Home > मॅक्स रिपोर्ट > बंगाली डॉक्टर करतायेत कोरोना संशयितांवर उपचार

बंगाली डॉक्टर करतायेत कोरोना संशयितांवर उपचार

डॉक्टरची डिग्री सोडा साधं ग्रामपंचायत आणि जिल्हापरिषदची ना हरकत प्रमाणपत्र नसलेले हे डॉक्टर गाव-खेड्यात कोरोना संशयित रुग्णांवर बिनधास्तपणे उपचार करतायत.

बंगाली डॉक्टर करतायेत कोरोना संशयितांवर उपचार
X

राज्यात कोरोनाचे संकट उभा असताना दुसऱ्याकडे मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यात कोणतेही पदवी नसतात उपचार करणारे अनेक बोगस डॉक्टर आपले दुकान मांडून बसले आहेत. डॉक्टरची डिग्री सोडा साधं ग्रामपंचायत आणि जिल्हापरिषदची ना हरकत प्रमाणपत्र नसलेले हे डॉक्टर गाव-खेड्यात कोरोना संशयित रुग्णांवर बिनधास्तपणे उपचार करतायत.

एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात आशा बोगस डॉक्टरांची संख्या 200 पेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास सर्वच बोगस डॉक्टर हे बाहेरील राज्यातील आहे. खास करून पश्चिम बंगालमधून आलेल्या बोगस डॉक्टरांची संख्या अधिक आहे.

अशाच बोगस डॉक्टरांपैकी एक म्हणजे औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बालानगर गावातील डॉक्टर विश्वास एक आहे. विशेष म्हणजे लोकांना आपल्यावर विश्वास बसावा म्हणून, या बंगाली डॉक्टरने आपलं नाव सुद्धा विश्वास ठेवून घेतलं.

डॉ. विश्वास हा बालानगरमध्ये गेल्या 17 वर्षांपासून ठाण मांडून बसला आहे. अनेकदा राजकीय हस्तक्षेपमुळे कारवाई झाली नाही. तर काहीवेळा कारवाईची माहिती मिळताच हा बोगस डॉक्टर दवाखाना बंद करून पळ काढायचा.

सद्या कोरोना काळात सुद्धा ताप, सर्दी,खोकल्या असलेल्या कोरोना संशयित रूग्णांवर पॅरिसीटेमॉल सारख्या गोळ्या देऊन हा डॉक्टर बिनधास्तपणे उपचार करतोय.

14 मे रोजी या बोगस डॉक्टर डिग्री नसताना कसा लोकांवर उपचार करतोय हे मॅक्स महाराष्ट्राने महाराष्ट्रासमोर आणलं होतं, त्यानंतर आरोग्य विभागाने बातमीची दखल घेत कारवाई करण्यासाठी छापा सुद्धा मारला.

मात्र गावातील काही राजकीय लोकांच्या मदतीने डॉक्टर आणि गावकऱ्यांनी आरोग्य विभागावर हल्ला चढवत डॉक्टरला पळवून लावलं. ज्या नंतर शासकीय कामात अडथळा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात असे डॉक्टर विश्वास एक नाही,तर गावखेड्या पासून तांड्यापर्यंत असे बोगस डॉक्टर वर्षानुवर्ष ठाण मांडून बसले आहेत. ग्रामीण भागात जसा कोरोना वाढू लागला तसा या लोकांचा गल्ला सुध्दा वाढत आहे.

कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागातील नागरिक शासकीय किंवा चांगल्या दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करतायत आणि याचाच फायदा घेत हे बोगस डॉक्टर आता कोरोना संशयितांवर सुद्धा उपचार करतायत

औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पान रांजणगाव येथील बंगाली डॉक्टर थेट इंजेक्शन आणि सलाइन सुद्धा लावतो. एवढच नाही तर रुग्णाला पाहून कोरोना आहे की नाही हे सुद्धा मला कळत असल्याचा दावा करतो.

असे बोगस डॉक्टर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या कित्येक वर्षांपासून आहे, मात्र आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर कोणतेही कारवाई होत नाही. पण किमान कोरोना सारख्या काळात त्यांना लगाम घातला नाही तर, भविष्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढीत या बंगाली डॉक्टरांचा खारीचा वाटा राहील हे मात्र निश्चित.

