Home > मॅक्स रिपोर्ट > एका ड्रॅगन फ्रुट रोपानं उभारली ड्रॅगन फ्रूटची बाग

एका ड्रॅगन फ्रुट रोपानं उभारली ड्रॅगन फ्रूटची बाग

एका ड्रॅगन फ्रुट रोपानं  उभारली ड्रॅगन फ्रूटची बाग
X

सोलापूर जिल्ह्यात शेतकरी पारंपरिक शेतीला छेद देत असून आपल्या शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग करताना दिसत आहे. बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्यांने ड्रॅगन फ्रुट या झाडाचे एक रोप आणून त्याने आपल्या स्वतःच्या नर्सरीत त्यापासून अनेक रोपे तयार करून ड्रॅगन फ्रुटची बाग तयार केली आहे.त्याच बरोबर या शेतकऱ्यांने खजुराची झाडे लावून त्यापासून खजूर उत्पादित केली आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण शेतीचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांची शेती पाहण्यासाठी विविध भागांतील शेतकरी भेट देऊ लागले आहेत.शेतात विविध प्रयोग करून यशस्वी शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव राजाभाऊ देशमुख असून त्यांची शेती बार्शी तालुक्यातील सौंदरे गावच्या हद्दीत आहे.राजाभाऊ देशमुख यांची शेती बार्शी शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे.त्यांच्या या प्रयोगशील शेतीची सोलापूर जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा आहे.

पंचवीस एकरात खजूर,ड्रॅगन फ्रुट,द्राक्ष,सीताफळ यांची देशमुख यांनी फुलवली शेती

राजाभाऊ देशमुख यांना 25 एकर शेती असून त्यांनी त्यामध्ये अडीज ते तीन एकर खजूर बाग तर चार एकरमध्ये द्राक्ष बागेची लागवड केली आहे.तसेच 7 एकर शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुट या रोपांची लागवड केली आहे तर 10 एकर शेतात सीताफळाच्या 2 वेगवेगळ्या जातीच्या रोपांची लागवड केली आहे. याच बरोबर या फळबागामध्ये आंतरपीक घेतले जात असून त्यामध्ये शेवगा,चिंच यांचा समावेश आहे.देशमुख यांच्या शेतात विहीर असून या विहिरीतून सर्व बागाना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते.प्रत्येक बागाच्या प्लाट मध्ये ठिबक सिंचनाला वेगवेगळे कॉक तयार करण्यात आले आहेत.त्यामुळे शेतांना पाणी देण्यास सोपे जात असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.राजाभाऊ देशमुख यांची ही प्रयोगशील शेती सोलापूर-बार्शी रस्त्यावर,बार्शी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सौंदरे गावच्या परिसरात आहे.या शेतात जाण्यासाठी रस्त्यापासून दीड किलोमीटरचे अंतर पार करावे लागते.देशमुख यांच्या मळ्यात प्रवेश केल्यास सुरुवातीला खजुराची बाग व ड्रॅगन फ्रूटची शेती नजरेस पडते.ड्रॅगन फ्रुटच्या बागेला तारेचे कुंपण केले असून फळे तोडू नये असे फलक लावण्यात आले आहेत.शेताच्या मध्यभागातून ओढा गेला असून या वर्षी पाऊस झाला असल्याने ओढ्याला पाणी आहे.

