Home > मॅक्स रिपोर्ट > एका तरुणीचे धाडस, पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलवरून महाराष्ट्र भ्रमण

एका तरुणीचे धाडस, पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलवरून महाराष्ट्र भ्रमण

पर्यावरणाच्या रक्षणाबाबत बोलणारे अनेकजण असतात, पण त्यावर प्रत्यक्ष कृती करणारे खूप कमी लोक असतात. असाच पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन एक तरुणी सायकलवरुन महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. वाचा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा विशेष रिपोर्ट....

एका तरुणीचे धाडस, पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलवरून महाराष्ट्र भ्रमण
X

रायगड : जीवनात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा अनेकजण बाळगतात आणि त्यासाठी प्रयत्न करतात. पण समाजासाठी मोठं धाडस करणारे खूप कमी लोक असतात. छंद म्हणून ट्रेकिंग, सायकलिंग करणारी तरुण पिढी आज आपण पाहतो. पण एका छोट्याशा गावातून महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणाचा संदेश देत अख्खा महाराष्ट्र सायकलवर फिरण्याचा निर्धार एका तरुणीने केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरुणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती, सायकलिंगचा प्रचार, स्थानिक परिस्थिती व मानसिकतेचा अभ्यास ही ध्येय उराशी बाळगून प्रणालीने आपला प्रवास सुरु केला आहे. आपल्या स्वप्नातील प्रवासासाठी प्रणालीने गेली अनेक महिने सराव केला आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने अत्यंत कमी खर्चात आपले ध्येय गाठण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आतापर्यंत सुमारे साडे सात हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या प्रणालीचा प्रवास आणि तिचा उद्देश समजून घेणे गरजेचे आहे.

तब्बल 7 हजार 925 किलोमीटरचा प्रवास करत रायगड जिल्ह्यातील सुधागडामधील उद्धर येथे पर्यावरणवादी अभ्यासक तुषार केळकर यांच्या शेतावर प्रणाली दाखल झाली. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला ऱ्हास व भविष्यातील संभाव्य धोके आणि त्यावरील उपाययोजना याबाबत नागरिकांमध्ये जमजागृती करण्याचा प्रयत्न ती या भ्रमंती दरम्यान करीत आहे.

प्रणाली ही अवघ्या 21 वर्षांची आहे. तिने समाजकार्यातील पदवी मिळविली आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई आणि वडील शेती करतात. तर तिला आणखी दोन बहिणी आहेत. प्रणाली उद्धर येथे इकोफ्रेंडली घरे कशी बनवावी याबाबतचे प्रशिक्षण तुषार केळकर यांच्याकडून घेणार आहे. आणि तिथून पुढे रत्नागिरी आणि इतरत्र जाणार आहे.

सभोवतालचे वाढते प्रदूषण, तापमान वाढ, वातावरण व ऋतुचक्र बदल यातून केवळ एक समस्या निर्माण होत नाही. तर आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्याच्या कोरोना संकटालाही पर्यावरणाचा ऱ्हास जबाबदार आहे. या सर्व जाणीवेतून आणि गोष्टींमुळे प्रणालीने सायकलवरून महाराष्ट्र भ्रमंती करण्याचा उपक्रम हाती घेतला.

प्रणाली हा हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करते आहे. या प्रवासा ती राज्यातील आदिवासी, ग्रामीण, शहरी अशा सर्व भागांना भेटी देत आहे. या भागांमधील नागरिकांशी आणि विशेषत: तरुण-तरुणींशी संवाद साधते आहे. स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणांना भेटी देऊन जनजागृती करणे व माहिती पोहोचवणे असे काम ती करते आहे. त्या त्या भागातील समस्यांबाबत जास्तीत जास्त लोकांशी चर्चा करण्याचा तिचा प्रयत्न आहे. आरोग्याबाबत जनजागृती आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवा हा संदेशही प्रणाली देते आहे. 6 महिन्यांत 7 हजार 925 किमीचा प्रवास तिने केलाय.



