Home > मॅक्स रिपोर्ट > 12 वर्षात एकदाही वीज बील न भरणारा बागायतदार करतोय सफरचंद, ड्रायफ्रुटची शेती

12 वर्षात एकदाही वीज बील न भरणारा बागायतदार करतोय सफरचंद, ड्रायफ्रुटची शेती

गेल्या १२ वर्षांपासून शेतकऱ्याला लाईट बिलच नाही; शेतकऱ्याने लाईट बिल, लोडशेडिंगच्या त्रासातून कायमची सुटका करून घेत शेतात राबविले विविध पिकांच्या लागवडीचे प्रयोग, कसा घडवला शेतकऱ्याने चमत्कार वाचा मॅक्समहाराष्ट्राचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा स्पेशल रिपोर्ट

12 वर्षात एकदाही वीज बील न भरणारा बागायतदार करतोय सफरचंद, ड्रायफ्रुटची शेती
X

गेल्या १२ वर्षांपासून शेतकऱ्याला लाईट बिलच नाही; शेतकऱ्याने लाईट बिल, लोडशेडिंगच्या त्रासातून कायमची सुटका करून घेत शेतात राबविले विविध पिकांच्या लागवडीचे प्रयोग, कसा घडवला शेतकऱ्याने चमत्कार वाचा मॅक्समहाराष्ट्राचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा स्पेशल रिपोर्ट

सोलापूर : शेतकऱ्यांना नेहमीच विजेच्या लपंडावाचा त्रास सहन करावा लागतो. शेतातील लाईटचे जाणे-येणे निश्चित नसल्याने त्याचा परिणाम शेतीवर होतो. त्यामुळे शेती करण्यास अडचणी निर्माण होतात. शेतमालाचा चढउतार होणारा बाजारभाव ही देखील मोठी समस्या त्यातच शेतातील उत्पन्न कमी आणि लाईट बिलं जास्त अशी स्थिती वारंवार निर्माण होते.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. त्याचबरोबर काहीतरी कारणाने पाणी उपसण्याच्या मोटारीचे घोटाळे होत असतात. अशा कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन मिळाले आणि आधुनिध तंत्रज्ञानाचा डोळस पध्दतीने वापर केला तर उत्तम शेती करू शकतो. हे एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. खर्चात कपात करुन कमी खर्चाचे आधुनिक शेती तंत्रज्ञान स्विकारले तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो.

आजही ग्रामीण भागात लोडशेडींग ही मोठी समस्या आहे. वीजेअभावी पीक जळण्याचे अनुभव अनेकदा येतात. अनियमित वीजपुरवठ्यामुळे वीजपंप जळण्याचे संकटही उद्भवते. सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने लाईट बील, लोडशेडिंगच्या त्रासातून स्वतःची कायमची मुक्तता करून घेतली आहे. त्याने गेल्या १२ वर्षात कधीही लाईट बील भरले नाही किंवा त्याची कधीही वीजतोडणी झाली नाही. त्याला शेतात पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी जावे लागले नाही. या शेतकऱ्याने योग्य किमया साधत आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जेचा प्लांट उभारून वीजतोडणी, लाईट बील व लोडशेडिंगच्या त्रासातून कायमची मुक्तता करून घेतली आहे.

या शेतकऱ्याचे नाव बळीराम भोसले असून ते पापरी ता. मोहोळ या गावचे रहिवाशी आहेत. त्यांनी या प्लांटच्या सहाय्याने त्यांच्या शेतात विविध फळबागांचे अभिनव प्रयोग राबविले असून ते यशस्वी करून दाखवले आहेत. त्यांच्या या अभिनव प्रयोगाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून शेती पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देऊ लागले आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने परीसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

१२ वर्षांपूर्वी उभारला होता सौर ऊर्जेचा प्लांट

शेतकरी बळीराम भोसले यांनी बोलताना सांगितले की, मी नेहमीच शेतात नवनवीन प्रयोग करतो. शेतात उत्पादन चांगले घायचे असेल तर त्याला पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी शेतात लाईटचे नियोजन करून शेती कसण्यास सुरुवात केली. परंतु सतत लोडशेडिंग व लाईट बील अव्वाच्या-सव्वा येऊ लागली.

