Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी अडत्या का महत्वाचा आहे?

Ground Report : पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी अडत्या का महत्वाचा आहे?

पंजाबमध्ये अडत्यांच्या कार्यालयांवर ED चे छापे टाकले जात आहेत. त्यामुळे पंजाबचे अडते व्यापारी चांगलेच चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अडते संपवण्याची भाषा करत आहेत. तर पंजाबचा अडत्या संपला तर अर्थव्यवस्या धोक्यात येईल,असा इशारा शेतकरी मोदी सरकारला देत आहेत. पंजाबच्या शेतक-याला अडत्या इतका महत्त्वाचा का वाटतो? वाचा मॅक्समहाराष्ट्र चा स्पेशल रिपोर्ट

Ground Report : पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी अडत्या का महत्वाचा आहे?
X

दिल्ली येथे सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. शेतकरी दररोज आंदोलनांचे वेगवेगळे हत्यार वापरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सरकार साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. पंजाबच्या अर्थव्यवस्थेचं क्रेडिट कार्ड समजल्या जाणा-या अडत्यांमागे आता मोदी सरकार इडी सोडणार असल्याची चर्चा आहे. पंजाबमध्ये अडत्या इतका महत्त्वाचा का आहे? मोदी सरकारला अडत्यांच्या मागे इडी अस्त्र सोडण्याची का गरज पडली. पंजाबच्या अर्थव्यवस्थेत अडत्यांची भूमिका काय आहे? या संदर्भात आम्ही शेतकरी आणि तज्ज्ञांची मत जाणून घेतली.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अडते संपवण्याची भाषा करत आहे. मात्र, शेतकरी 'अडत्या संपला की पंजाबचा शेतकरी संपला' असं म्हणत आहे. त्यामुळे पंजाब हरियाणामधील शेतकऱ्यांसाठी अडते इतके का महत्वाचे आहे? यावर कृषी अभ्यासक सुनील तांबे यांच्याशी आम्ही बातचीत केली.

पंजाबमधील शेतीमध्ये अडत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाचू काय आहे. त्याचं कारण ते सांगतात...

१. पंजाबमध्ये जवळपास ९७ टक्के सिंचन आहे. यात निम्म्याहून अधिक बोअरवेल किंवा ट्यूबवेलचे सिंचन आहे.

२. पंजाबमध्ये जगातील सगळ्यात जास्त सुपिक जमिनीचे पट्टे आहेत.

३. पंजाबमध्ये २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास ६५ टक्के आहे. म्हणजेच पंजाबमध्ये अल्पभूधारक शेतक-यांची संख्या कमी आहे.

पंजाबमध्ये बहुतेक शेतकरी जाट आणि शीख आहेत. यामुळे पंजाबमधल्या शेतकऱ्यांमध्ये आपल्याला एकोपा दिसतो. पंजाबमध्ये सुपीक जमीन असल्यामुळे तेथील उत्पादकता अव्वल आहे. तसेच ५ हजार किलो गहू एका हेक्टरमध्ये होत असून राजस्थानात याची उत्पादकता ३ हजार किलो आहे. यावरुन पंजाबमध्ये उत्पादकतेचे प्रमाण सर्वाधिक आहे हे दिसते.

अडत्यांची रक्कम कशी मोजली जाते?

यावर्षी गव्हाची आधारभूत किंमत १९२४ रुपये प्रति क्विंटल होती. पंजाबमध्ये यंदा या आधारभूत किंमतीत जवळपास १२७ लाख टन गहू पंजाबमधून अन्न महामंडळाने खरेदी केला. ही संपूर्ण खरेदी परवानाधारक कमिशन एजंट म्हणजेच अडत्यांमार्फत करण्यात आली. त्यांना पंजाब मंडी बोर्डाच्या कायद्यानुसार अडीच टक्के कमिशन देणं हे बंधनकारक आहे. यावर्षी या खरेदी-विक्रीमधून या अडत्यांना ६१०.९७ कोटी रुपये कमिशन मिळालं आहे.

आता तुम्ही म्हणाल ही रक्कम मोठी आहे. ही बंद व्हायला हवी. मात्र, हे सगळं गणित पाहता पंजाबमधील अडत्यांची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. पंजाबमध्ये धान्य खरेदीसाठी २७ हजार अडते कार्यरत आहेत. पंजाबमध्ये सध्या २ हजार २०० (मंडी)बाजारपेठा आहेत. पंजाब मंडी बोर्डात जेव्हा गहू विकण्यासाठी येतो. त्यावेळी तो गाडीतून बाहेर काढण्याचे काम अडत्यांनी नेमलेले मजूर करत असतात. गहू साफ केल्यानंतर या गव्हाच्या पोत्यांचे ढिग लावले जातात आणि त्यांचा लिलाव केला जातो. हा लिलाव अन्न महामंडळाच्या अंतर्गत होत असतो. त्यानंतर त्या गव्हाचे वजन करणे व तो पोत्यांमध्ये भरणे हे काम अडत्यांच्या अंतर्गत होत असतात.

