Home > मॅक्स रिपोर्ट > देवस्थानांचे व्यवहार कॅशलेस करा, गावकऱ्यांचा आंदोलनाचा निर्धार

देवस्थानांचे व्यवहार कॅशलेस करा, गावकऱ्यांचा आंदोलनाचा निर्धार

देवस्थानांचे व्यवहार कॅशलेस करा, गावकऱ्यांचा आंदोलनाचा निर्धार
X

देवस्थानांमधील उत्पन्न हा कायम चर्चेचा विषय असतो. पण रायगड़ जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रसिद्ध रामेश्वर महादेव देवस्थानच्या दानपेटीत येणारा निधी विधी करणाऱ्या भटजींना जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंत्यविधि आणि त्यानंतरच्या विधींसाठी इथे मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. पण इथला सर्व पैसा देवस्थान आणि मंदिरातील बहुजन पुजाऱ्यांना न जाता केवळ विधी करणाऱ्या ब्राह्मणांना जात आहे, असा आक्षेप या गावातील लोकांनी घेतला आहे. आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट





रायगड़ जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील उद्धर येथील श्री रामेश्वर महादेव देवस्थान अंत्यविधि नंतर च्या विधि व क्रियासाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या श्रध्ये ने महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून लोक येथे येत असतात. या देवस्थान ठिकाणी लाखोंचे रोख व्यवहार व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधी सुरु असून हे प्रकार बंद करण्यासाठी उद्धर गावातील काही तरुण ग्रामस्थ रायगड़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. यासंदर्भात ग्रामस्थ प्रमोद लांगी यांनी निवेदन दिले आहे. लांगी यांच्या तक्रारीची दखल घेऊन सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अलिबाग तर्फे देवस्थानची चौकशी देखील केली जाणार आहे.





लांगी यांना माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहिती नुसार एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत श्री रामेश्वर महादेव देवस्थानात दशक्रिया करणाऱ्या एका व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न तब्बल 40 लाख 59 हजार एवढे आहे. यामध्ये सोने, चांदी व गायदानचे पैसे धरलेले नाहीत. ही सर्व रक्कम व वस्तू येथील एकटा पुजारी आपल्याकडे ठेवतो. या सगळ्या रोखीच्या व वस्तू रूपाच्या देणगीचा एकही रुपया देवस्थानला मिळत नाही असे लांगी यांनी आपल्या तक्रारी निवेदनात म्हंटले आहे. शिवाय मंदिर परिसरात इतरही विधी होतात त्यांचेही पैसे देवस्थानला मिळत नाहीत. त्यामुळे प्रथम दर्शनी वर्षाला 50 लाखांहून अधिक रोख आर्थिक उलाढाल येथे होत आहे. हे देवस्थान नोंदणीकृत आहे.

मात्र या लाखो रुपयांचा व्यवहार रोखीने होत असल्याने ऑडिट व हिशोब होत नाही. परिणामी येथे होणारे रोख व्यवहार बंद करणे गरजेचे आहे. तसेच दशक्रिया विधी गावातील एकच व्यक्ती करते. त्यामुळे ही मक्तेदारी बंद करून त्याच्यासह गावातील इतर मुलांना देखील हे विधी करण्याची संधी द्यावी. जेणेकरून त्यांनाही रोजगार मिळेल. शिवाय मंदिरात येणारे लाखोंचे उत्पन्न येथे येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी, गावाच्या विकासासाठी व शिक्षण आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी खर्च करावे असे लांगी यांचे म्हणणे आहे.

प्रमोद लांगी यांनी सांगितले की येथे येणारे दुःखी भाविक यांचा फायदा घेऊन त्यांची भावनिक फसवणूक केली जाते. त्यांना नारायण नागबळी, कालसर्प योग, त्रिपाद शांती या प्रकारचे विधी करण्यासाठी भाग पाडले जाते. भयापोटी लोक हे विधी करण्यास तयार होतात. आणि या विधींसाठी प्रत्येकी जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च होतो. या विधी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व लोकांची फसवणूक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या असल्याने जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी लांगी यांनी केली आहे.जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरु राहिल असा इशारा लांगी व अन्य ग्रामस्थानी दिलाय.





श्री रामेश्वर महादेव देवस्थान उद्धर यांनी रोख स्वरुपात होणारा लाखो रुपयांचा व्यवहार तातडीने बंद करावा. बेहिशेबी मालमत्ता जमा करण्यास प्रोत्साहन देऊ नये. हे सर्व पैसे गावाच्या विकासासाठी खर्च व्हावेत. भाविकांना स्वच्छतागृहा सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच गावातील गोरगरीब मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत करावी व गावातील वाडी वस्त्यांवर रुग्णवाहिकेची सुविधा करावी. दशक्रिया विधीला येणार्‍या भाविकांना कालसर्प योग, नारायण नागबळी ,त्रिपादशांती असे विधी करण्यास भाग पाडू नये. यामुळे अंधश्रद्धेला बळ मिळत आहे, असे तक्रारदार प्रमोद लांगी यांनी सांगितले.

या संदर्भात विश्वस्त व ग्रामस्थ यांच्या सोबत पुन्हा एकदा बैठक घेऊन सामोपचाराने योग्य तोडगा काढणार आहोत. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अलिबागचे पत्र अजून प्राप्त झालेले नाही, असे रवींद्र लहाने, मुख्य विश्वस्त श्री रामेश्वर महादेव देवस्थान उद्धर म्हणाले.

Updated : 18 April 2022 1:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top