प्रणालीचा हा सायकल प्रवास 20 ऑक्टोबर 2020 ला सुरु झाला. आतापर्यंत तिने यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम बुलढाणा त्यानंतर खान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक वरून शहापूर, पालघर, वसई, ठाणे असा प्र्वास केला आहे. आता ती रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील उद्धर येथे दाखल झाली आहे. इथून तिचा पुढचा प्रवास रत्नगिरीच्या दिशेने असेल. प्रणालीने दर दिवसाला प्रवासाचे एक निश्चित ध्येय ठरवले आहे. दर दिवसाला कमीतकमी 50 ते जास्तीत जास्त 125 किमीचा प्रवास ती दिवसाला करते.

प्रणालीने सायकलिंगची तयारी कशी केली?

प्रणालीला लहानपणापासून सायकलिंगची आवड आहे. तिने या मोठ्या प्रवासाचा सरावही अनेक महिने केला. तिने काही महिने सायकलवरून दारोदार पेपर टाकण्याचे काम केले आहे. त्यातून आपला सरावही झाला आणि दोन पैसे देखील मिळाले असल्याचे प्रणालीने सांगितले.

प्रणाली हा सायकल प्रवास वैयक्तिक आहे. कुठल्याही शासकीय योजनेतून किंवा संस्थेमार्फत मदत मिळवून ती निघालेली नाही. हा संपूर्ण प्रवास आपण स्वत:च्या जबाबदारीवर करत असल्याचे प्रणाली सांगते. मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे घरून निघतांना पैसे वगैरे घेऊन निघाली नाही. स्वतः कमीत कमी गरजांमध्ये जगण्याचा प्रयत्न करायचा म्हणून, लोकांकडे जे मिळेल ते खायचे आणि जिथे शक्य होईल तिथे रहायेच असे ती सांगते. या प्रवासात आपल्याला लोकांकडून आर्थिक किंवा वस्तूंच्या स्वरुपात मदत मिळाल्याचे ती सांगते. या सहा महिन्यांत अनेक सुखद अनुभव आल्याचेही प्रणाली सांगते. आपल्या या उपक्रमाचे कौतुक होते आहे आणि अनेकांकडून खूप चांगले सहकार्य तसेच प्रतिसाद मिळत असल्याचे प्रणाली सांगते.

सध्या लॉकडाऊन आहे, प्रणालीचा प्रवासही सध्या प्रवास थांबत थांबत सुरु आहे. कोविडच्या नियमांचे पालन करत आपण सर्व खबरदारी घेत आहोत, असेही तिने सांगितले. आतापर्यंतच्या प्रवासात आपल्याला कोणतीही अडचण आली नाही. पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाकडूनही सहकार्य मिळाल्याचे ती सांगते.

आरोग्य जागृतीसोबत प्रणाली आपल्या प्रवासात स्थानिक पर्यावरणाबाबत महत्वाच्या गोष्टींचा अभ्यासही करते आहे. ती स्थानिक परिस्थिती समजून घेण्याचे प्रयत्न करते. तळागाळात जाऊन जल, जंगल व जमीन या विषयांवर काम करणाऱ्या व्यक्तींसी ती चर्चा करते. त्यांच्या भूमिका जाणून घेण्याचे काम ती करते.

प्रणालीने 6 संकल्पांचे आवाहन

ज्या निर्धाराने प्रणाली निघाली आहे, त्यासाठी तिने जनतेलाही संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.

1. वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी शक्य असतील ती सर्व सायकलने करा

2. प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळावा. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बाटली सोबत ठेवा.

3. आपल्या परिसरात झाडे लावा आणि झावे जगवा.

4. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवूया.

5. पाण्याची बचत आणि पाणी जमिनीत जिरेल यासाठींच्या कामांमध्ये सहभागी व्हा

सध्याच्या आधुनिक काळात महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न वेगाने होत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा संदेश प्रणाली आपल्या कार्यातून देत आहे. पुढच्या प्रवासासाठी प्रणालीला शुभेच्छा

Updated : 29 April 2021 1:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top