Home > मॅक्स रिपोर्ट > भेळवाल्यालाही महागाईचा फटका...

भेळवाल्यालाही महागाईचा फटका...

मोठ्या कष्टाने पडत्या काळात उभारलेल्या भेळच्या व्यवसायाला सध्या वाढत्या महागाईच्या झळा बसल्या आहे. पूर्वी या व्यवसायातून जेवढा नफा मिळत होता,तो आता मिळत नसल्याचे भेळ व्यवसायीक सांगत आहेत, भेळवाल्यांच्या वेदना मांडणारा प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट...

भेळवाल्यालाही महागाईचा फटका...
X

वाढत्या महागाईचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला असून त्याचा परिणाम सण आणि उत्सवावर देखील पहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी लोक एक किलो पदार्थ खरेदी करून सण आणि उत्सव साजरे करत होते, त्याठिकाणी अर्धा किलो पदार्थ विकत घेवून सण साजरे करू लागले आहेत. वाढत्या महागामुळे लोकांच्या खरेदीत फरक पडला असून या महागाईचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे.

या महागाईचा विपरीत परिणाम सर्वसामान्य लोकांवर झाला असून त्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल, आणि डिझेलच्या किंमतीमुळे वाहतूक व्यवसायावर परिणाम होवून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या वाहतूक व्यवसायावर ही या महागाईचा परिणाम झाला आहे. त्यामुळेच वस्तूंच्या भाडेवाढीत वाढ झाली आहे. या भाडेवाढीचा भार समाजातील सर्वात खालच्या स्थरात असणाऱ्या घटकाला सोसावा लागत आहे.

सरकारने सर्वच वस्तूंना जीएसटी लागू केल्याने यातून जीवनावश्यक वस्तूंची देखील सुटका झालेली नाही. वाढत्या जीएसटीचा भार थेट वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर येवून पडत असल्याने सणा सुदीच्या काळात होणाऱ्या खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे. यातून छोटे व्यवसायिक देखील सुटले नाहीत. असाच परिणाम भेळच्या व्यवसायावर देखील पहायला मिळत असून मोठ्या कष्टाने पडत्या काळात उभारलेल्या भेळच्या व्यवसायाला सध्या वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. पूर्वी या व्यवसायातून जेवढा नफा मिळत होता,तो आता मिळत नसल्याचे भेळ व्यवसायिक सांगतात.

सोलापूर जिल्ह्यातील मध्यभागी असणाऱ्या मोहोळ रेल्वे स्टेशन परिसरात संजय देशमुख यांचे संजय भेळ नावाने छोटा भेळ विक्रीचा व्यवसाय असून या व्यवसायाच्या जोरावर त्यांनी मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले आहे. याच व्यवसायाने त्यांना आयुष्यात उभे राहण्यासाठी मोलाची मदत देखील केली आहे. सध्या त्यांच्या या भेळच्या व्यवसायात त्यांना मदत करण्यासाठी तीन ते चार कामगार त्यांच्या दुकानात काम करत आहेत. त्यांना रोजच्या रोज पगार द्यावा लागत आहे. पूर्वी ज्या प्रमाणात भेळ खाण्यासाठी लोक येत होते,त्या प्रमाणात ग्राहक आता वाढत्या महागाईमुळे येईना गेले आहेत.

भेळ बनवण्यासाठी लागणाऱ्या तेल,काकडी,टोमॅटो,चुरमुरे,फरसाण,मसाला आणि इतर वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याने भेळच्या किंमतीत ही वाढ करावी लागली आहे. त्यामुळे ग्राहकांचा ओढा पूर्वी जसा भेळ खाण्यासाठी येत होता,तो आता येताना दिसत नसल्याचे देशमुख सांगतात. या वाढत्या महागाईवर शासनाने नियंत्रण मिळावे,असे त्यांना वाटत असून येणाऱ्या काळात अशीच महागाई वाढत राहिली तर भेळचा व्यवसाय बंद करावा लागेल,असे ते सांगतात.

भेळच्या व्यवसायातून फक्त घर चालवण्यापुरते मिळतात पैसे

भेळ व्यवसायिक संजय देशमुख सांगतात, की शिक्षण झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मुंबईला कामासाठी गेलो,परंतु त्याठिकाणी राहण्याची,जेवणाची अडचण होवू लागल्याने पुन्हा गावाकडची वाट धरली. गावात आल्यानंतर काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. पुण्यात माझा एक मित्र राहत होता. त्याच्याकडे जाणे-येणे असायचे. तो पुण्यातील शिवाजी नगर भागात राहत होता. याच ठिकाणी एक वृद्ध व्यक्ती भेळ विकत असायचा. या वृद्ध व्यक्तीची भेळ खाण्यासाठी लोकांची रांग लागलेली असायची. पण लोक रांगेत थांबून या वृद्ध व्यक्तीकडून भेळ घेवून जात असत. यानंतर गावाकडे आल्यानंतर मी ही तश्या प्रकारचा व्यवसाय सुरू करण्याचा मानस केला आणि सुरुवातीला टपरीच्या स्वरूपात व्यवसायाला सुरुवात केली.

