Home > मॅक्स रिपोर्ट > राणा दांपत्याचा निकटवर्तीयच उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाईंड?

राणा दांपत्याचा निकटवर्तीयच उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाईंड?

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे अमरावती येथील उमेश कोल्हे या औषध विक्रेत्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर खासदार नवणीत राणा यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहीले होते. मात्र अमरावती येथील हत्याकांडाचा मास्टरमाईंड राणा दांपत्याचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे.

राणा दांपत्याचा निकटवर्तीयच उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाईंड?
X

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले होते. त्यानंतर देशात दोन प्रवाह निर्माण झाले होते. ज्यामध्ये नुपूर शर्मा यांचा निषेध करणारा एक प्रवाह तर नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारा दुसरा प्रवाह होता. त्यात नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. याच रागातून 21 जून रोजी उमेश कोल्हे या औषध विक्रेत्याची दुचाकीवर आलेल्या दोघांनी गळा चिरून हत्या केली. या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. तर खासदार नवणीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पत्र दिले होते. मात्र एनडीटीव्हीने केलेल्या पडताळणीत उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी नवणीत राणा यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अमरावती येथील उमेश कोल्हे याच्या हत्या प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू आहे. दरम्यान एनडीटीव्हीच्या पडताळणीत हा अमरावती येथील हत्येचा मास्टरमाईंड इरफान खान याने 2019 साली नवणीत राणा यांच्या निवडणूकीचा प्रचार केला होता, अशी माहिती समोर आल्याचा दावा केला आहे.

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने अमरावती हत्याकांडातील मुख्य आरोपी इरफान खान याच्या फेसबुक अकाऊंटला भेट दिली. त्यामध्ये असे निदर्शनास आले ही, 2019 च्या निवडणूकीत इरफान खान याने नवणीत राणा यांचे कौतूक करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. तसेच आरोपीचे मित्र आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने गेल्या निवडणूकीत राणा यांच्या निवडणूकीसाठी मेहनत घेतली असल्याचे म्हटले आहे. तसेच एकीकडे इरफानवर हत्येचा आरोप आहे. मात्र दुसरीकडे या प्रकरणाची शिक्षा संपुर्ण परिवार भोगत असल्याचे चित्र आहे. त्याच्या पत्नी आणि आईला नेमकं काय घडलं आहे? हेच समजत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणातील आरोपी इरफान खान यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूकीच्या काळात इरफान खान याने राणा दांपत्याकडून देण्यात येणारी मदत पोहचवण्याचे काम केले होते. मात्र यासंदर्भात खासदार नवणीत राणा यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रने संपर्क साधला असता त्यांनी हा दावा साफ फेटाळून लावला.

खासदार नवणीत राणा म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघात 25 लाख लोक आहेत. तसेच या आरोपीने माझ्या समर्थनार्थ नाही तर माझ्या अभिनंदनाची पोस्ट केली होती. अशा प्रकारे कोणीही माझ्या अभिनंदनाची पोस्ट केली तर तो माझा कार्यकर्ता होऊ शकत नाही, असं मत नवणीत राणा यांनी व्यक्त केले.

तसेच नवणीत राणा यांनी एक फोटो व्हॉट्सअपवर पाठवला आहे. त्यामध्ये उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराच्या बॅनरवर आरोपीचा फोटो आहे. तसेच या बॅनरवर उध्दव ठाकरे यांचाही फोटो असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तो उध्दव ठाकरे यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा नवणीत राणा यांनी केला आहे.

तसेच नवणीत राणा म्हणाल्या की, या प्रकरणात मी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास तातडीने एनआयएमार्फत पुर्ण करून यामागे असलेले सर्व चेहरे शोधून काढावेत आणि हा खटला कोर्टात फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी नवणीत राणा यांनी सांगितले.

त्यामुळे या प्रकरणातील आरोपी नवणीत राणा यांचा कार्यकर्ता आहे की उध्दव ठाकरे यांचा हे मात्र तपासांती समजणार आहे.

Updated : 7 July 2022 3:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top