Home > मॅक्स रिपोर्ट > Raigad | रायगडातील 20 गावांचे होणार पुनर्वसन

Raigad | रायगडातील 20 गावांचे होणार पुनर्वसन

प्रस्ताव सादर करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना

Raigad | रायगडातील 20 गावांचे होणार पुनर्वसन
X

रायगड जिल्ह्यातील अतिधोकादायक 20 गावातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे. परंतु पुढील धोका लक्षात घेता या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे प्रस्ताव तयार करुन ते राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यामुळे येथील २७ जणांचा मृत्यू झाला. ५७ जणांना बेपत्ता म्हणून जाहीर करण्यात आले. या गावचे चौक येथे पुर्वसन करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर जिल्ह्यातील दरडप्रवण असलेल्या अतिधोकादायक 20 गावांचेदेखील कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.रायगड जिल्ह्यातील अतिधोकादायक २० गावांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने स्थानिक अधिकार्‍यांना दिल्या असल्याची माहिती निवासी उपजिल्हधिकारी संदेश शिर्के, रायगड यांनी दिली.

तळीये येथे 2021 साली झालेल्या दरड दुर्घटनेनंतर जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या भुवैज्ञानिकांमार्फत जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील १०३ गावे दरडप्रवण क्षेत्रात असल्याची बाब समोर आली होती. यात २० गावांना दरडींचा अतिधोका असल्याचे नमूद करण्यात आले होते.

इर्शाळवाडीतील घटनेनंतर या २० गावांमधील लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे. प्रत्येक गावांसाठी एक नोडल ऑफीसरची नियुक्ती करण्यात आली आहे. वावा, आमशेत, लोअर तुडील, टोळ खुर्द, शिंगारकोड मोरेवाडी, आंबिवली बुदृक पटेरेवाडी (महाड), सुभाषनगर (खालापूर) अतिधोकादायक गावे आहत. मुद्रे बुद्रूक, कोंडीवते, बागमांडले, कोंडवी मराठवाडी, कोतवाल खर्द, मुठावली, तिसे, सोनघर, चांढवे खुर्द, वालुंजवाडी, सव, रोहण, कोथेरी जंगमवाडी (सर्व तालुका महाड) धोकादायक गावे आहेत.

Updated : 27 July 2023 8:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top