राजस्थान, गुजरात व वाळवंटी प्रदेशात केली जाणारी खजुराची शेती महाराष्ट्र्रात

राजाभाऊ देशमुख यांचे पुतणे विशाल देशमुख यांनी सांगितले की,खजुराची शेती ही प्रामुख्याने जास्त उष्ण हवामान असलेल्या प्रदेशात व कमी पर्जन्यमान असलेल्या भागात केली जाते.सोलापूर जिल्ह्यात कमी पर्जन्यमान असून या पिकासाठी पोषक वातावरण आहे.असा निष्कर्ष काढून काकांनी 2008 साली शेतात खजुराची लागवड केली.खजुराची लागवड ही बियापासून केली असून या खजुराच्या झाडांना फळे येण्यास 4 ते 5 वर्षाचा कालावधी लागतो.खजुराची झाडे 15 ते 20 फुटापर्यंत वाढली असून या झाडांना जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात फुले येतात.या फुलांचे फळात रूपांतर होऊन जून महिन्यात खजुराची तोडणी केली जाते.या बागेला उन्हाळ्यात थोडेफार पाणी लागते.या झाडांना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी नसले तरी चालते.या झाडांची लागवड 18 बाय 18 वर केली असून या बागेमध्ये शेवगा,सीताफळ याचे आंतरपीक घेतले जात आहे. या बागेला पाणी ठिबक सिंचनाने दिले जात आहे.मार्केट मध्ये खजुराला मागणी असून पुणे व मुंबईच्या मार्केटमध्ये याची विक्री केली जाते.तसेच स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांची खजूराला मागणी असून योग्य भावात खजूर उपलब्ध करून दिला जातो.

ड्रॅगन फ्रुटच्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांची लागवड

ड्रॅगन फ्रुटची 7 एकरात लागवड केली असून त्यामध्ये 3 प्रकारची विविध रोपे आहेत.यामध्ये आलियास व्हाइट हे ड्रॅगन फ्रुट आहे. जे फोडल्यानंतर आतून पांढऱ्या रंगाचे दिसते.तसेच पिंक पर्पल व सी.एम.रेड म्हणून नवीन प्रकारचे ड्रॅगन फ्रुट आहे.त्याचीही लागवड शेतात केली आहे.या ड्रॅगन फ्रुट रोपांची लागवड 12 बाय 8 फुटावर केली आहे.पांढऱ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रुटचा जो प्लाट आहे तो सर्वात जुना म्हणजे 4 ते 5 वर्षापूर्वीचा आहे.त्यांच्यानंतर रेड ड्रॅगन फ्रूटची रोपे हळूहळू वाढवली आहेत. या झाडांना फळे लागली असून याची उत्पादित फळे पुणे आणि मुंबईच्या मार्केटला पाठवली जातात.स्थानिक मार्केटमध्ये आणखीन म्हणावे तसे भाव मिळत नाहीत.पांढऱ्या रंगाचे सर्वात लहान आकार असलेले ड्रॅगन फ्रुट 25 रुपये प्रति किलो विकले जाते तर मोठ्या आकाराचे ड्रॅगन फ्रुट 170 ते 180 रुपये विकले जाते.जे रेड ड्रॅगन फ्रुट आहेत ते 50 रुपये किलोपासून 300 रुपये किलोपर्यंत मार्केटमध्ये विकले जाते.असे शेतकरी विशाल देशमुख यांनी सांगितले.

दहा एकरात सीताफळाची लागवड

देशमुख यांनी 10 एकरात सीताफळांची लागवड केली आहे. यासंबंधी माहिती देताना देशमुख म्हणाले की,सीताफळाच्या दोन जातीच्या झाडांची लागवड केली आहे.त्यामध्ये बाळनगर आणि अनिनाटो यांचा समावेश आहे.या सीताफळाच्या झाडांना जून ते जानेवारी महिन्यापर्यंत पाणी लागत नाही.सीताफळाच्या झाडांना 6 महिने पाणी लागते तर 6 महिने पाणी लागत नाही.सीताफळाच्या झाडांना लागवड केल्यापासून तिसऱ्या ते चौथ्या वर्षांपासून फळ लागायला सुरुवात होते.पाचव्या ते सहाव्या वर्षी एका झाडाला कमीत-कमी 25 किलो सीताफळे निघू शकतात.