पंजाबमध्ये अडत्यांची संख्या २७ हजार आहे. या २७ हजार अडत्यांच्या अंतर्गत काम करणारे क्लार्क हे जवळपास १लाख असून मजुरांची संख्या १० लाखांच्या आसपास आहे. अडत्यांना मिळणाऱ्या पैशांतून या सगळ्यांना रोजंदारी दिली जाते. म्हणजे पंजाबमध्ये अडत्यांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. अडत्यांच्या हाताखाली काम करणारा बहुतांश कामगार हा उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेला असतो.

पंजाबमधले 'अडते' नेमके काय काम करतात?

पंजाबमधील अडते हे शेतक-यांसाठी एटीएम प्रमाणे काम करतात. पंजाबमध्ये शेतीला ५० टक्क्यांहून अधिक पैसा अडत्यांमार्फत दिला जातो, आता हे असं का आहे प्रश्न रिझर्व बँक ऑफ इंडियाला विचारायला हवा?

या सगळ्यात शेतकरी कर्जासाठी बँकांकडे का जात नाहीत तर अडते शेतकऱ्यांसाठी एटीएमसारखे काम करतात. शेतकऱ्याला कोणत्याही वेळी अडते पैसे देतात आणि बँकांकडे ही सरळ-सोपी सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी बँकांऐवजी अडत्यांकडे जातात. पंजाबमधल्या शेतीकारणात अडत्यांची भूमिरा खूप महत्वाची मानली जाते. शेतकरी बँकांकडे कर्ज घ्यायला का जात नाही? याचा अभ्यास आरबीआयने केला पाहिजे आणि त्यावर तोडगा काढल्यास अडत्यांवर कुठेतरी शह बसेल, असं मत कृषी अभ्यासक सुनील तांबे यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केले आहे.

या संदर्भात आम्ही पंजाबमधील जय किसान आंदोलनाचे नेते गुर्बक सिंह यांच्याशी बातचीत केली...तेव्हा त्यांनी सांगितले की, "शेतकरी आपला माल अडत्याला विकतो. अडते माल बाजार समितीत नेऊन विकतात. शेतक-याला पैसा बाजार समिती नाही तर अडत्या देतो. अडत्या पंजाबमध्ये शेतक-याला रात्री जरी घरात कोणी आजारी असेल, घरात लग्नकार्य असेल यासाठी पैसा देतो. शेतक-यांवर बँकेचं कर्ज असले तरी अडत्या शेतक-याला पिकावर कर्ज देतो. जर अडत्या संपला तर शेतकरी संपून जाईल. तो त्याच्या घरातील व्यवहार कसा करणार? त्याच्या मुलीचं लग्न कसे करणार?"

शेतकरी बँकांकडून कर्ज का घेत नाही? यावर गुर्बक सिंह सांगतात... "शेतक-यांचे इतकं शिक्षण झालेलं नाही. त्याला अडत्यावर जास्त विश्वास आहे. बँकांमध्ये अर्ध्या रात्री गेले तर पैसे मिळतील का? असा सवाल गुर्बक सिंह उपस्थित करतात. त्यानंतर आम्ही पंजाबच्या हुशारपूर जिल्ह्यातून आंदोलनात सहभागी शेतकरी नवज्योत सिंह तानी यांच्याशी बातचीत केली... "अडत्या शेतक-यांचे एटीएम आहे. शेतक-यांचे पीक ६ महिन्यांनी येते. त्यामुळे शेतक-याला मध्येच पैशाची गरज पडली तर त्याने कुठे जायचं? त्यामुळे शेतक-याला जेव्हा पैशाची गरज असते, घरात लग्न आहे. घरात पैशाची अडचण आहे. तेव्हा शेतकरी अडत्याकडे जातो. एक प्रकारे अडत्या आमच्या घरातील सदस्य आहे."

बॅंकेकडून का पैसे घेत नाही? असा सवाल केला असता नवज्योत सिंह सांगतात... " पहिली गोष्ट बॅंक लवकर कर्ज देत नाही. दिले तर हे कागदपत्रं द्या, हे द्या. मात्र अडत्यांचे तसे नसते. पीक आले की तो पैसा कापून घेतो. बँकांचं काय मोठ्या प्रमाणात बॅंका बुडत आहेत."

बिजिंदर सिंह हे शेतकरी सांगतात... "आमचा अडत्या दलाल नाही. तो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. हे सरकार अडत्याचा चुकीचा प्रचार करत आहे. आम्हाला शेतीची कोणतीही उपकरणं घ्यायची असतील तर आम्हाला अडत्या मदत करतो. अडत्या आमचे पैसै बुडवू शतक नाही. आम्ही अडत्याला पकडून पैसे वसूल करू. या व्यापा-याचं काय करणार? " असा सवाल बिजिंदर सिंह यांनी उपस्थित केला आहे.

एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यवस्थेमधील दलाल, अडते संपवण्याचे भाषा करत असले तरी त्यांना पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. पंजाबधील अडते संपले तर पंजाबमधील ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात येणार आहे. त्यामुळे मोदींच्या या निर्णयाने ज्याप्रमाणे नोटाबंदी मध्ये काळा पैसा बाहेर तर आला नाही मात्र, अर्थव्यवस्था धोक्यात आली. त्याचप्रमाणे अडते संपवता संपवता पंजाबची अर्थव्यवस्था धोक्यात येईल.

Updated : 23 Dec 2020 1:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top