Home > मॅक्स रिपोर्ट > #AzadiKaAmritMahotsav : Ground Report : "साहेब हात जोडतो पण आम्हाला रस्ता द्या"

#AzadiKaAmritMahotsav : Ground Report : "साहेब हात जोडतो पण आम्हाला रस्ता द्या"

#AzadiKaAmritMahotsav : Ground Report : साहेब हात जोडतो पण आम्हाला रस्ता द्या
X

एकीकडे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा जल्लोष सुरू झाला आहे, तर अजूनही रस्ता, वीज आणि पाण्यासारख्या मुलभूत सुविधांसाठी एक वर्ग प्रतीक्षा करतोय...
या अमृत महोत्सवी वर्षात मायबाप सरकारला हात जोडून रस्ता देण्याची विनंती केली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना एका छोट्याशा वाडीवरच्या नागरिकांची सरकारला ही विनंती आहे....मुलभूत सुविधांसाठी हात जोडण्याची वेळ नागरिकांवर यावी यापेक्षा दुर्दैव काय असते, असा प्रश्न निर्माण होत आहे....ही व्यथा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मिर्ले धनगरवाडीच्या गावकऱ्यांची....दोन दिवसांपूर्वी याच धनगर वाडीतील एका ९० वर्षांच्या आजींना रस्ता नसल्याने झोळीत घालून नेण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता....त्या ठिकाणी जाऊन आमचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी वास्तव जाणून घेणार ग्राऊंड रिपोर्ट...

सोशल-मिडीयावर डोलीतून ९० वर्षीय आजीला दवाखाण्यात आणतानाचा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहिल्यानंतर फक्त एकच विषय मनात घोळत होता. तो म्हणजे ह्या आजीची भेट घ्यायची आणि या बातमीच्या मुळाशी जायचं ठरवलं. पनवेल वरून थेट कोकणकन्याने खेड स्टेशन गाठलं आणि तेथून चोरवणे एसटीने पहाटे ५. ३० वाजता मिर्ले गाव गाठलं. पावसाची रिप रिप चालूच होती. अरुंद जंगलातून जाणारी चढावाची पायवाट. वाटेला दगडावर आलेली शेवाळं देखील पाय टेकू देत नव्हती. त्यामुळे या पडझडीच्या वाटेवर भल्या पावसातून घामाच्या धारा निघत होत्या... धापा टाकत टाकत चालत होतो. त्यावेळी वाटतं होत की ह्या वाटेने नेहमी प्रवास करणारे लहानगी शाळकरी मुलं आणि ९० वर्षीय आजीला कस बरं या वाटेने आणल असेल ? शेवटी पाऊण तासाचा वाटेचा संघर्ष करत आजीच्या घरी पोहचलो. त्यावेळी तिला पाहण्यासाठी गावकरी त्यांच्या घरीचं जमले होते. आम्ही आजीची भेट घेतली. यावेळी आजीला तु बरी आहेस का ? असं विचारल्यानंतर.. तिची प्रकृती ठीक नसल्याने तिला बोलायला शब्द फुटतं नव्हते.. परंतु तिच्या "डोळ्याती ते अश्रू सर्व काही तीची होणारी घुटमळ सांगत होते."

या वाडीत इतर लोकांसोबत संवाद साधला. धनगरवाडीच्या या लोकांना तब्बल ५ किलोमीटरचा डोंगर दररोज चढउतर करावा लागतो....एवढेच नाही तर इथल्या अनेक मुलांना रस्त्याअभावी शाळा सोडावी लागली आहे...एका मुलीने तर आपली व्यथा थेट पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे कळवली होती...पण तिच्या पदरी देखील निराशाच आली...

येथील एका रविना गोरे या विद्यार्थींनीने दोन वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तिच्या मिर्ले-खोपी धनगरवाडीत रस्त्याविना होणारी शाळकरी मुलांची गैरसोय या संदर्भात पत्र लिहिलं होतं. ती म्हणाली की दोन वर्षापूर्वी हे पत्र पंतप्रधानांना दिल होतं. पण येथे कोणतंही विकास काम झाल नाही. तिने पुन्हा एकदा "पंतप्रधानांना नरेद्र मोदी, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हात जोडून विंनती केली आहे" तिने सांगितलं आहे की " माझ्या सोबत असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यानी शाळा सोडली आहे. आम्ही जेव्हा या जंगलातल्या पायवाटेन जातो तेव्हा आमच्या मनात कायम एक भिती असते ती म्हणजे जंगली प्राण्यांची, अनेकदा पायवाटेला सर्प, डुक्कर असे अनेक रानटी प्राणी दिसतात यांची भिती कायम असते. आम्हाला शिकायचयं मोठं आधिकारी बनायचय. अस येथील शाळकरी मुलांनी सांगीतल.

