Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : पारध्यांच्या पालाभोवती व्यवस्थेचे फासे, 'गुन्हेगार' कोण?

Ground Report : पारध्यांच्या पालाभोवती व्यवस्थेचे फासे, 'गुन्हेगार' कोण?

गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजाच्या यातना आजही संपण्यास तयार नाहीत. बदलत्या काळानुसार हा समाज कष्ट करुन आपल्या मुला-बाळांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे, पण आपल्याला व्यवस्था मुख्य प्रवाहात का येऊ देत नाही असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांना असा प्रश्न का पडला आहे याचे उत्तर शोधणारा सागर गोतपागर यांचा ग्राऊंड

Ground Report : पारध्यांच्या पालाभोवती व्यवस्थेचे फासे,  गुन्हेगार कोण?
X

"माझी मुलं आजारी पडली. म्हणून मी त्यांना तासगावला दवाखान्यात घेऊन गेले. तिकडून परत आल्यावर पाहते तर माझी झोपडी जळून खाक झाली होती. घरातील कपडे, धान्य आणि संसारातील सर्व वस्तूंची राख झाली होती. अंगावरल्या कपड्यावर आता आम्ही तासगाव येथे माझ्या बापाजवळ राहत आहे."

काखेत मुल घेतलेली समीना जगनु पवार हिने मॅक्स महाराष्ट्रकडे आपली व्यथा मांडली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे सहा महिन्यांपासून काही पारधी कुटुंबे वनविभागाच्या जागेत झोपडी बांधून राहत होते. यामध्ये समीना आणि जगनु या दांपत्याची एक झोपडी होती. आपल्या याच झोपडीच्या मागे समीनाने वांग्याची, कोथिंबिरीची परसबाग लावली होती. तिचा नवरा जगनु हा या परिसरात द्राक्ष बागेची छाटणी तसेच इतर मजुरीची कामे करत होता. भटकंती करणाऱ्या या पारधी समुदायाची ही कुटुंबे सावर्डे गावाच्या परिसरात स्थिर स्थावर होत होती. याच दरम्यान त्यांच्या झोपड्या अज्ञातांनी उध्वस्त केल्या. जगनू सांगतो " आम्ही वनखात्याच्या जागेत झोपड बांधून राहिलो होतो. त्या खात्याने आम्हाला आजपर्यंत कधी आडकाठी केली नाही. लॉकडाऊन (Lock down) मुळे जागरण, गोंधळ तमाशाचे कार्यक्रम बंद झाले कसेबसे पोराबाळांना या झोपडीत जगवत होतो तोपर्यंत आमचे झोपडेच जाळण्यात आले."

पारधी कुटुंबांची ही झोपडी कुणी जाळली असतील याचा अंदाज घेण्यासाठी आम्ही गावात फिरून काही गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. तेव्हा वेगळीच गोष्ट समजली. गावातील काही नागरिक सांगत होते की गावात पारधी राहायला आल्यापासून चोऱ्या व्हायला लागल्या. एकाने गावात म्हैस चोरीला गेल्याचे सांगितले. आणखी एकाने एका महिलेची गळ्यातील दागिने नेल्याचे सांगितले. चौकशी केल्यावर माहिती समजली की ती म्हैस दुसऱ्याच एकाने नेली होती. ती सदर मालकाला मिळाली आहे. त्यांच्या पालाशेजारी असलेल्या एका गावकऱ्याला आम्ही त्यांच्याबद्दल विचारलं ते म्हणतात " एवढे दिवस होते पण आमच्या कशाला त्यांनी हात लावला नाही. शेवटी त्यांचे पोट हाय ते लाव्हा मारून खायचे शिकार करायचे पण आम्हाला कधी त्यांनी त्रास दिला नाही."

कालच तासगाव तालुक्यात चैन snatching करणाऱ्या टोळीला तासगाव पोलिसांनी पकडले आहे. जेथे अशा घटना घडतात ते पहिल्यांदा पारध्यांवर संशय घेतात. अशा घटनांमध्ये अन्य गुन्हेगारी टोळ्या तालुक्यात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे.

यावर चरण पवार सांगतात " सायेब आम्ही चोऱ्याच करत असतो तर आज हेलिकॉप्टरन फिरलो असतो. आमच्या कपाळावर सरकारने मारलेला शिक्का पुसायला तयार नाही. कुठ जरी चुरी झाली की पुलीस पहिल्यांदा आमच्या पालात घुसतात. आम्ही हे धंदे कधीच सोडले आहेत. पण समाज आमच्यावर विश्वास ठीवायला तयार नाही. कुणी गुन्हेगार सापडत नसला तर आमच्या तरुण पोरांना गुन्ह्यात गोवण्यात येतं. मुख्य गुन्हेगार बाजूलाच राहतो. आम्ही यातून बाहेर पडलो आहोत. सरकारने आम्हाला राहायला जीमिन खायला रोटी घालायला कपडे मिळतील एवढी व्यवस्था करावी. आयुष्यभर वणवण फिरून आता आम्हाला स्थिर व्हायचं आहे."

