Home > मॅक्स रिपोर्ट > वेळेत अँम्ब्युलन्स न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

वेळेत अँम्ब्युलन्स न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

सर्पदंश झाल्यानंतरही एका महिलेचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. पण सरकारी हलगर्जीपणामुळे त्या महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचा आरोप होतो आहे.

वेळेत अँम्ब्युलन्स न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
X

कोरोना संकटाच्या काळात राज्यातील आरोग्य व्यवस्थेने उत्तम काम केले असा दावा सरकार करत असते. पण ग्रामीण भागात अजूनही आरोग्य सेवा खरंच प्रत्येकाला मिळते का असा सवाल कायम उपस्थित होत असतो. हा सवाल उपस्थित होतो कारण अशा घटना घडत असतात. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. अश्विनी कदम असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कदम कुटुंबीयांनी लावून धरली आहे. न्यायासाठी मृत महिलेचा मुलगा प्रदीप अशोक कदम व रोशन कदम सोमवार दिनांक 7 डिसेंबरपासून पाली प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर उपोषणाला बसले आहेत.

प्रकरण नेमके काय आहे?

सुधागड तालुक्यातील उद्धर येथील महिला अश्विनी अशोक कदम यांना दि.१५ नोव्हेंबर रोजी शेतात काम करत असताना सर्पदंश झाला. त्यांना उपचारासाठी तात्काळ पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रुती मोरे यांनी वेळेत उपचार केले नाहीत, असा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांनी केला. दरम्यान अश्विनी कदम यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. पण पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची १०८ नंबरची रुग्णवाहिका वेळेत निघू शकली नाही. कारण या अँम्ब्युलन्समध्ये डॉक्टर नसल्याने ड्रायव्हरने निघण्यास नकार दिल्याचा आरोप या महिलेचे कुटुंबिय करत आहेत. या गोंधळात सदर महिलेला प्रकृती गंभीर असतानाही अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात एक ते दीड तास उशिरा पाठविण्यात आली. परंतु अलिबाग येथे पोहचेपर्यंत जास्त उशीर झाल्याने त्या महिलेचा अंत झाला, असा आरोप तिचे कुटुंबीय करत आहेत. या घटनेला पाली प्राथमिक केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रुती मोरे व अँम्ब्युलन्स चालक जबाबदार असल्याचे मृत महिलेचा मुलगा प्रदीप कदम व उद्धर ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सर्पमित्रांचे म्हणणे काय?

दरम्यान सर्पमित्र तुषार केळकर यांनी महिलेला विषारी सर्पाने दंश केला असल्याने तातडीने उपचार मिळणे गरजेचे होते असे मत व्यक्त केले.

कदम कुटुंबियांचे उपोषण

आपल्या आईला मरणोत्तर न्याय मिळावा अशी अपेक्षा प्रदीप कदम यांनी व्यक्त केलीय. सर्पदंश झालेल्या अश्विनी कदम यांना जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले तेव्हा कामावर असलेल्या डॉक्टर व वाहनचालक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी कदम कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कदम कुटुंबीयांनी केली आहे. सुधागड तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ व गलथान कारभाराने आजवर अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. अजून किती निष्पाप जीवांचे ही यंत्रणा बळी घेणार असा संतप्त सवाल उपस्थित करत सुधागड रिपाइंच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन देखील आरोग्य प्रशासनाने दिले होते. या घटनेला दोन आठवडे उलटून गेले आहेत. परंतु संबंधितांवर कोणतीही कारवाई न झाल्याने मयत महिलेचा मुलगा व उद्धर ग्रामस्थांनी संविधानिक व शांततेच्या मार्गाने आमरण सुरू केले आहे. या प्रकरणातील दोषींवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण स्थगित करणार नसल्याचे यावेळी उपोषणकर्ते प्रदीप कदम , रोशन कदम यांनी सांगितले.

दरम्यान या प्रकरणाची प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने उपोषणकर्ते व रिपाइं पदाधिकारी व ग्रामस्थांनी साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत मढवी यांना दिले आहे.

दरम्यान उपोषणकर्त्यांना पाली सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार, पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे , सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत मढवी यांनी भेट घेऊन चर्चा केली. उपोषणकर्त्यांच्या प्रश्नावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे व रुग्णवाहिका प्रशासनातील अधिकारी यांनी भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र समाधान न झाल्याने उपोषणकर्ते यांनी चौथ्या दिवशीही आपले उपोषण सुरूच ठेवले.

प्रशासनाचे म्हणणे काय?

यासंदर्भात सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत मढवी यांनी सांगितले की, "उद्धर येथील सर्पदंश झालेल्या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर रुग्णास अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पाली प्राथमिक केंद्राची १०८ रुग्णवाहिका काहीवेळ उशिरा आली. परंतु तिच्यामधूनच अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. परंतु तेथे एक दोन तासात महिलेचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे, या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल."

सर्पदंश झाल्यावर काय करावे?

यानिमित्ताने सर्पदंश झाल्यास काय करावे याबाबतही जागरुक असणे आवश्यतक आहे, असे वाटते. सापाने चावा घेतला म्हआणजे मृत्यूत अटळ आहे असा समज असल्याने अनेकजण त्या धास्तीनेच मरतात. वेळेत योग्य उपचार झाले तर विषारी साप चावला तरी जीव वाचू शकतो. त्यामुळेच सर्पदंशानंतर प्रथमोपचार महत्त्वाचे ठरतात. सगळ्यात आधी सर्पदंश झाला तर घाबरुन जावू नये. सर्पदंश झालेल्या माणसाला मानसिकदृष्ट्या भक्कम राहता येईल असा आधार द्यावा. रुग्णाला एका जागी बसवावे. सर्पदंश झालेला शरीराचा भाग ह्रदयाच्या खालच्या पातळीवर ठेवण्यास सांगावे. जखम सगळ्यात आधी जंतुनाशकाने स्वच्छ करावी. सर्पदंश झालेल्या भागाच्या वर आणि खाली पट्टी बांधावी पण घट्ट बांधू नये.

एकूणच या प्रकरणाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सुविधा आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबतची नियमालीची कडक अंमलबाजवणी होणे गरजेचे आहे असे दिसते. रुग्णवाहिका आहे पण डॉक्टर नाही असे होत असेल तर रुग्णाची जीव गेल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे ग्रामीण आरोग्य धोरणात योग्ये ते बदल करुन जनताभिमुख धोरण राबवले जाणे गरजेचे आहे.

- धम्मशील सावंत

Updated : 10 Dec 2020 2:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top