मॅक्स महाराष्ट्र इम्पॅक्ट!

ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांचा मॅक्स महाराष्ट्राने भांडाफोड केला होता. याची दखल आरोग्य विभागाने तत्काळ आशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तर काही डॉक्टर बातमी लागल्यानंतर आपले हॉस्पिटल बंद करून फरार झाले आहेत.

गावकऱ्यांच पाठबळ!

ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांना स्थानिक राजकीय लोकांची मदत मिळत असल्याने, त्यांच्यावर सहसा कारवाई होत नाही. त्यामुळे या डॉक्टरांची हिम्मत वाढत आहे. अनेकदा त्यांच्या चुकीच्या उपचारामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

कोणतेही डिग्री नाही!

कोणत्याही डॉक्टरला जेव्हा रुग्णालय सुरू करायचं असते, त्यावेळी त्याच्याकडे महाराष्ट्र मेडिकल काउंसिल,जिल्हापरिषदची परवानगी लागते. मात्र ग्रामीण भागात ठाण मांडून बसलेल्या बोगस डॉक्टरांकडे अशी कोणतीही परवानगी घेतल्याचं आढळून येत नाही.

कमी दरात उपचार!

ही सर्व बोगस डॉक्टर ग्रामीण भागात उपचार करताना कमी पैसे घेतात. कारण स्वतः जवळ असलेले ( एकाच वेळी मेडिकलवरून आणून ठेवलेले औषध ) रूग्णांना देतात. त्यामुळे कमी दरात उपचार होत असल्याने नागरिक सुद्धा याच डॉक्टरकडे उपचारासाठी जातात.

पेनकिलरचा सर्रास वापर!

धक्कादायक म्हणजे हे डॉक्टर रूग्णांना हेवी डोसचे पेनकिलर देतात. त्यामुळे रुग्णांन लगेच आराम जाणवतो. तर पॅरिसीटेमॉल सारख्या गोळ्या देऊन कोरोनाचे लक्षण असलेले रुग्णांवर सुद्धा हे डॉक्टर उपचार करतात.

चुकीच्या उपचारामुळे रूग्णाचा मृत्यू!

गेल्यावर्षी बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचारांमुळे ठाण्यातील डायघर येथील अंकित पाटील याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. अंकित याला पोटदुखीचा त्रास झाल्याने तो शीळफाटा येथील डॉ. खान यांच्या बुरहानी क्लिनिकमध्ये गेला होता. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने मित्राने त्यास काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. पुढे चौकशीत डॉ. खान याची सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रे बनावट असून,चुकीच्या उपचाराने अंकीतचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

नागरिक काय म्हणतात!

यावर बोलताना ग्रामीण भागातील नागरिक मॅक्स महाराष्ट्र प्रतिनिधी सोबत बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागात शासकीय आरोग्य सेवा पोहचत नाही. आरोग्य केंद्र, उपकेंद्र नेहमीच बंद असतात. रात्री-बेरात्री गरज पडल्यास बोगस डॉक्टर शिवाय पर्याय नसतो. वेळेवर जर शासकीय आरोग्य यंत्रणा उपलब्ध असली तर,आम्ही कशाला बोगस डॉक्टरकडे उपचार करण्यासाठी जाऊ.

आरोग्य अधिकारी काय म्हणतात!

कोणतेही वैद्यकीय पदवी नसताना काही बोगस डॉक्टर दवाखाने उघडून बिनधास्तपणे लोकांवर उपचार करत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी आम्ही कारवाई करत आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी स्थानिक नागरिकांचा कारवाईला विरोध होत असल्याने अडचणी निर्माण होत आहे. मात्र पोलीस सरंक्षण घेऊन आशा बोगस डॉक्टरांवर नक्कीच कारवाई केली जाईल.

भूषण आगाज- वैद्यकीय अधिकारी

राज्यभरात कारवाई सुरू

मॅक्स महाराष्ट्राने बातमी दाखवल्यानंतर आता राज्यातील अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नारायणवाडी येथील बोगस डॉक्टरवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील नांदगाव येथील देवकुमार बुधक या बोगस डॉक्टरवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.

Updated : 23 May 2021 12:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top