रात्रीच्या वेळी शेतात पाणी द्यायला जावे लागे. त्यातही लाईटची वेळ ठरलेली नसायची. त्यामुळे पार वैतागून गेलो होतो. यातून कशी सुटका करून घ्यायची. यावर विचार करत होतो. एके दिवशी पुण्याला प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्या ठिकाणी 3 HP ची मोटार सौर ऊर्जेवर चालत होती. लागलीच संबधीत कंपनीच्या इंजिनिअरशी संपर्क साधून सौर ऊर्जेच्या प्लांटची माहिती घेतली.

त्यानंतर आपल्या शेतात हा प्रयोग राबवण्याचा निश्चय करून घराचा छतावर सौर ऊर्जेच्या प्लांटची उभारणी केली. या प्लांटमध्ये एकूण 6 प्लेट बसवल्या असून यातील 4 प्लेट वर 3 एचपीची मोटार चालते तर 2 प्लेटवर घरातील लाईट चालते व विजेवर चालणारी उपकरणे चालतात.

सौर ऊर्जेमुळे लाईट बिलाचे टेन्शन राहिले नाही. लाईट मुबलक प्रमाणात असल्याने दिवसभरात 4 एकर शेती भिजवून होते. त्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जाण्याची गरजच पडत नाही. लाईट बील, लोडशेडिंग यातून मुक्तता झाली असून रात्रीच्या वेळी दिवसभराच्या कामामुळे थकल्याने निवांत आराम करता येतो.

गेल्या १२ वर्षांत सौर ऊर्जेचा एकदाही घोटाळा झाला नाही. लाईट बिलाची बचत होऊन उत्पन्नात भर पडली आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या लाईटचा खोळंबा होतो. परंतु आमच्या लाईटचा कधी घोटाळा झाला नाही.

असे आहेत सौर कृषी पंपाचे फायदे

दिवसा सिंचन करता येते. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्याने वीजबिलांचा किंवा इंधनाचा खर्च नाही. कमी देखभाल आणि विद्युत अपघातांची भीती नाही. बॅटरी चार्जिंगची सोया असल्याने बॅटरीद्वारे शेतातील घराला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध असतो. हा सौर पंप सुमारे 25 वर्षे सेवा देऊ शकतो.पंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाच वर्षे तर सौर पॅनलसाठी दहा वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या कालावधीत सौर कृषिपंप किंवा पॅनलची विनामूल्य दुरुस्ती करण्याची किंवा ते नवीन बदलून देण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची असणार आहे. सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्याची तक्रार जवळच्या पोलिसठाण्यात करून महावितरणच्या कार्यालयात देता येते.या संपूर्ण साहित्याचा पाच वर्षांचा विमा काढलेला असल्याने शेतकऱ्याला संपूर्ण भरपाई मिळते. सौर पॅनल हे आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले असून वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीत त्यांचे क्वचितच नुकसान होते. वीज पडण्याचा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र बसवण्यात आले आहे.

ऊस पट्यात राबिवले जात आहेत... शेती पिकांचे वेगवेगळे प्रयोग

सोलापूर जिल्हा ऊस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात सुमारे 25 ते 30 ऊस कारखाने आहेत. ऊस कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बीले थकवली असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे त्यांनी शेतात वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी दिली नसल्याने शेतकरी आंदोलनाने जोर धरला आहे. त्यामुळे ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची बील थकवली आहेत. त्यांना यावर्षी ऊस गाळप परवाना देण्यात आला नाही. ऊसाच्या शेतीने शेतकरी अडचणीत आला असताना या शेतीपासून फारकत घेत बळीराम भोसले या शेतकऱ्याने आपल्या शेतात विविध फळबागांची लागवड करून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस पट्याच्या क्षेत्रात हा प्रयोग झाला असल्याने त्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.

