Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : उघड्यावरील कचरा डेपो, शहराचे आरोग्य धोक्यात

Ground Report : उघड्यावरील कचरा डेपो, शहराचे आरोग्य धोक्यात

एखाद्या शहराचे आरोग्य हे तेथील सार्वजनिक स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. पण स्थानिक स्वराज्य संस्थेने या सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर काय परिणाम होतात हे सांगणारा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Ground Report : उघड्यावरील कचरा डेपो, शहराचे आरोग्य धोक्यात
X

कोरोना संकटाची तीव्रता सध्या कमी झाली आहे. पण अजूनही धोका कमी झालेला नाही, असे तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. गेल्या पावणे दोन वर्षात कोरोनाने १ लाखाच्यावर बळी घेतले आहेत. कोरोनाच्या या काळात इतर आजारांबाबत मात्र दुर्लक्ष झाल्याने काही अहवाल देखील आले आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बहुतांश रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याने इतर आजारांचे रुग्णच येत नव्हते किंवा इतर आजारांच्या रुग्णांकडे लक्ष दिले गेले नाही, असे सांगितले जाते. त्यातच आता कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती कमी झालेली असल्याने त्यांना इतर आजारांचा देखील धोका असतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कोरोनामुळे आरोग्याच्या प्रश्नाकडे नव्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली. सार्वजनिक स्वच्छतेचा मुद्दा हा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची असते. पण बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करताना दिसतात. असेच एक उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात समोर आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषदेच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या कचरा डेपोला कोणतेही कंपाऊंड नाहीये, इथे मृत प्राणी देखील सर्रासपणे टाकून दिले जात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास कचरा डेपोच्या आजूबाजू राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मोहोळ नगर परिषदेचा कचरा डेपो उघड्यावर असून त्याचा आमच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आम्हाला जेवण देखील जात नाहीये, त्यामुळे नगर परिषदेने या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी अथवा कचरा डेपो येथून हटवावा अशी मागणी या कचरा डेपोच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.


कचरा डेपोला वॉल कंपाऊंडच नाही

मोहोळ शहरापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर कचरा डेपो आहे. कचरा डेपो घाटणे गावाच्या रस्त्यावर असून या गावच्या हद्दीतील गावकरी आणि शेतकऱ्यांना याचा गेल्या अनेक दिवसांपासून त्रास होत आहे. आमच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष देत नाही, आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.या कचरा डेपोचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश डोके यांच्याकडे केली आहे. कचरा डेपोची निर्मिती करत असताना त्यासाठी डेपोच्या चहूबाजूने भिंतीचे वॉल कंपाऊंड करणे गरजेचे होते. पण कंपाउंड नसल्याने कचरा वाऱ्याने उडून जातो. कचरा डेपोच्या आसपास राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात कचरा जात असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवरही झाला आहे. या कचरा डेपोमुळे डाळींबाची बाग उध्वस्त झाली असल्याचे कचरा डेपोच्या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले.

मेलेली जनावरे व मांस टाकले जाते उघड्यावर

मोहोळ शहरात मटण विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. दररोज हजारो रुपयांची उलाढाल होते. विक्रीसाठी कापलेल्या कोंबड्या व बोकडांचे टाकाऊ अवयव कचरा डेपोमध्ये उघड्यावर टाकले जातात. नगर परिषदेकडून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात मेलेली कुत्री, मांजरे, डुक्कर आणि इतर जनावरे या कचरा डेपोत टाकली जात आहेत. त्यामुळे त्याची दुर्गंधी सुटून त्याचा परिणामही आपल्या आरोग्यावर झाला आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.