एका पारधी कुटुंबाचं झोपड जाळलं गेलं, डी वाय एस पी म्हणतात आम्हाला माहीत नाही

झोपडी जळल्यानंतर समीना यांनी याची तक्रार तहसीलदार तासगाव, पोलीस निरीक्षक तासगाव यांच्याकडे केली आहे. परंतु अद्याप पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला नाही. यासंदर्भात तासगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्याशी संपर्क केला असता सदर घटना त्यांना माहीत नाही, माहिती घेते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. इतकी संवेदनशील घटना घडून देखील हे पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नाही. यावरून या समुदायाप्रती हे अधिकारी किती संवेदनशील आहेत हे दिसून येते.

पीडितांचे लवकरच पुनर्वसन करणार- तहसीलदार कल्पना ढवळे

पीडित कुटुंबाचे लवकरच पुनर्वसन करणार असल्याचे तासगाव तहसीलदार कल्पना ढवळे यांनी सांगितले. यावेळी पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचा आदेश दिला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पारधी कुटुंबातील काही लोकांनी शेळ्या पाळल्या आहेत. यातील काहींची मुले शाळेत देखील जात आहेत. मोल मजुरी करून स्थिर स्थावर होणाऱ्या या फासे पारधी समाजाच्या भोवती लावलेला गुन्हेगारीचा फास मात्र समाज काढायला तयार नाही. या फास्यात या समुदायाच्या कित्येक पिढ्या शिक्षण आरोग्य भौतिक सुविधांपासून शेकडो मैल दूर राहिलेल्या आहेत. शासकीय जागांमध्ये या समुदायाचे पुनर्वसन करण्याची शासकीय योजना आहे मात्र ती कागदावरच असल्याचे दिसून येते.


स्वातंत्र्यपूर्व काळापासून पारधी हा समुदाय लढाऊ म्हणून ओळखला जातो. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. यानंतर इंग्रजांनी त्यांच्यावर १८७१ ला गुन्हेगारी जमात असा शिक्का मारला. त्यांना दररोज हजेरी द्यावी लागे. देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू(pandit neharu) यांनी ३१ ऑगस्ट १९५२ ला हा शिक्का कायद्याने पुसून टाकला. परंतु आजपर्यंत समाज आणि पोलीस प्रशासन या समुदायाकडे गुन्हेगारी नजरेतून पाहत असते. कुठेही चोरी झाली की पहिल्यांदा पारध्याच्या पालाची तपासणी होते. पारधी समुदायाच्या ५४ जमाती आज अस्तित्वात आहेत. यातील १७५ पोट जमाती आहेत. २०११ जनगणनेनुसार २,१५,९५० इतकी या समुदायाची लोकसंख्या आहे. फासे पारधी(fase paradhi), राजपूत पारधी,लंगोट पारधी,मांग पारधी, शिकज पारधी, गाय पारधी, भिल पारधी,राज पारधी, अशा जमाती देशभर आहेत.

चरण उर्फ चरण्या पवार हे सांगतात "कुठबी चोरी हू द्या पुलिस आमच्या पालात घुसणार पोरांना बडवणार. हा जुलूम आमी आयुष्यभर सहन केला. आम्ही चोर आसतो तर आज आमच्या हवेल्या उभ्या राहिल्या असत्या. आम्ही चोर असतो तर आज आम्ही झोपड्यात कसे असतो? आमचे पुनर्वसन सरकारने करावे" अशी मागणी ते करतात.

याच दरम्यान पारधी समुदायातील एक महिला पुढे येते आणि म्हणते सायेब ज्या गावात आम्ही जातो तेथील लोकं सांगतात येथे राहायचे नाही. सरकारी जागेत राहिलो तर सायेब लोक हाटकतात कुठेच राहू दिलं जात नाही मग आम्ही कुठ हवेच्या वर राहायचं का ? आमी ढगात राहायचं का ?

आम्ही ढगात राहायचं का हा पारधी महिलेचा सवाल हा या व्यवस्थेला आहे. या सरकारला आहे. या देशाला आहे. मतदार यादीत नाव नसलेले, आधार (Adhar card)कार्ड नसलेले, रेशन कार्ड( retion card) नसलेले असंख्य पारधी नागरीक या देशात आहेत. कागदावरच्या सोयी सुविधा अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत.

Updated : 2021-09-11T21:06:22+05:30
Next Story
Share it
Top