बागेतील आंतरपिकांचा शेतकऱ्यांना फायदा होतो

बागेतील आंतरपिकांचा फायदा शेतकऱ्यांना होतो.आम्ही सर्वच बागांमध्ये आंतरपिके घेतली आहेत. बागांचे एखाद्या वर्षी नुकसान किंवा फळ कमी निघाले तर या बागेत असणारे आंतरपीक झालेले नुकसान भरून काढते.त्यामुळे आमच्या सर्वच बागांमध्ये आंतरपीक आहे. ड्रॅगन फ्रुटच्या बागांमध्ये शेवगा आहे.सीताफळाच्या बागांमध्ये पहिल्या तीन वर्षांमध्ये शेवगा होता.त्यानंतर आता या सीताफळाच्या बागांमध्ये आवळा व चिंच आहे.आंतरपिकांचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून सीताफळ हे सहजीवनात वाढणारे झाड आहे. हे झाड वाढत असताना दुसऱ्या झाडांना त्रास देत नाही आणि स्वतः त्रास करून घेत नाही.सिताफळाला कुठल्याही झाडाबरोबर लावले तरीही हे झाड व्यवस्थित वाढते.

पाण्याच्या कमतरतेमुळे फळबागांची केली लागवड

देशमुख यांनी बोलताना सांगितले की,जिल्ह्यात ऊसाची शेती केली जात असताना आमच्याकडे पाण्याची कमतरता आहे.त्यामुळे आम्ही फळबागांकडे वळलो.आमच्या भागात नदी अगर कॅनॉल नाही.आमची शेती सर्व विहीर बागायत आहे. त्यामुळे उसापेक्षा आम्हाला फळबागा चांगल्या वाटतात. उसामध्ये काम करायचे आणि परत पैशासाठी कारखान्याच्या मागे लागावे लागते.पैसे मिळायला परत वर्ष जाणार त्याच्यापेक्षा तुम्ही फळबागा करा स्व:ताच्या मनाने मार्केट करू शकता.पण उसाचे तसे नाही ऊस शेवटी शेतकऱ्यांना कारखान्यालाच द्यावा लागणार आहे आणि कारखान्याच्या मनावर उसाला भाव मिळणार आहे.त्यामुळे आम्ही फळबागांकडे वळलो.

विविध फळबागांची रोपे घरच्या नर्सरीत केली जातात तयार

देशमुख यांच्या शेतात नर्सरी असून त्यामध्ये ड्रॅगन फ्रुट,सीताफळ,खजूर व विविध प्रकारची रोपे तयार केली जात आहेत.याविषयी बोलताना देशमुख यांनी सांगितले की,खजुराची रोपे घरच्या नर्सरीत तयार केली आहेत. ड्रॅगन फ्रुटचे रोप सुरुवातीला काकांनी बाहेरून आणले होते.एका रोपापासून नर्सरीत अनेक रोपे तयार करून ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची लागवड केली आहे. या 25 एकर शेतात दररोज 15 महिला व 8 पुरुष कामगार काम करीत आहेत.या सर्वांबरोबर मी व काका शेतात राबत असतो असे विशाल देशमुख यांनी सांगितले.

फळबागातून वर्षाला एका एकरला मिळतात एक ते दिड लाख रुपये

या फळबागेतून सर्व खर्च जाऊन वर्षाकाठी एका एकरात 1 ते दीड लाख रुपयांचा फायदा होतो.बागांचे किती जरी नुकसान झाले अगर खराब वातावरमुळे फरक पडला तरीही कमीत-कमी 1 ते दीड लाख रुपये मिळतात.प्रत्येक शेतकऱ्याने फळ बागांची लागवड करावी कारण फळबाग वर्षानुवर्षे चालणारी असते.त्यासाठी प्रत्येक वर्षी गुंतवणूक करावी लागत नाही.त्यामुळे फळबाग लागवडीचा शेतकऱ्यांना फायदा होऊन आर्थिक स्थियी सुधारण्यास मदत होते.

Updated : 2 Dec 2021 10:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top