Home > मॅक्स रिपोर्ट > ५० हजार कोटींचे केस...!

५० हजार कोटींचे केस...!

५० हजार कोटींचे केस...!
X

मानवी शरीरातील इतर घटकाप्रमाणे एक अतिशय महत्वाचा घटक म्हणजे केस. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीस पहातो तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्याबरोबर सर्वप्रथम आपणास त्याचे केस नजरेस पडतात. आपण त्या केसांचे वर्णन देखील काळेभोर, लांबसडक, कुरळे, मुलायम, दाट अशी विशेषण वापरून करतो. चेहरा, वर्ण, उंची या प्रमाणेच केस देखील मानवी सौंदर्याचे अविभाज्य भाग आहे. एखादी लांब केस असलेली मुलगी वाटेत जाताना दिसली तर पाहणाऱ्याच्या तोंडातून काय छान लांब केस आहेत असे उदगार सहज पडतात. केसाचे सौंदर्य हे अगदी पुरातन काळापासून आपल्या ग्रंथामधून मांडलेले दिसून येते. अशा केसांना धार्मिक विधीमध्येसुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या केसांना जावळ म्हणतो. पहिल्यांदाच जेव्हा बाळाचे केस काढले जातात त्यावेळेस आपल्याकडे धार्मिक विधी केला जातो आणि त्या विधीला जावळ काढणे म्हणतात आणि त्यासाठी न्हाव्यांना घरी आमंत्रित केले जाते. त्यांचा आदर सत्कार केला जातो. तर मौजिबंधांमध्ये बटूचे केस कापून फक्त शेंडी ठेवली जाते. तर घरातील वडीलधाऱ्यांच्या मृत्यूनंतर केशवपन केले जाते. कधीकाळी कुटुंबातील तरुण मुलांनी केस वाढवले तर बिघडलेल्या तरुणाचे लक्षण मानले जात असे. मुलाचे केस कपाळावर येणे किंवा केसांचा कोंबडा काढणे हा असंस्कृतपणा मानला जात असे. मात्र आता काळ आणि संकल्पना देखील बदलल्या आहेत. केसाची निगा मोठ्या आवडीने आणि निगुतीने प्रत्येकजण करू लागला आहे.

भारतामध्ये फॅशनचा प्रसार प्रामुख्याने हिंदी चित्रपटामधून होताना दिसतो. परंतु याला अपवाद मात्र केस आहेत. केसाच्या नाविन्यपूर्ण फॅशनची चर्चा चार वर्षातून एकदा सजणाऱ्या "फिफा" या जागतिक फुटबॉल स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूच्या केशरचनेची अधिक असते. माध्यमांमधून देखील त्या खेळाडूच्या खेळापेक्षा प्रसिद्धी त्याच्या केसांच्या ठेवणीला मिळते. बातम्यामधून या खेळाडूच्या “हेअर डिझायनर” चे नाव, त्याने आतापर्यंत कुणाचे हेअर डिझाईन केले ते तो किती पैसे घेतो ते त्याची किती दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागतेयाची चर्चा होते. भारतामध्ये सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये केस, केशरचना त्यांची निगा याबाबतीत अधिक सजगता आली आहे.

