Home > मॅक्स किसान > बीड जिल्ह्यात अकरा महिन्यात 161 शेतकऱ्यांनी संपवले जीवन

बीड जिल्ह्यात अकरा महिन्यात 161 शेतकऱ्यांनी संपवले जीवन

बीड जिल्ह्यात अकरा महिन्यात 161 शेतकऱ्यांनी संपवले जीवन
X

कर्जबाजारीपणा, सततची नापिकी यामुळं नैराशेच्या गर्द छायेत असणारा शेतकरी, मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असून, विदर्भानंतर मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा आता मोठा आहे. गेल्या अकरा महिन्यात बीड जिल्ह्यात 161 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या ह्या बीड जिल्ह्यात होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे .

बळीराजाची उपमा ज्याला दिली जाते, आज तो शेतकरीराजा बैलाचा कासरा, आपल्या गळ्याशी लावून आपली जीवन यात्रा क्षणात संपवत आहे. निसर्गापाठोपाठ मानवी सावकारकीच्या जाळ्यात, मराठवाड्यातील शेतकरी भरडला जात आहे. मुलांचे शिक्षण, शेतातील बी-बियाणे, खत, फवारणी, मुलीचं लग्न, दवाखान्यासाठी सावकाराकडून घेतलेलं कर्ज, त्याला लावलं जाणारं अव्वाच्या सव्वा व्याज, यावरून शेतातील नापिकी , यामुळे शेतकरीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे . मात्र, खरंच याची जाण समाजातील लोकप्रतिनिधींना आहे का ? तर याच उत्तर नाही हेच असेल. पिकांच्या नुकसानी दरम्यान, केवळ बातमी पुरतं शेतात जाऊन पाहणी करून, शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नाहीत, त्यासाठी शेतकऱ्यांसाठी योग्य बाजारपेठ निर्माण करण्याची गरज आहे. जिथं शेतकऱ्यांच्या घामाचे चीज, पिकांना दिल्या जाणाऱ्या भावातून दिसून येईल .

आज शेतकरी आत्महत्या का करतात ? याचा विचार करणं गरजेचं आहे . त्याचे कारणं शोधून त्यावर उपाययोजना करणं काळाची गरजेचे आहे. आज शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. एक वेळस पोटच्या मुलाला एखादी वस्तू न देणारा बळीराजा, आपल्या शेतातील पिकांना वेळेवर खत, खुरपणी ,फवारणी करतो , आणि त्याच पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या शेतमालाला हे सरकार कवडीमोल भाव देतय, हे दुर्दैव म्हणावं लागेल. रात्रीच्या काळोखाला न जुमानता शेताच्या बांधावर रात्रभर दारे धरणाऱ्या शेतकऱ्यांचा आज सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे . केवळ निवडणुकांपुरत "वोट बँक" म्हणून आणखीन किती दिवस शेतकऱ्यांचा वापर होणार? हे आज शेतकऱ्यांच्या मुलांनी समजून घेण्याची गरज आहे. प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांसाठी आश्वासनांचा पाऊस पडला जातो. परंतु त्या पाऊसाचा एक थेंब तरी शेतकऱ्यांपर्यंत पोहचतो का? हा विचार करणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिकविम्यासाठी शेकडो रुपये खर्च केले, त्या शेतकऱ्यांना हे सरकार एक रुपया देतंय. म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास, हे सरकार भाग पाडतंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणूनच की काय, बीड जिल्ह्यातील तब्बल 161 शेतकऱ्यांनी, अकरा महिन्यात आत्महत्या केल्या आहेत .

मराठवाड्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत झाली आहे . त्यातच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती परवडत नाही . गेल्या दहा वर्षांपासून मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या . पूर्वी विदर्भात आकडा मोठा होता मात्र आता मराठवाड्याचा आलेख उंचावत असल्याने दिसून येऊ लागला आहे . राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत . या अकरा महिन्याच्या कार्यकाळात मराठवाड्यात 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यातील 161 शेतकऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे .

बीड जिल्ह्यात आज एक खासदार डॉ.प्रीतम मुंडे , राज्याच्या ग्रामविकासमंत्री असणाऱ्या आमदार पंकजा मुंडे , राज्याचे विरोधीपक्षनेते आमदार धनंजय मुंडे , आमदार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर , आमदार माजी मंत्री सुरेश धस , आमदार भीमराव धोंडे , आमदार विनायक मेटे , आमदार संगीता ठोंबरे , आमदार आर .टी. देशमुख , आमदार लक्ष्मन पवार असे हे , मातब्बर लोकप्रतिनिधी असतांना देखील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी " कासरा " मिळत आहे . हे दुर्दैवचं म्हणावं लागेल .

Updated : 20 Nov 2018 1:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top