Home > Fact Check > FACT CHECK : उत्तर प्रदेशात हिंदू खरंच 'खतरे में' आहेत का?

FACT CHECK : उत्तर प्रदेशात हिंदू खरंच 'खतरे में' आहेत का?

FACT CHECK : उत्तर प्रदेशात हिंदू खरंच खतरे में आहेत का?
X

उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यातल्या एका गावात हिंदू-मुस्लिम तणाव असून हिंदूंवर पलायन करण्याची वेळ आलीय अशी बातमी सध्या देशभर व्हायरल आहे. ‘मुस्लिमांच्या जाचातून मुक्त करा, नाहीतर धर्मांतर करु’ अशा आशयाच्या मथळ्याखाली असलेल्या बातमीचं कात्रण प्रसारित झालं

आहे. बहुसंख्यांक मुस्लिम आणि अल्पसंख्यांक हिंदू यांच्यात वाद होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि काय आहे वास्तव, 'मॅक्समहाराष्ट्र'ने यातील तत्थ्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

बरेलीपासून 70 किमीवर मिल्क पछोडा हे मुस्लिमबहुल गाव आहे. सातशे ते हजार लोकसंख्येच्या या गावात साधारण 150 हिंदू रहातात. गावातले बहुसंख्यांक मुस्लिम अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करत आहेत असा गावकऱ्यांचा आरोप आहे. गावात या दोन गटांमध्ये वारंवार खटके उडत आहेत.

पंजाब केसरी

दै. जागरण

या वादाचं मूळ कारण गावातलं एक जूनं मंदीर आहे. गेल्या काही दशकांपासून गावात हे मंदीर आहे. हिंदूंना त्याजागेवर आता नव्याने मंदीराची उभारणी करायची आहे. मात्र, गावातल्या मुस्लिमांचा मंदिरासाठी विरोध करत असल्याचा आरोप हिंदूंनी केला आहे. हिंदूंना गावात पूजा करु दिली जात नाही. मंदिरात घंटा वाजवण्यावरही निर्बंध आहेत. याचा विरोध केल्यास मुस्लिमांकडून मारहाण केली जाते आणि मुलींचं अपहरण करु अशा धमक्या दिल्या जातात असं गावकऱ्यांनी म्हटलंय.

गावातल्या महिलांसोबतही गैरप्रकार घडत आहेत. मंदिरात पूजा करण्यासाठी जाणाऱ्या महिलांची छेड काढली जाते असा आरोप महिलांनी केलाय. या गावात मुस्लिमांची हदशत असून ती एवढी वाढली आहे की, गावकऱ्यांचं जगणं कठीण झालंय.

दै. जागरण

गावकऱ्यांनी आपल्या समस्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला सांगितल्या. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई होत नाहीय. प्रशासनही पक्षपातीपणा करत असल्याचं गावकऱ्याचं म्हणणं आहे. गावकऱ्यांनी आता थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची मागणी केलीय. जर त्यांची या रोजच्या त्रासातून मुक्तता नाही झाली तर गावकऱ्यांनी धर्म परिवर्तन करण्याचा निर्णय घेतलाय. काहीजण गावातून स्थलांतर करण्याच्याही तयारीत आहेत.

व्हायरल पोस्ट

अशा स्वरूपाचा या गावाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ज्यात हिंदू परिवारांनी अनेक आरोप केले आहेत.

ही झाली एक बाजू, आता दुसरी बाजू

ही बातमी आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रसारमाध्यमं या गावात दाखल झाली. त्यांनी हिंदू गावकऱ्यांसोबत मुस्लिम समाजाचीही बाजू जाणून घेतली आणि त्यात वेगळं चित्र समोर आलं.

गावातल्या मुस्लिमांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, ज्याठिकाणी हिंदूंना मंदीर बांधायचंय त्या जागेला लागून मस्जिद असल्याने तिथे मंदीर नको, अशी त्यांची भूमिका आहे.

बाकी गावातल्या कोणत्याही जागेत मंदीर बांधण्यासाठी त्यांची हरकत नाही. गावात आधीच दोन मंदिर आहेत, ज्या मंदिरासाठी हिंदू समाज आग्रही आहे, ते गावाच्या जमीनीवर आहे आणि 50 वर्षापासून अशाच स्वरूपात आहे.

तर दुसरीकडे, मंदीर बांधण्यासाठी गावातले हिंदू खोटं बोलत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. गावात अत्याचार, मारहाण असा कोणताच प्रकार झालेला नाही, हे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

बरेलीचे एसएसपी (विशेष पोलीस अधिक्षक) मुनीराज यांच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नव्या धार्मिक स्थळाची निर्मिती केली जाऊ शकत नाही. त्यामुळे गावकऱ्यांची मंदीर बांधण्याची मागणी बेकायदेशीर आहे. गावातील लोकांनी व्हायरल केलेल्या व्हिडीयोमधल्या माहितीत तत्थ्य नसल्याचंही मुनीराज यांनी सांगीतलं आहे. ( सर्वोच्च न्यायालयाच्या बातमीचा संदर्भ - http://www.sacw.net/article3545.html )

'मॅक्समहाराष्ट्र'ने या संदर्भातल्या इतर माध्यमांमधल्या बातम्या, तसंच गावकरी-प्रशासनाच्या मुलाखती तपासल्या. गावकऱ्यांनी व्हायरल केलेला व्हिडीयो तसंच महाराष्ट्रात व्हायरल केल्या जात असलेल्या बातमीच्या कात्रणामधली माहिती एकतर्फी असल्याचं आढळून आलं आहे.

Updated : 25 July 2019 12:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top