Home > मॅक्स रिपोर्ट > Special Report : जलसंधारणामुळे जेव्हा अख्ख्या गावाचा कायापालट होतो...

Special Report : जलसंधारणामुळे जेव्हा अख्ख्या गावाचा कायापालट होतो...

एखाद्या गावाचा विकास करायचा असेल आणि तिथल्या लोकांच्या जीवनमानात सुधारणा करायची असेल तर सरकारी योजनांशिवाय पर्याय नाही, असे मानले जाते. पण सांगली जिल्ह्यातील एका गावाने सरकारची वाट न पाहता स्वत: मार्ग शोधला आणि यातून गावाचा विकास तर झालाच पण रोजगासाठी स्थलांतर करणारी कुटुंबही आता तिथेच स्थिरावली आहेत. सागर गोतपागर यांचा स्पेशल रिपोर्ट....

Special Report : जलसंधारणामुळे जेव्हा अख्ख्या गावाचा कायापालट होतो...
X


"ऊसतोडी म्हणजे लय बेकार धंदा हाय. पोरं एकीकड आम्ही एकीकड? त्यांच्या जेवणाची परवड? ते शाळेत जात्यात का न्हाय हे पण कळत न्हाय. आम्ही उसाच्या पाल्यात. हि आमच्या जगण्याची तऱ्हा हुती. पण आमच हे जगणं बदाललं. लोक दगडात देव बघत्यात पण शाळेतला हा मास्तर आमच्यासाठी माणसातला देव म्हणून धावून आला".

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कूलाळवाडी या गावातील मोहन गुळदगड यांची हि प्रतिक्रिया आहे. ते उसाच्या हंगामात आपल्या कुटुंबाला घेऊन ऊस पट्ट्यातील भागात ऊस तोडीसाठी स्थलांतरित व्हायचे. पण त्यांच्या गावात गेल्या काही वर्षात जलसंधारणाची कामे झाले. गावात पाणलोट उपचार करण्यात आले. यामुळे गावात खालावलेली पाण्याची पातळी वाढली. आटलेल्या विहिरी पुन्हा काठोकाठ भरल्या. यातून मोहन गुळदगड यांनी मिरची, भेंडी यासह इतर भाज्यांची शेती केली. यासाठी त्यांनी पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास करून शेततळे उभे केले. या तळ्यातून सायपण पद्धतीने ते विजेशिवाय शेती करत आहेत. त्यानी पिकवलेल्या मिरच्या आता स्वतः बाजारात नेऊन ते विकत आहेत. ज्या खांद्यावर ते उसाच्या मोळ्या वाहायचे त्या खांद्यावरून ते स्वतः पिकवलेल्या मिरच्या नेत आहेत.

या गावातील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक भक्तराज गर्जे यांच्या पुढाकाराने गावाने जलसंधारणाच्या कामास सुरवात केली. पाणी फाउंडेशन मार्फत भक्तराज गर्जे प्रकाश माळी दहा विद्यार्थ्यांसह प्रशिक्षणाला गेले.प्रशिक्षण घेऊन गावातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी या कामात सक्रीय सहभाग नोंदवला. यानुसार सलग ४५ दिवस सलग श्रमदान केले. समतल चर खोदने, लहान बंधारे बांधणे यासारखी कामे केली. पाणी फौंडेशन तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून या गावाने तब्बल २ लाख ३० हजार घनमीटर पाणलोट उपचार केले. सलग तीन वर्षे या गावाचा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत नंबर आला. गावाला आठ लाख रुपयाचे बक्षीस देखील मिळाले.

प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही नागरिकांचा मोठा प्रतिसाद. श्रमदानासाठी शेळी विकली.

घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असताना देखील अनेक नागरिकांनी सलग श्रमदान केले. याबाबत मोहन गुळदगड सांगतात " घरी फक्त झोपायला जायचो. रोजगाराला जात नव्हतो. वीस दिवसानंतर घरात काहींही अन्न धान्य शिल्लक नव्हते. मी सरांना फोन करून एक दिवस श्रमदान करण्यास येत नसल्याचे सांगितले. कारण विचारल्यावर सांगितले कि घरात काहीही नाही. पुढचा महिना अजून श्रमदान करायचा आहे. त्यासाठी मी माझी शेळी विकायला बाजारात जात आहे".

या शिक्षकाने दोन वर्षे उन्हाळ्याची सुट्टी देखील घेतली नाही.

या कामासाठी भक्तराज गर्जे यांनी सलग दोन वर्षे उन्हाळ्याची सुट्टी देखील घेतली नाही. कि घरातील कोणत्या कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहिले नाहीत.

या सर्व कामाचा परिणाम म्हणून आज या गावातील विहिरी, ओढे, तसेच लहान ओघळ पाण्याने भरून वाहत आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची शेती करत आहेत. डाळिंब, ऊस, मका, मिरची, भेंडी याची लागवड या गावात होत आहे.

ज्या गावात केवळ अडीजशे एकर शेती केवळ खरीप हंगामात पिकायची त्या गावात आज सहाशे हेक्टर शेती पिकत आहे. यामध्ये खरीपाबरोबरच रब्बी हंगाम देखील शेतकरी करत आहेत. काही शेतकरी बारमाही शेती करत आहेत. गावात दुध डेअरी सुरु झाली आहे. ऊस तोड करणाऱ्या कुटुंबांचे स्थलांतर पूर्णपणे थांबलेले आहे.

संतोष माने याचे आई वडील तोडीला जायचे. गावात पाणी उपलब्ध झाल्याने मुबलक चाऱ्याचे उत्पादन होऊ लागले. यातून त्याने वडिलांना गाई घेऊन द्यायला सांगितल्या. या एका गायीच्या आज त्याने दहा गाई केल्या आहेत. दुधाच्या उत्पादनावर आज त्याचे कुटुंब इतके स्वावलंबी झाले आहे कि आज त्याच्या कुटुंबाला ऊस तोडीसाठी स्थलांतरित व्हावे लागत नाही.

कार्तिक या विद्यार्थ्याची कहाणी देखील तशीच आहे. गावात पाणी नसल्याने पूर्वी लावलेली डाळींबाची बाग वाळून चालली होती. आई वडील ऊस तोडीला गेले असताना छोट्या कार्तिकने या बागेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. गावात जल उपचार झाल्याने पाणी पातळी वाढली. कार्तिकच्या विहिरीला देखील पाणी आले. त्यातून त्याने गेलेली बाग पुन्हा पुनर्जीवित केली. एका वर्षात या बागेतून तब्बल तीन लाखाचे उत्पादन त्याने घेतले. यामुळे यावर्षी ऊस तोडीला जाण्याची गरजच त्याचा कुटुंबाला राहिली नाही. कोयता घेऊन वनवन फिरणारे त्याचे वडील आज स्वतःच्या बागेत फिरत आहेत. कुटुंबाची फरफट थांबल्याने हे कुटुंब आता सुखी आयुष्य जगत आहे.

एका शिक्षकाच्या पुढाकाराने आज हे गाव स्वयंपूर्ण होण्याचे दिशेने वाटचाल करत आहे. लोकांचा लोकांचा पुढाकार शासनाचा सहभाग असल्यानंतर काय होऊ शकते हि गोष्ट कुलाळवाडी या गावाने जगापुढे सिद्ध केलं आहे. या गावाच्या जिद्दीचा आकाशाकडे झेपावणारा आलेख महाराष्ट्रातील इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे....

Updated : 22 Sep 2022 3:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top