चालतो. नदीला सातत्याने पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने येथील काही लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे,तर काही लोकांची मागणी असून देखील पुनर्वसन होत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नदीकाठी राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊनच दिवस काढावे लागतात. पावसाच्या दिवसात नदीला कधी पाणी येईल हे सांगता येत नसल्याचे नागरिक सांगतात. प्रशासनाकडून पुराच्या बाबतीत सूचना देण्यात येतात. पण रात्री-बेरात्री अचानक पाणी आल्यास जाणार कोठे असा प्रश्न आम्हाला पडतो,असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

भुई समाजाने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात काय म्हटले आहे

पिराची कूरोली येथील भुई समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून या निवेदनात त्यांनी म्हटले आहे,की पिराची कुरोली येथील भुई वस्ती,लामकाने वस्ती, मानभाऊ वस्ती,जुने गावठाण,गांधीनगर भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती व बागायती शेती आहे. बिमना नदीला वारंवार पूर येत असून सदरच्या पुरामुळे वरील वस्तीवरील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वस्त्यावरील लोकांचे पुनर्वसन करण्याकरिता पर्यायी रस्त्यांची आणि जागेची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात यावी. अशी मागणी येथील नागरिकांची आहे.

नदीला पूर आल्यास वस्तीवरील लोकांची होते कोंडी

भीमा नदीला पूर आल्यास भुई वस्ती आणि इतर वस्त्यावरिल नागरिकांची तारांबळ उडून धावपळ होते. जनावरे घेवून जायची कोठे असा ही प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होतो. पुराच्या पाण्यात दुभत्या जनावरांचे नुकसान झाल्यास शासन म्हणाव्या तेवढ्या प्रमाणत नुकसान भरपाई देत नाही. पिकांचे ही मोठ्याप्रमाणात नुकसान होते. घरात पुराचे पाणी शिरते त्यामुळे घरातील खाद्य अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान होवून मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते. पुराचे पाणी नदीत किती दिवस राहील याची शास्वती नसते. त्यामुळे घरात चिखल साठून राहतो. पूर ओसरल्यानंतर घराची साफ सफाई करताना नाकीनऊ येत असल्याचे नागरिक सांगतात. पुराच्या पाण्यामुळे सातत्याने या वस्तीवरील नागरिकांची कोंडी होत असून यावर प्रशासन आणि शासनाने लवकर तोडगा काढावा,असे येथील नागरिकांना वाटत आहे.

शासनाने रस्त्यांची सोय करून द्यावी

नदीला पूर आल्यास घरांच्या चार ही बाजूने पाण्याने वेढा पडतो. त्यामुळे अशा वेळी सर्वच रस्ते बंद होतात. वस्त्यांच्या वरच्या बाजूस असणाऱ्या उसाच्या शेतीतून मार्ग काढत सुरक्षित ठिकाणी जावे लागते. वरच्या बाजूला असणारे शेतकरी काही वेळेस उसाच्या शेतीचे नुकसान होत असल्याचे कारण देत शेतातून जावू देत नाहीत. त्यामुळे कोंडी होते. नदीला पूर आल्यास शासनाने बाहेर निघण्यासाठी रस्त्यांची सोय करून द्यावी. या पुराच्या पाण्यात महिला आणि लहान मुले देखील अडकली जातात. प्रशासन पुराची सूचना देते,पण सर्वच जाग्याला सोडून जातात येत नाही किंवा सर्वच साहित्य बरोबर घेवून जाता येत नाही. त्यामुळे आमची वर्षानुवर्षे आबळ होत आहे. शासनाने आमच्या मागणीचा विचार करून कायमस्वरूपी पुनर्वसन करावे. असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मागणीचा विचार नाही केल्यास विविध प्रकारची आंदोलने करणार

पुनर्वसनाच्या मागणीचा विचार नाही झाल्यास ग्रामपंचायती पासून ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध प्रकारची आंदोलने करण्याचा येथील ग्रामस्थांनी इशारा दिला आहे. ग्रामपंचायतीने ही पुनर्वसनाचा ठराव केला असल्याचे नागरिक सांगतात. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केल्यास पुनर्वसनासाठी शासकीय जागा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आमची कोंडी झाली आहे. प्रशासनाने आम्हाला कोठेही जागा दिल्यास आम्ही तेथे राहण्यास जावू,असे भुई वस्तीवरील नागरिकांनी बोलताना सांगितले.

Updated : 13 Oct 2022 6:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top