इथल्या अनेक महिलांची तर रस्त्यातच किंवा घरीच प्रसुती करण्याची वेळ येत असल्याचे इथल्या वयोवृद्ध महिला सांगत आहेत....आमच्या अनेक पिढ्या इथे आहेत पण या गोष्टीचा संघर्ष करावा लागतो परंतु "आमच्या लेकांच्या नातवांच्या नशीबी हे जगण नसावं", कसं आम्ही या जंगलात रहायचं ? ना रस्ता ना पाणी कशी आम्ही आमची लहान मुलं शाळेत पाठवायची.

आम्ही शासनाचे उंबरठे झीजवले तरीही आमची दखल कोणी घेत नाही. या पावसापाण्यातून आमची मुलं शाळेत जात नाहीत. "शाळेत गेली तरी वाटेने पावसाच्या पाण्यामुळे डागत पडतायतं, चिखलाने माकतायतं त्यामुळे त्यांना शाळेला सुट्टी मारावी लागते. त्यामुळे आम्हाला रस्ता पाहीजे. माणसं आजारी पडली तर त्यांना डोलीतून न्याव्ह लागत. "पलीकडच्या वर्षी माझ्या बहीणीची सुन रस्त्यात डिलवरी झाली" जोरदार पाऊस होता मी तिला घरी आणली तर चार दिवस शुध्द नव्हती. मांडीवर पेज घेऊन पाजत होते तरीही तीला शुद्द नव्हती. मग आम्हाला सुविधा काय आहे ? सुविधा असेल तर गाडी करून जाता आलं असत. आम्हाला काही सुविधा नाही. "आमची सरकारला हात जोडून विनंती आहे, रस्त्याची सुविधा करावी". अशी प्रतिक्रीया येथील वयोवृध्द महिलेनी दिली

दरम्यान या ठिकाणी मिर्ले धनगरडवाडीची व्यथा जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ येऊन गेल्या पण या लोकांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही.. त्यांनी फक्त आम्हा गावकऱ्यानां आश्वासन दिलं आहे. यावेळी त्यांनी स्थानीक आमदारांवर फक्त टिका केली. प्रत्यक्षात काही काम झालं नसल्याच गावकऱ्यांनी सांगितल.

या गावासाठी निधी मंजूर झाला पण शिंदे-फडणवीस सरकारने स्थगितीची सपाटा लावला आणि त्यात या निधीलाही ब्रेक लागल्याचा आरोप इथल्या माजी सरपंच आणि उपसरपंचांनी केला आहे. तर ती स्थगीती हटवून पुन्हा मंजूरी द्यावी. "विकासा पासूव वंचित असणाऱ्या घटकावर शासनाकडून अन्याय होतोयं ? विकासाच्या दृष्टीनं त्या करीता निधी मिळवून द्यावा. आणि होणारा अन्याय टाळावा" अशी आक्रमत प्रतिक्रीया उपसरपंच सुनील साळवी यांनी दिली.

आमदार भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात हे गाव येते, विधानसभेच्या सभागृहात आक्रमकतेने आपली बाजू मांडणारे गेले गेली कित्येक वर्ष या भागाचे आमदार आहेत त्यांनी सुध्दा आमच्या गावची दखल घेतली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

आज कोकणात असंख्य वाड्या वस्त्या आहेत. तिथे अजूनही रस्ता, पाणी अशा मुलभुत गरजा सुध्दा मिळतं नाहीत. ज्या आजींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यांचे घर आम्ही गाठले, आजींची प्रकृती आता बरी आहे, पण पुन्हा त्रास झाला तर झोळीच्या भीतीने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अंगावर काटा उभा राहतो...काय झाडी, काय डोंगार हे शब्द आता महाराष्ट्राच्या परिचयाचे झाले आहेत...पण धनगरवाडीच्या या दरी, डोंगार आणि झाडीत लपलेल्या गावकऱ्यांच्या वेदना सत्ताधाऱ्यांना कधी दिसणार समदं ओक्के आहे, असे म्हणण्याची संधी या गावकऱ्यांना मिळणार का, हाच प्रश्न स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सगळ्यांना पडलाय....कोकणातील खेड तालुक्यातील मिर्ले धनगरवाडीच्या गावकऱ्यांनी....या वाडीवरचे भीषण वास्तव मांडणारा कृष्णा कोलापटे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...Updated : 6 Sep 2022 6:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top