Home > मॅक्स रिपोर्ट > ... तर अजित पवार लोकसभेवर जाणार

... तर अजित पवार लोकसभेवर जाणार

... तर अजित पवार लोकसभेवर जाणार
X

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसही कंबर कसून मैदानात उतरणार आहे. नुकतेच शिरुर मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी शिरुर लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य केलं आहे.

पवार साहेबांनी सांगितले आणि पक्षाने आदेश दिला तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवायची माझी तयारी असल्याचे जरी अजितदादा पवार यांनी म्हटलं तरी पवार साहेब लोकसभेचे तिकिट देणार का हे पाहणे औत्सुकत्याचे राहिल.

काय म्हणाले अजितदादा पवार...

अजितदादा म्हणाले, ""शिरूर लोकसभा, विधानसभेला काय गंमत होते ते कळत नाही. आपल्याकडून त्यांच्याविरोधात (शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील) कुणीही उभे राहिले तरी निवडून येतील, अशी स्थिती आहे. मग मागे का सरायचे. मी कालच पवार साहेबांना सांगितले की, शिरूर लोकसभेसाठी तुम्हाला योग्य उमेदवार मिळत नसेल, तर आपली लढायची तयारी आहे. हयगय करणार नाही. या मतदार संघासाठी पक्ष जी जबाबदारी देईल, ती उचलायची तयारी आहे. मी आज सांगतो मी येथून उमेदवारीचा फॉर्म भरला; तर शंभर टक्के निवडून येईल, त्याशिवाय पवारांची औलाद सांगणार नाही. मी जे बोलतो, ते करतोच, हे लोकांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे पक्ष जो आदेश देईल, तो शिरसावंद्य मानून काम करू.''

मी पहिल्यांदा या भागाचा खासदारच होतो. आता आमच्या सहकाऱ्यांना म्हटले तुम्ही खासदार व्हा; तर ते म्हणतात, नको राव, दादा मला आमदारच करा, हे काय कामाचे ? असा सवाल करून ते म्हणाले, " अरे आमदार एका तालुक्‍याचा; तर खासदाराच्या हातात सहा तालुके असतात. पण नकोच, म्हटल्यावर काय करायचे. मी खासदार होतो. पवार साहेबांसाठी हा मतदारसंघ खाली करून देण्याची सूचना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी केल्यावर क्षणात राजीनामा दिला. परत आमदार झालो, नंतर मंत्री, उपमुख्यमंत्री देखील झालो. तुमचे नशीब असेल; तर तुम्हीही असे पुढे जाऊ शकता. फक्त त्यासाठी धाडस महत्वाचे असून, पक्ष देईल ती जबाबदारी उचलायची तयारी ठेवावी लागेल.''

एकंदरित शिरुर लोकसभेसाठी अजित पवारांना तिकिट मिळालं तर अजित पवार लोकसभेवर जाणार का हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतोय.

Updated : 6 Jan 2019 9:03 AM GMT
Next Story
Share it
Top