Home > मॅक्स रिपोर्ट > धक्कादायक : चक्क शौचालय चोरी झाल्याची तक्रार...

धक्कादायक : चक्क शौचालय चोरी झाल्याची तक्रार...

कागदावरच्या विहिरी हरवल्याच्या अनेक तक्रारी आपण ऐकल्या असतील पाहिल्या असतील....पण एखादं शौचालयच चोरीला गेल्याचे कधी ऐकले आहे का, नाही ना...पण हे असे घडले आहे....पाहा आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांचा ग्राऊंड रिपोर्ट

धक्कादायक : चक्क शौचालय चोरी झाल्याची तक्रार...
X

मकरंद अनासपुरे यांच्या "जाऊ तिथे खाऊ" या चित्रपटलाही लाजवेल अशी घटना बुलडाणा जिल्ह्यातील झाडेगाव या गावात उघडकीस आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे, इतकंच की चित्रपटात विहीर गायब झाली होती इकडे चक्क शौचालयच गायब झालंय... या बाबतीत माध्यमांनी गायब झालेल्या शौचालयाबद्दल ग्रामसेवकाला विचारणा केली तर त्यांनी सार्वजनिक शौचालय दाखवून माध्यमांची देखील दिशाभूल केली आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगावाचे एकनाथ सोळंके हे लोहार काम करतात, पाल टाकून काम मिळेल त्या गावात शेतीची लोखंडी अवजारे बनवतात. त्याच्यावरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, झाडेगावात यांना घरंच नाही, म्हणून रस्त्यावर पाल टाकून काही दिवस काढायचे आणि मग कामाच्या शोधात दुसऱ्या गावाला जायचं, असं त्यांचे सुरू असतं. काही दिवसांपूर्वी यांना गावातील नागरिकांकडून कळलं की यांच्या नावावर शौचालय मागितलं गेले आणि त्याचे पैसेही बँकेतून परस्पर काढून घेतले, म्हणून एकनाथ सोळंके यांनी ग्रामसेवकाला व सरपंचांना विचारणा केली असता, त्यांनी चक्क तुझं शौचालय बांधलं असून तू त्याचा वापर का करत नाही...? म्हणून धमकावलं....आता मंडळी या एकनाथरावांना घरंच नाही तर मग ग्रामसेवकाने व सरपंचाने यांचे शौचालय बांधलं कुठे...? आता याबाबतीत सोळंके यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

या बाबतीत गावातील काही ग्रामपंचायत सदस्य व वरिष्ठ नागरिकांकडून माहिती घेतली असता, एकनाथ सोळंके यांचे या गावात घरंच नाही. लाभ दिलेल्या व्यक्तीला पैसे बँक खात्यात जमा करावे असा नियम असताना या व्यक्तीच्या नावे शौचालय दाखवून व न बांधताच परस्पर, सरपंच व ग्रामसेवकाने पैसे बँकेतून बेरर चेकच्या माध्यमातून काढून घेतल्याचा आरोप होतो आहे.

या संपूर्ण प्रकारच्या बाबतीत घर आणि शौचालयाबद्दल विचारलं असता...महिला सरपंच मंगला चोपडे कॅमेरासमोर बोलायलाच तयार नाहीत, तर त्यांचे पती मध्येच विषयाला बगल देताना आढळले... नंतर ग्रामसेवकाला विचारलं असता... सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली...सदर एकनाथ सोळंके यांचे स्वतःच या गावात घर नाही , त्यांनी शौचालयाची मागणी देखील केली नाही व तसा अर्ज देखील त्यांनी दिला नसल्याचं विचारताच ग्रामसेवकाची पाचावर धारण बसली. त्याने आमच्या प्रतिनिधीला शौचालय बांधलं असून मी तुम्हाला ते दाखवतो म्हणून चक्क एक किमी दूर असलेलं सार्वजनिक शौचालय दाखवलं व ते एकनाथ सोळंके यांचे असल्याचं सांगितलं... बरं हे शौचालय गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बंदच असल्याचं दिसलं...

असे गावातील अनेकांच्या बाबतीत घडलं असल्याचं गावातील नागरिक सांगतात... या बाबतीत आम्ही पुणे येथे ट्रेनिंगसाठी गेलेले जळगाव जामोदचे गटविकास अधिकारी भारसाखळे यांना विचारलं असता त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करू अशी माहिती फोनवरून दिली. या सर्व प्रकारची चौकशी व्हावी आणि शौचालय चोरणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी हीच माफक अपेक्षा...

Updated : 26 Dec 2021 8:42 AM GMT
Next Story
Share it
Top