त्यानंतर या टपरीत भेळ चालू केली. सुरुवातीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळी पाच ते सात रुपयाला भेळ होती. वाढत्या महागाईमुळे सध्या एका भेळ ची किंमत तीस रुपये झाली आहे. काही वर्षापूर्वी आजूबाजूच्या गावचे लोक याठिकाणी भेळ खाण्यासाठी येत असत आणि भेळ खाल्ल्यानंतर घराकडे जाताना पार्सल भेळ घेवून जात असत. पण आता वाढत्या महागाईमुळे लोकांचे आर्थिक बजत बिघडले असल्याने या भेळच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. आता भेळ खायला येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. पूर्वी जेवढा नफा मिळत होता तो आता मिळत नाही. वाढत्या महागाई च्या काळात फक्त घर चालवण्यापुरते पैसे मिळत आहेत.

भेळसाठी लागणाऱ्या साहित्याची वाढल्या किंमती

भेळसाठी तेल,चुरमुरे,फरसाण,कांदा,काकडी, टोमॅटो,मसाला त्याचबरोबर इतर पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ भेळ मध्ये वापरल्याने भेळ अधिक रुचकर होते. या भेळ मध्ये प्रामुख्याने टोमॅटो स्वास चा वापर देखील केला जातो. यामुळे भेळ अधिक रुचकर होत,असल्याचे संजय सांगतात. वाढत्या महागाईमुळे खाद्य तेलांच्या किंमतीत वाढ झाली असून त्याचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. त्याचबरोबर टोमॅटो,काकडी,फरसाण,मसाला यांच्याही किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे भेळच्या किंमतीत वाढ करावी लागली आहे. महागाईचा या व्यवसायावर परिणाम झाला असून भेळ खाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मंदावली आहे. वाढत्या पेट्रोल आणि डीझेल च्या किंमतीचा ही या व्यवसायावर परिणाम झाला असून पूर्वी ग्राहक भेळ खावून पार्सल घेवून जात होते,ते आता घेवून जात नाहीत. भेळच्या कामात मदत करण्यासाठी चार कामगार असून त्यांच्या दररोज पगारी दिल्या जात आहेत. सर्व. खर्च जावून हातात फक्त रोजगार पडत आहे. अशीच महागाई वाढत राहिली तर येणाऱ्या काळात भेळचा व्यवसाय बंद करावा लागेल,असे संजय देशमुख यांना वाटत आहे.

वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे देखील महागाईत वाढ

वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असताना इतर ही खाद्य अन्नाचे भाव वाढले आहेत. या वाढलेल्या किंमतीमुळे जनतेतून रोष व्यक्त करण्यात येत असताना काही महिन्यांपूर्वी खाद्य तेल 80 ते 90 रुपये किलोने मिळत होते. पण सध्या 200 रुपये किलोच्या आसपास पोहचले आहे. डाळींच्या किंमती वाढत चालल्या असून त्याचाही परिणाम सर्वसामान्य जनतेवर झाला आहे. सध्या वाढत्या महागाईच्या खर्चाने कुटूंब प्रमुख हतबल झाले असून ग्रामीण भागात रोजगाराची चणचण भासत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली असताना याच कोरोनाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री केली जात होती. नागरिकांना नाइलाजास्तव या वस्तू खरेदी कराव्या लागत होत्या.

पण लॉकडाऊन उगडल्यानंतर तर महागाईवर नियंत्रण येईल असे वाटत असताना दिवसेंदिवस महागाईचा उच्चांक वाढतच चाललेला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढतच चालल्या आहेत. महागाईवर नियंत्रण येणार की नाही असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचा खर्च,दवाखाना,पाहुणे,लग्न समारंभ व इतर खर्चामुळे सध्या सर्वसामान्य जनता अडचणीत आली असल्याचे दिसते. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती सर्वसामान्य वर्गाची झाली असून सध्या तरी मागाईच्या मुद्यावरून जनतेत रोष पहायला मिळत आहे. गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून उज्ज्वला योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सर्वसामान्य कुटुंबाना गॅस विकत घेणे परवडेना गेले आहे.

वाढत्या महागाईने गरिबांचे जगणे मुश्किल

सुरुवातीच्या काळात गॅस स्वस्त मिळत होता. त्यावेळेस त्याची किंमत 350 ते 400 रुपये होती. उज्वला योजनेतून सुरुवातीला गॅसचे फुकट वाटप करण्यात आले. परंतु त्यानंतर सातत्याने गॅसच्या किंमतीत वाढ होत चालली आहे. आता तर त्याची किंमत 1 हजार रुपयांच्या वर गेली आहे. 10 लोकांचे कुटूंब असणाऱ्या कुटुंबाचा गॅस 15 दिवसाला गॅस संपत असून त्यामुळे गरीब कुटूंबातील लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. खाद्य तेल महागले असून काही महिन्यांपूर्वी 90 ते 100 रुपये किलो दराने मिळणारे खाद्य तेल आता 200 रुपये किलोने मिळू लागले आहे. खाद्य डाळींच्या किंमती वाढल्या असून महागाई सातत्याने वाढत असल्याने गरीब लोकांच्या समोर विविध अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून रिमझिम पाऊस असल्याने लोकांच्या हाताला कामे नाहीत.

त्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. खाद्य तेल एका आठवड्यात संपत असून डाळी,शेंगदाणे व इतर वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. सर्व महाग होत चालले असून आधी गॅसवर सबसिडी देण्यात येत होती, ती बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी सर्वसामान्य लोकांच्या जवळ पैसे नसल्यास सबसिडीच्या पैशातून गॅस खरेदी करत होते. पण आता वांदे झाले आहेत. गॅस आणायला पैसे नसल्याने महिलांना चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने यावर उपाययोजना कराव्यात असे नागरिकांना वाटत आहे.

Updated : 12 Sep 2022 9:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top