Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : ३ किमी रस्त्यासाठी ९ कोटी खर्च, रस्त्यावरील डांबर मात्र गायब

Ground Report : ३ किमी रस्त्यासाठी ९ कोटी खर्च, रस्त्यावरील डांबर मात्र गायब

पालघर : जनतेला पायाभूत सोयी -सुविधा पुरवणे ही सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी....पण याच पायाभूत सुविधांच्या नावाने पैसा फस्त केला जातो, तेव्हा नेमके काय होते, याची रस्त्यावरील परिस्थिती मांडणारा रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट

Ground Report : ३ किमी रस्त्यासाठी ९ कोटी खर्च, रस्त्यावरील डांबर मात्र गायब
X

जनतेला पायाभूत सोयी-सुविधा पुरवणे ही सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी....पण याच पायाभूत सुविधांच्या नावाने पैसा फस्त केला जातो, तेव्हा नेमके काय होते, याची रस्त्यावरील परिस्थिती मांडणारा रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट…

मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभागात एक धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. विकासाच्या नावाखाली ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने राजरोसपणे भ्रष्टाचार केल्याचा आरोप येथील युवा आदिवासी कार्यकर्ता चंदर गायकवाड यांनी केला आहे. मोखाडा तालुत्यातील घानवळ ते बदल्याचा पाडा या ३ किलोमीटरच्या रस्त्यावर गेल्यावर्षी ९ कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण या रस्त्याची आता दूरवस्था झाल्याचे दिसते. यातही अर्धा किलोमीटर रस्त्यावर डांबरच पडलेले नाही, असाही आरोप इथले गावकरी करत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च नेमका केला कुठे..? असा सवाल विचारला जात आहे.






या रस्ताच्या दूरवस्थेमुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना तसेच शाळकरी मुलं, वृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्याचबरोबर धुळीचा सामना करावा लागत असल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यासुद्धा निर्माण झाल्या आहेत. या रस्त्याच्या दूरवस्थेबाबत येथील नागरिकांनी अनेक वेळा आवाज उठवला आहे. सार्वजनिक बांधकामम विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे या भागातील गावकरी सांगतात. पण त्यांच्या तक्रारींचा ना अधिकाऱ्यांनी दखल घेतली ना लोकप्रतिनिधींनी....

त्यामुळे आता इथले लोक संतापले असून तात्काळ नवीन रस्ता तयार करा, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून, एजन्सीला काळया यादीत समाविष्ट करा, अन्यथा 28 तारखेपासून मोखाडा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा, येथील युवा आदिवासी कार्यकर्ता चंदर गायकवाड यांनी दिला आहे. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अहिरराव यांच्याशी संपर्क साधला तेव्हा सोमवारी माहिती घेऊ एवढीच प्रतिक्रिया दिली.

दूरवस्था झालेला हा रस्ता पेठ हरसूलकडे जाणारा पर्याय रस्ता आहे. यामुळे गुजरात-नाशिकडे जाणाऱ्या लोकांना आणि हरसूल पेठ येथील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी येजा या रस्त्यावरून असते. पण या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.




या गावात केवळ एकच महिना एसटी पोहोचली आहे. आता मात्र नवीन रस्त्याच्या दूरवस्थेमुळे येथे एसटी बंद करण्यात आली आहे. यामुळे शाळकरी मुले, वृद्ध व्यक्ती तसेच तालुक्याच्या मुख्यालयाला विविध शासकीय कामांसाठी येजा करणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

रात्री-अपरात्री पावसाळ्यात आरोग्याची समस्या उदभवल्यास पेशंटला वेळेत दवाखान्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच प्रसंगी आम्ही अनेक पेशंटना लाकडाची डोली करून दवाखान्यात पोहोचवले असल्याचा अनुभव येथील गावकऱ्यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितला. एवढेच नाही तर वेळेत दवाखान्यात पोहचवता न आल्याने अनेक पेशंट दगावले असल्याचेही येथील गावकऱ्यांनी सांगितले.






Ground Report : ३ किमी रस्त्यासाठी ९ कोटी खर्च, रस्त्यावरील डांबर मात्र गायब?देशाचा मूळनिवासी असलेल्या आदिवासी समाजाची स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटूनही प्रगती झालेली नाही. आजही येथील आदिवासी बांधवाना कुपोषण, बेरोजगारी, आरोग्य, वीज, पाणी आदीच्या समस्या भेडसावत आहेत. आजही स्थानिक पातळीवर रोजगार नसल्याने कोसोदूर स्थलांतरित व्हावे लागते. दरवर्षी आदिवासींच्या विकासासाठी कोट्यवदी रुपयांची तरदूत केली जाते. परंतु येथील आदिवासींचा विकास होत नाही, बोगस कामांच्या नावाखाली अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपये ठेकेदारांच्या घश्यात घातले जात आहेत. यामुळे आदिवासींच्या विकासाचे खरे मारेकरी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Updated : 19 March 2022 10:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top