Top
Home > मॅक्स रिपोर्ट > गावाच्या हितासाठी संसारही पणाला लावणारी सरपंच

गावाच्या हितासाठी संसारही पणाला लावणारी सरपंच

पत्नी नामधारी आणि पती कारभारी असा प्रकार ग्रामपंचायतींमध्ये कायम दिसतो. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावात एका सरपंच महिलेने गावाच्या हितासाठी आपला संसार पणाला लावल्याचा प्रकार घडला आहे. पाहा आमचे प्रतिनिधी कौस्तुभ खातू यांचा स्पेशल रिपोर्ट....

गावाच्या हितासाठी संसारही पणाला लावणारी सरपंच
X

महिलांना आरक्षण दिल्यानंतर कारभारात त्यांचा सहभाग वाढेल हा हेतू होता. पण अजूनही ग्रामीण भागाचा विचार केला तर सरपंच महिला असेल तर तिच्याऐवजी पतीच कारभारी असल्याचे दिसते. अशी अनेक उदाहरणे आपण ऐकतो आणि पाहतो. पण ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंच असलेल्या पतीने घेतलेल्या एका निर्णयाला त्याच ग्रामपंचायतीमध्ये सदस्य असलेल्या त्यांच्या पत्नीने विरोध करत थेट वकील गाठल्याचा प्रकार घडला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली गावाच्या सरपंच स्नेहा कारेकर यांनी कारभार हातात घेतल्यानंतर गावाच्या विकासाच्या दृष्टीने नियोजन केले. पर्यटन, बागायती शेती व भात शेती हाच इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय. पण रोजगारासाठी गावातील तरुणांचे मोट्या प्रमाणात स्थलांतर ही इथली प्रमुख समस्या होती. गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी बीचवर हॉटेलसाठी परवानग्या दिल्या. तसेच विविध उद्योगांसाठी बचतगटांच्या माध्यमातून परवानगी दिली. त्याच प्रमाणे गावातील महिलांना ही रोजगार मिळावा यासाठी त्यांनी जास्तीत जास्त बचतगट स्थापन करून बीचवर पर्यटकांच्या सोयीसाठी कपडे बदलण्याची सोय, स्नानगृह, बचतगटाचे पदार्थ विकण्यासाठी स्टॉल उभारण्यास मदत केली. याच गावात आणखी एक समस्या होती ती म्हणजे अनेक पर्यटकांचा इथल्या समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. स्नेहा कारेकर यांनी यावर उपाय म्हणून जास्तीत जास्त समुद्री खेळ उदाहरणार्थ स्कुबा डायविंग स्पीड बोट इत्यादी खेळ सुरू केले. विशेष म्हणजे यात त्यांनी जास्तीत जास्त महिलांना स्कुबा डायव्हिगचे प्रशिक्षण दिले. याचा फायदा असा झाला की पाण्यात खोलवर जाणाऱ्या पर्यटकांवर या महिला स्कुबा ड्रायव्हर ठेवतात. त्यामुळे पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

गावासाठी संसार लावला डावावर

स्नेहा कारेकर या सध्या गावच्या सरपंच आहेत. तर त्यांचे पती ग्रामपंचायत सदस्य आहेत. पण याआधीच्या टर्मला त्यांचे पती सरपंच होते आणि स्नेहा या ग्रामपंचायत सदस्य होत्या. त्यावेळी गावाच्या हितासाठी एका जीआरमधील काही अटी बाजूला ठेवून काम पुढे नेण्याचा निर्णय त्यांच्या पतीने घेतला. पण जीआरप्रमाणेच काम केले पाहिजे असा आग्रह स्नेहा यांनी धरला होता. अखेर वाद खूप विकोपाला गेला. अखेर दोघांनी वकिल गाठला आणि यावर काय मार्ग काढता येईल याची त्यांनी विचारणा केली. वकिलांच्या सल्ल्यानंतर या वादावर तोडगा निघाला आणि स्नेहा यांचा संसार मोडता मोडता वाचला. आज दोघेही आधीचा वाद विसरुन एकत्रितपणे गावाच्या हितासाठी काम करत आहेत. कर्तव्यदक्ष पत्नीला जर पतीने आपला अहं बाजूला ठेवून साथ दिली तर कितीतरी लोकांचा फायदा होऊ शकतो हेच स्नेहा यांच्या या कार्यावरुन दिसते.

Updated : 2021-02-23T12:32:27+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top