कचरा डेपोत खाण्यासाठी उघड्यावर फेकलेले मांस असल्याने या परिसरात सतत कुत्र्यांची गर्दी असते. कुत्र्यांना मांस खाण्याची सवय लागली आहे. त्यामुळे डेपोच्या आसपास असणाऱ्या वस्तीवरील शेळ्यांवर या कुत्र्यांनी हल्ला करून काही शेळ्यांना ठार मारल्याचेही प्रकार घडल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त मोहोळ नगर परिषदेने वेळीच करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि उद्योगांमुळे कचरा डेपो पडतोय अपुरा

मोहोळ शहर सोलापूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. इथून सोलापूर अवघे ३५ किलोमीटरवर आहे. मोहोळ शहरातून सोलापूर शहरात नोकरी, कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या शहरापासून पंढरपूर ४५ किलोमीटर आहे. तर याच शहरातून विजापूरला जाणारा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे येथे हॉटेल व्यवसाय व इतर उद्योग-धंदे वाढले आहेत. या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहराचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचा भार घाटणे रोडच्या कचरा डेपोवर पडत आहे. शहरात उद्योग-धंदे, हॉस्पिटल, हॉटेल व्यवसाय वाढल्याने यातून बाहेर पडणारा कचरा डेपोत टाकला जातो. या टाकलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नसल्याने कचरा पडून राहतो आणि त्यातून दुर्गंधी सुटते. या दुर्गंधीवर नगर परिषदेने उपाय योजना कराव्या अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत.


कचरा डेपोमधील धुरामुळे अपघात

कचरा डेपोत कचरा जाळला जात असून या कचरा डेपोच्या मध्यभागातून घाटणे या गावाला रस्ता जातो. त्यामुळे या गावातील नागरीकांसह शेतकऱ्यांची या रस्त्यावरून नेहमीच वर्दळ असते. धुराचे लोट जास्त प्रमाणात असल्याने समोरून-येणारी व जाणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत १० ते १२ जणांचे अपघात या कचरा डेपोच्या धुरामुळे झाले असून अनेकजण जखमी झाले असल्याचे स्थानिक शेतकरी संजय देशमुख यांनी सांगितले.

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले की, "मोहोळ शहरातील घाटणे रस्त्यावर कचरा डेपो असून कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येते. या कचरा डेपोच्या आसपास ३० ते ४० शेतकरी कुटुंबे राहत आहेत. त्या कुटूंबांना याचा त्रास होत आहे. कचरा डेपोतील कचऱ्याचा नगर परिषदेने वेळीच बंदोबस्त न केल्यास नगर परिषदेच्या कार्यालयाला कुलूप लावून मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारू" असा इशारा दिला आहे.


यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी अरुण पाथरुटकर यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,

"साठलेल्या कचऱ्यावरील डास व माशांमुळे सर्वच विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजार होतात. त्यामध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकणगुनिया, निमोनिया यासारख्या आजारांचा समावेश आहे. कचरा जास्त दिवस जमिनीवर राहिल्यास त्याचा परिणाम जमिनीवर होत नाही. परंतु कचरा जास्त दिवस एका ठिकाणी साठवून ठेवला जाऊ शकत नाही. त्या कचऱ्याची विल्हेवाट मशीनच्या सहाय्याने लावायला हवी. कचरा जाळून टाकायला पाहिजे."


नगर परिषदेचे म्हणणे काय?

यासंदर्भात मुख्याधिकारी योगेश डोके यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, "कचरा डेपोच्या वॉल कंपाऊंडचे काम मंजूर झाले असून लवकरच कामाला सुरूवात केली जाईल. शेतकरी संघटनेने आम्हाला निवेदन दिले असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. कचरा डेपोमुळे कुत्री व मृत जनावरांचा लोकांना त्रास होत आहे. तो कमी करण्यासाठी नगर परिषद मृत जनावरे पुरण्याचे काम करेल. २ ते ४ दिवसात त्याची व्यवस्था केली जाईल. जो कचरा आहे त्याच्यावर बायो कल्चरल टाकले जाईल. त्यामुळे लोकांना होणारा दुर्गंधीचा त्रास कमी होईल."

असे आश्वासन आता नगरपरिषद देत आहे, पण ते प्रत्यक्षात येण्याची गरज आहे, अन्यथा कोरोनाचे संकट कायम असतानाच इतर आजारांचा धोका शहरातील प्रत्येक नागरिकाला होण्याची भीती आहे.

Updated : 30 Oct 2021 8:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top