अर्ध्या एकरात बदाम ड्रायफ्रूट ची केली लागवड

सुक्या मेव्यात वापरल्या जाणाऱ्या बदाम या ड्रायफ्रूटच्या 40 रोपांची लागवड भोसले यांनी अर्धा एकरात केली आहे. या ड्रायफ्रूटची शेती प्रामुख्याने कॅलिफोर्निया अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, उत्तर प्रदेशात केली जाते. याचा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात भोसले यांनी प्रथमच करून आपल्या शेतात त्याची लागवड केली आहे.

बदामाच्या झाडाला लागणारे फळ गजग्याच्या बियाप्रमाणे झाडाला येते. ते पिकल्यानंतर जमिनीवर पडते. त्याच्यावरील आवरण काढून बाजारात विकण्यासाठी पाठवले जाते.

भोसले यांनी सांगितले की, या पिकाच्या संबंधित माहिती युट्युब वरून घेऊन त्यानुसार शेतात पिकाच्या लागवडीचा प्रयोग करण्याचे ठरवले. ही रोपे आम्ही जम्मू काश्मीर वरून मागवली. त्याची किंमत प्रति रोप 300 रुपये होती. या रोपांची लागवड 14 बाय 18 फुटावर करण्यात आली आहे. सध्या ही रोपे 7 महिन्याची झाली आहेत. या बदामाचा उपयोग काजू बरोबर केला जातो. अनेक कार्यक्रमाच्या मेजवानीत हे फळ दिसून येते.

2 एकरात सफरचंदाची केली लागवड

भोसले यांनी 2 एकर शेतीत हार्मोन या जातीच्या सफरचंदाची लागवड केली आहे. ही रोपे 14 बाय 10 फुटावर लावली आहेत. या रोपांना ठिंबक सिंचनाने पाणी दिले जात आहे. भोसले यांनी सांगितले की, सफरचंदाची लागवड करण्यामागचा उद्देश या भागात मजुरांची असणारी टंचाई आहे. या रोपांची जोपासना करत असताना याला रासायनिक खताऐवजी शेणखत, सेंद्रिय खते वापरली आहेत.

सध्या ही रोपे 22 महिन्याची झाली आहेत. 15 तारखेला बागेची छाटणी केली जाणार असून त्यानंतर 1 महिन्यांनी या झाडांना फुले येतील.

मे ते जून महिन्यात या झाडांना फळे लागतील. छाटणीनंतर या झाडांना फळे येण्यास 5 ते साडे-पाच महिन्याचा कालावधी लागतो. गेल्या वर्षी सफरचंदाच्या झाडांचे फळ सरासरी 200 ते 250 ग्रॅम भरले आहे. चालू वर्षी सरासरी हीच लेव्हल पकडल्यास एका झाडाला 10 ते 15 किलो सफरचंद निघतील. असा अंदाज आहे. असे बळीराम भोसले यांना वाटते.

जपानच्या फळझाडांची शेतात लागवड

जपान या देशात प्रामुख्याने जपानीज फ्रुटची लागवड केली जाते. या झाडांच्या लागवडीचा प्रयोग भोसले यांनी आपल्या शेतात केला आहे. या झाडाला फळे येण्यास 5 वर्षांचा कालावधी लागतो. जपानीज फ्रुटची रोपे जम्मू काश्मीर येथे मिळाली नाहीत. ती ऑनलाइन जपान या देशातून मागवली आहेत. ती रोपे विमानाने आली असून प्रति रोप 200 रुपयाला मिळाले आहे. सध्या या रोपांची लागवड करून 2 वर्षे झाली आहेत. जपानीज फ्रुट हे सफरचंदाप्रमाणे असते. या झाडांना फळे येण्यास आणखीन 3 वर्षाचा कालावधी आहे. असे भोसले यांनी सांगितले.

