Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : दरड कोसळल्याने संपर्क तुटलेल्या गावात मॅक्स महाराष्ट्र

Ground Report : दरड कोसळल्याने संपर्क तुटलेल्या गावात मॅक्स महाराष्ट्र

राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुर्गम भागातही दरड कोसळून काही गावांचा संपर्क तुटला आहे. जिथे अजून शासकीय यंत्रणा पोहोचली नाही अशा एका गावात मॅक्स महाराष्ट्रने जाऊन तिथली भीषण परिस्थिती टीपली आहे. आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांचा Ground Report

Ground Report :  दरड कोसळल्याने संपर्क तुटलेल्या गावात मॅक्स महाराष्ट्र
X

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. सातारा, रायगड, रत्नागिरी, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडला. यानंतर महापूर भूस्खलन यासारख्या आपत्तींना तेथील नागरिकांना सामोरे जावे लागले. महाडमधील तळीये गावावर दरड कोसळून ८४ जणांचा बळी गेला.

अशाच एका संकटातून सातारा जिल्ह्यातील बाजे नावाचे गाव वाचले आहे. गेल्या 20 दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. यामुळे झालेल्या भूस्खलनातून हे गाव थोडक्यात वाचले आहे.



हे गाव कोयनानगरपासून 12 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलामध्ये कोयना धरणाच्या बॅक वॉटरजवळ वसलेले आहे. गावाच्या वरच्या बाजूला सह्याद्रीचा डोंगर आणि खालल्या बाजूला कोयना धरणाचे विस्तीर्ण जलाशय....यामुळे या गावावर भूस्खलनाची टांगती तलवार कायम असते. आठवडभरापूर्वी झालेल्या मुसळधार पावसात काळ्या कुट्ट अंधारात सर्वजण जीव मुठीत घेऊन बसले होते. मध्यरात्री भली मोठी दरड गावाच्या जवळूनच शेजारी कोसळली. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मध्यरात्री डोंगराचा काही भाग कोसळल्याचा आवाज झाला आणि सर्वांची झोपच उडाली.

आपण उद्याची सकाळ पाहणार याची चिंता गावातील प्रत्येकाला वाटू लागली. पण नागरिकांनी जीव मुठीत धरुन रात्र काढली. त्यानंतर कसे तरी प्रशासनाच्या मदतीने कोयना धरणाच्या अंतर्गत जलमार्गाने कोयनानगर या ठिकाणी त्यांना स्थलांतरीत करण्यात आले. या गावाला जाणारा रस्ता सध्या बंद आहे. या गावापर्यंत पोहोचण्यासाठी गुडघाभर चिखलातून जावे लागते. इथंपर्यंत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी पोहोचले.



ज्यावेळी कोयना धरण झाले तेव्हा, या गावांचे पुनर्वसन केले जाईल, असे सांगितले गेले होते. त्र आजतागायत अनेक दशकांनंतरही या गावातील लोकांचे पुनर्वसन झालेले नाही. तालुका भौगोलिकदृष्ट्या अतिशय दुर्गम आहे. यामुळे विभागातील 90% गावं ही कड्यांखाली वसलेली आहेत. त्यातील बहुतेक गावे ही धोकादायक परिस्थितीचा सामना करत आहेत. यापैकीच एक बाजे (वरसरकून) गावं आहे. यंदाच्या पावसात या तालुक्यामध्ये मोठी मनुष्य हानी झाली आहे. आंबेघर, मिरगाव, ढोकावळे. हुंबरळी या गावात भुस्खलन होऊन गावांतील काही घरांवर दरडही कोसळली. मोठी आर्थिक आणि जीवितहानी तसेच पशुधनाचीही हानी झाली आहे.



या गावांमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामेदेखील झालेले नाहीत. तसेच मदत या ठिकाणी पोहोचलेली नसल्याचे वास्तव मॅक्स महाराष्ट्राच्या या रिपोर्टमध्ये उघड झाले आहे.

Updated : 6 Aug 2021 5:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top