Home > Election 2020 > बीडमधल्या ‘गर्भाशय’ प्रकरणाची सत्यता वेगळीच

बीडमधल्या ‘गर्भाशय’ प्रकरणाची सत्यता वेगळीच

बीडमधल्या ‘गर्भाशय’ प्रकरणाची सत्यता वेगळीच
X

बीड जिल्ह्यातील ऊस तोड कामगार महिलांचं गर्भाशय काढून टाकण्याचा प्रकरण सध्या गाजत आहे. या महिलांना मासिक पाळी येऊ नये , यासाठी गर्भाशय काढून टाकण्याची अट ऊसतोड कामावरील मुकादम घालतात आणि त्यामुळे या महिलांना नाईलाजाने आपले गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते, असं माध्यमांतून प्रकाशित झाल्यानंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ माजली हौती. परंतु मॅक्स महाराष्ट्रचा ग्राउंड रिपोर्ट काही वेगळंच सांगतो.

बीड जिल्ह्यातील ज्या वंजारवाडी गावात अशा शस्त्रक्रियेच्या भरपूर केसेस सापडतात ते वंजारवाडी गाव ऊस तोड कामावर फारसं जात नाही, तर उलट केज तालुका जो प्रामुख्याने ऊसतोड कामगारांचा तालुका म्हणून ओळखला जातो, तिथे अशा शस्त्रक्रिया कमी प्रमाणात झालेल्या दिसतात.

सनसनाटी बातम्या देण्याच्या घाईत माध्यमांनी या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्नच केलेला दिसत नाही. मॅक्स महाराष्ट्रनं ज्या वंजारवाडी गावात गर्भाशयाच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या गावातच जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतलीय. त्यातून समोर आलं की या प्रकरणातील वास्तव वेगळं आहे. कमी वयात लग्नं, पाठोपाठची बाळंतपणं, भौतिक सुविधांशिवाय जगण्याची प्रतिकूल परिस्थिती आणि उदरनिर्वाहासाठी अत्यंत शारिरीक परिश्रम महिलांच्या गर्भाशयावर विपरीत परिणाम होतात आणि कॅन्सर होईल अशी भीती घालून डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देतात. 35 ते 50 हजार रुपये या महिलांनी शस्त्रक्रिया केला असल्याचं त्या स्वत:च सांगताहेत. एकूणच आपल्या सभोवतालची सामाजिक परिस्थिती आणि वैद्यकीय क्षेत्रातली लबाडी या सगळ्या प्रकरणामध्ये असल्याचं दिसून येतं. काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात गर्भलिंगनिदान आणि भ्रूणहत्या करण्याच्या आरोपावरून डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले होते, त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. परंतु अजूनही बीड मधील डॉक्टरांना कायद्याचा धाक असल्याचं दिसून येत नाही. गर्भाशयाच्या पिशव्यासंदर्भातल्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी आस्तिकुमार पांडेय यांनी सर्वच डॉक्टर्स्ंना गर्भाशयाच्या शस्त्रक्रियांसंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत.

माध्यमांनी वार्तांकन करतांना घाई केली ?

माध्यमांनी या घटनेचं वार्तांकन करतांना थोडी घाई केल्याचं दिसतं. ऊसतोडणीसाठी कंत्राटदार हा मासिक पाळीतल्या महिलांना कामावर घेत नाही आणि या काळात जर त्या कामावर गैरहजर राहिल्या तर त्यांच्या मजूरीतून संबंधित कंत्राटदार पैसे कापून घेतो. त्यामुळं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून या ऊसतोडणी करणाऱ्या महिला कामगार गर्भाशयाची पिशवीच काढून टाकतात, अशा आशयाच्या बातम्या प्रसारित झाल्यानं एकच खळबळ माजली होती. मात्र, मॅक्स महाराष्ट्रनं त्या वंजारवाडीमध्येच जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून समोर आलेलं वास्तव धक्कादायकच आहे.

चौकशी सुरू आहे - डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

जिल्ह्यातील ज्या महिलांवर गर्भशयाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, त्याविषयी चौकशी सुरू करण्यात आली आहे. खासगी रूग्णालयं आणि सरकारी रूग्णालयातून सर्व प्रकारचा डाटा एकत्रित करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी डॉक्टर्स, सरकारी डॉक्टर्स, खासगी स्वयंसेवी संस्था, ऊसतोडणी कामगारांच्या संघटना यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सध्या या गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाची चौकशी करत आहे. गरज नसतांनाही जर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असतील तर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ११ हॉस्पीटल्सचीही चौकशी करण्यात येत आहे. या हॉस्पीटल्समध्ये गेल्या ३ वर्षात अशाप्रकारच्या अंदाजे १०० शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. ज्या महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, त्यांची ही समित प्रत्यक्ष भेट घेणार आहे. यानंतरच्या काळात ज्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रूग्णालयात भरती होतील, तेव्हा संबंधित रूग्णालयातील डॉक्टर्सनी सरकारी रूग्णालयाला त्यासंबंधीची माहिती देऊन सेकंड ओपिनीयन घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. २०१२ मध्ये गर्भलिंगनिदान प्रकरणी डॉ. मुंडे दांपत्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून बीड जिल्हा बदनाम झाला होता. मात्र, मागील तीन वर्षांमध्ये बीड जिल्ह्यानं मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतांना दिसत आहेत. बीडमध्ये मुलींचा जन्मदर हा हजारामागे ८०० पेक्षा खाली होता, तो गेल्या तीन वर्षांतील सततच्या प्रयत्नांमुळे वाढून आता ९३६ च्या पुढे गेला आहे.

सुशिला वणवे, अंंगणवाडी सेविका, वंजारवाडी, जि. बीड

इथल्या मुलींची लहानवयातचं लग्न होतात. त्यानंतर लवकर मुलं होतात. या सर्वांचा परिणाम तिच्या शरीरावर होतो. साहजिकच या अल्पवयीन मातांच्या गर्भाशयावरही परिणाम होतो. त्यामुळं त्यांना आजारपणाला सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत त्रास सहन होत नाही, त्यामुळं गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करावी लागते.

ऊसतोडणी करणाऱ्या महिलांच्या प्रतिक्रिया

वंजारवाडीतील अंगणवाडी सेविका सुशिला वणवे यांच्या मांडणीला ऊस तोड कामगारांच्या महिलांकडून दुजोरा मिळतो. वंजारवाडी आणि तांदळेवस्तीतील महिलांनी मुकादमाकडून त्रास होत असल्याचा इन्कार केलाय. ऊसाचे सारे उचलून उचलून आमचे हाल होतात. दोन तीन वर्ष त्रास काढल्यानंतर आम्ही डाॅक्टरकडे गेलो आणि गर्भाशय काढून टाकलं असं या महिला सांगतात.

Updated : 26 April 2019 11:45 AM GMT
Next Story
Share it
Top