भाजपवर सुडाच्या राजकारणाचा आरोप

419

महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचा मुलगा राहुल लोणीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली म्हणून आपल्या घरावर तालुका उपनिबांधक यांनी छापे मारले असल्याचा आरोप बळीराम कडपे यांनी केलाय. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये बळीराम कडपे यांनी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यतल्या आष्टी जिल्हा परिषद मतदार संघातून राहुल लोणीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

निवडणुकांचा निकाल लागून 15 दिवस होण्याच्या आतच 9 मार्च रोजी गुरुवारी बाळासाहेब कडपे यांच्या घरी तालुका उपनिबांधक यांनी छापे मारले. सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार आलेल्या तक्रारीवरून परतूर आणि रायगव्हान इथल्या घरी छापे मारण्यात आले. या सगळ्या धाडी राजकीय हेतूने प्रेरित असून बबनराव लोणीकर यांच्या आदेशानेच या धाडी टाकण्यात आल्या असल्याचा आरोप बाळासाहेब कडपे यांनी केलाय.

जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार ऐन भरात असताना काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नावाने पैसे वाटणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन राहुल लोणीकरांसह बबनराव लोणीकर आणि पर्यायाने भाजपची मानहानी झाली होती. पण निवडणूक निकालानंतर राहुल लोणीकर तब्बल 5 हजाराच्या मताधिक्यांने निवडून आले. पण कार्यकर्त्यांना पकडून देणे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होणे हा अपमान लोणीकर पचवू शकले नसावेत त्यामुळे बदला घेण्यासाठी भाजप आणि बबनराव लोणीकर हे सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोपही करण्यात येतोय.

 

उपनिबधक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी बाळासाहेब कडपे यांच्या घरातून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्याची तपासणी केल्यानंतर पुढील कारवाही करण्यात येईल असं एक प्रेस नोट काढून जाहीर केलंय. पण कधी नव्हे ते या निवडणुकीनंतरच उपनिबांधकांनी छापे का मारले? भाजप आता सत्तेच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करतंय का? असे सवाल सध्या उपास्थित केले जातायत.

भाजपकडून आमचा सूड घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण अश्या कुठल्याही कारवाईने आम्ही घाबरत नाही. या पुढच्या काळातही आम्ही लोकशाही मार्गाने लढा देत राहू असं बाळासाहेब कडपे यांनी सांगितलंय. याबाबत ‘मॅक्स महाराष्ट्र’ने बबवराव लोणीकर आणि राहुल लोणीकर यांच्याशी उपलब्ध असलेल्या दोन्ही नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

  • दत्ता कानवटे