शेतात राबविला बंदीस्त शेळी पालनाचा प्रयोग

भोसले यांनी सुरुवातीला पाले-भाज्यासाठी 10 वर्षे नर्सरी चालवली. त्यात त्यांना तोटा होऊ लागल्याने त्यांनी बंदीस्त शेळी पालन करण्याचे ठरवून 15 शेळ्या विकत घेतल्या. त्या शेळ्यांचे एका वर्षात 1 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. सध्या त्यांच्याकडे 50 शेळ्या असून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

या शेळ्यांच्या विष्टेचा उपयोग शेतात खत म्हणून केला जात आहे. त्यामुळे शेतीचा कस वाढण्यास मदत झाली आहे. या शेळ्या बरोबर त्यांनी म्हशी पाळल्या आहेत. त्यांचे दूध डेअरीला घातले जात असून त्याच्यातून त्यांना आर्थिक फायदा होत आहे. भोसले यांची 2 एकर शेतजमीन कॅनॉल मध्ये गेली असून कॅनॉलच्या कडेला त्यांनी शेळ्यांना खाण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सुबाभूळची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. शेळ्यांना चारा आणण्यासाठी त्यांना इतर ठिकाणी भटकंती करावी लागत नाही. त्यामुळे वेळेची बचत होऊन त्यांना शेतातील इतर कामे करता येतात.

बागेत घेतली जातात मिश्र पिके

सफरचंद, बदाम बाग ,जापनीज फ्रुट या फळांच्या बागांमध्ये इतर पिके घेतली जात आहेत. सध्या बदामाच्या बागेत मक्केचे पीक घेतले आहे. तर सफरचंदाच्या बागेतील मोकळी जागा मिश्र पिकासाठी तयार करून ठेवली आहे. यामध्ये कांदा, गहू, कलिंगड, काकडी व इतर पिके घेता येतात असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या मिश्र पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो असे भोसले यांना वाटते.

भोपळ्याच्या आंतरपिकामुळे झाला फायदा

पापरी ता मोहोळ येथील प्रयोगशील शेतकरी बळीराम राऊ भोसले यांनी अडीच एकर क्षेत्रात दोन लाख रुपयाचे डांगर भोपळा (काशी भोपळा) याचे शेवग्यातुन अंतरपीक घेतले आहे. दुर्मिळ अशा या वेलवर्गीय पिक लावण्याचे शेतकरी सहजा सहजी धाडस करीत नाही. भोसले यांनी कलींगडासाठी तयार केलेल्या भोदावर मल्चींग पेपर टाकुन त्यावर भोपळा लागवड केली आहे. कलींगड नंतर झेंडु व त्यानंतर शेवगा लागवड केली आहे. डांगर भोपळा हे बारमाही येणारे पिक आहे. या भोपळ्याचा उपयोग उपवासासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. याच्या फोडी करुन विक्री केली जाते. पुणे मुंबई सारख्या शहरातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये भाजीसाठी याचा उपयोग होतो. यासाठी मध्यम खडकाळ व पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते.

भोसले यांच्या एका भोपळ्याचे वजन सहा ते सात किलो आहे. प्रतिकीलो नऊ रुपये प्रमाण त्यांना विक्री दर मिळाला. विशेष म्हणजे हा भोपळा वेला पासुन दुर केल्यावर चार ते पाच महिने टिकतो. वाशी येथील बाजारपेठेत याला मोठी मागणी आहे सरासरी बावीस टन माल निघाल्याचे भोसले यांनी सांगीतले. कुठल्याही फळ बागेत भोपळा हे अंतरपीक घेता येत असल्याचे भोसले यांनी सांगीतले.

शेताच्या बांधावर नारळ, आंबा, सुपारी, दालचणी, चिकू, फणस या रोपांची लागवड

भोसले यांनी शेताच्या बांधावर नारळाच्या झाडांची लागवड केली असून यावर्षी त्या झाडांना फळे येतील असे शेतकरी भोसले यांनी सांगितले. त्याचबरोबर या शेतकऱ्याने शेतात 100 केशर आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. अगदी झाड छोटे असतानाही या झाडाला फळे येतात असे भोसले यांनी सांगितले. त्यांनी शेतात फणस, सुपारी, दालचणी, चिकू या झाडांची लागवड करून अभिनव प्रयोग रावबिला आहे.सुपारीच्या झाडाला फळ लागले असून फणस ही बहरात आहे.बळीराम भोसले यांचे शेत म्हणजे शेती पिकांची प्रयोगशाळा आहे असे त्या भागातील शेतकऱ्यांना वाटते.


Updated : 2021-11-25T11:50:40+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top