मुंबईत पूर्वी घरोघरी जाऊन न्हावी केस कापत

पूर्वी मुंबईमध्ये साधारण ६०च्या दशकात घरोघरी न्हावी येत असत. पांढरा सदरा आणि धोतर आणि हातामध्ये पत्र्याची किवा अल्युमिनिअमची विशिष्ट पेटी घेऊन ठराविक दिवसानंतर आपल्या ग्राहकाच्या घरी येत. त्या कुटुंबातील पुरुषांचे एकाच दिवशी केस कापत असत. हा संपूर्ण कार्यक्रम घरातील एखाद्या खोलीत किंवा चाळीच्या सामाईक व्हरांड्यामध्ये होत असे. या साठी ठराविक बिदागी त्यांना मिळायची. या न्हाव्यांचं “स्टेटस”फॅमिली डॉक्टर प्रमाणेच असायचा. मुंबईतील परेल येथे ६० वर्षापेक्षा अधिक काळ सलूनसाठी लागणाऱ्या वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या किशोर गोसार म्हणाले पूर्वी मुंबईमध्ये २००० पेक्षा जास्त पेटी घेऊन दारोदारी फिरणारे न्हावी होते. या सर्वांचे विभाग आणि ग्राहक ठरलेले असत. ठराविक दिवशी ते आपल्या ग्राहकांकडे जात असत. हे व्यावसायिक बहुतेककरून नाभिक समाजाचे असत आणि हा वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालवित होते. मुंबईमध्ये आज फक्त दोनशे ते अडीचशे पेटीवाले आहेत. गेली पन्नास वर्षे हेअर कटिंग करणारे आणि दादर मधील “कुमार सलून” चे सुरेश कुमार सांगतात १९६५ मुंबईमध्ये तेव्हा सलून मध्ये केस कापण्याचा दर १.५० पैसे इतका होता तर १९७७ साली तीन रुपये झाला. १९६५ च्या सुमारास जगभरात हिप्पीच प्रस्थ वाढल होत, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटत होते. साहजिकच त्यावेळच्या तरुणांमध्ये हिप्पी तरुणाप्रमाणे केस वाढवत होते. याचा आमच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. मात्र १९७४ ला ऋषी कपूरचा “बॉबी” सिनेमा आला आणि पुन्हा एकदा आमच्या व्यवसायाला थोडीफार उभारी मिळाली अशी आठवण सुरेश कुमार सांगताना म्हणाले. सत्तरच्या दशकात डॅनी, अमिताभ बच्चन यांच्या केसांची तरुणांमध्ये क्रेझ होती. अशा एकेकाळच्या पारंपारिक भारतामध्ये “हेयर डिझायनर ” हे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये महत्वाचा घटक बनले आहेत. नाभिक समाजापेक्षा इतर समाजातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने येत आहेत. हा एक प्रतिष्ठेचा व्यवसाय झाला आहे असे मुंबईतील एका नामांकित सलूनचे संचालक आणि प्रसिद्ध हेअर डिझायनर विशाल यांनी सांगितले. यावर अधिक माहिती देताना विशाल म्हणाले, १९९१ मध्ये भारताने जागतिकीकरणाची कास धरली. भारतीय मध्यमवर्गीयांकडे पैसे खेळू लागला. खर्च करण्याची क्षमता वाढली.

सिनेमा आणि टीव्ही चॅनेल्समधून फॅशन ची नवीन ओळख होऊ लागली. २००१ मध्ये आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्या "दिल चाहता है" या चित्रपटाने हेअर इंडस्ट्रीला नवसंजीवनी दिली. त्यामध्ये आमिरखान च्या “स्पाईक” चे अनुकरण करण्यासाठी सलूनमध्ये तरुणाची गर्दी वाढू लागली होती. अशी आठवण सांगताना विशाल म्हणाला १९९०-९५ च्या काळात "मशरूम" या एकमेव हेअर कट ची ओळख असणारा भारतीय तरुण स्पाईक, अंडर कट, विराट कोहलीचे फेड इफेक्ट कट अशा लेटेस्ट स्टाईल्स करून घेऊ लागला. तर तरुणींना फ्रीन्ज म्हणजेच साधना कट, आणि नंतरच्या काळात माधुरी दीक्षितचा स्टेप कट एवढीच ओळख होती. मात्र आता कंगना राणावतचा ब्लुण्ट कट, साईड स्विफ्ट, साईड बॅन्ग्स, फ्रंट बॅन्ग्स या हेअर कटची ओळख झाली.

बाळासाहेब ठाकरेंपासून अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या घरी जाऊन केस कापणारे आणि सुमारे ४० वर्षे या व्यवसायात असलेले “शिवा स्टायलो” या सलोनचे शिवकुमार भंडारी सांगतात, “ कला आणि व्यवसाय याच्या बरोबर सलोन ही एक ग्राहकांसाठी ताणताणावातून काही क्षण मुक्त होण्याचे ठिकाण सुद्धा आहे. गेल्या काही वर्षात भारत सर्व बाबतीत बदलत आहे परंतु युरोप, अमेरिकेत ज्या मोकळ्या मनाने कोणत्याही वयोगटातील माणसे फाशीव करतात ते अजूनतरी भारतात होत नाही. काही शे रुपयात सलोनसाठी लागणारी वस्तू विकत घेणारे आज २५ ते ३० हजार रुपये फक्त एका कात्री साठी मोजतात. या व्यवसायात खऱ्या अर्थाने वैश्विकरण झाले आहे. अनेक जाती धर्माचे तरुण-तरुणी या व्यवसायात मालक म्हणून नव्हे तर काम करत आहेत” हा व्यवसाय उत्तरोतर वाढत जाणार असल्याचे शिवा भंडारी यांनी सांगितले. मुंबईसारख्या शहरात सुद्धा “लॅक्मे” व्यतिरिक्त ओळख नसलेल्या मध्यमवर्गाला लॉरिअल , वेल्ला आदी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स भारतात सहज मिळू लागले. कधी काळी केस कापण्यासाठी फक्त ५ रुपये देणारा भारतीय तरुण वर्ग आज १५० रुपये आनंदाने देतो. मुलींच्या केसाला साधारण चारशे ते पाचशे रुपये सहज मोजतात. मुंबई सारख्या शहरामधून सलून मध्ये केस कापण्याबरोबरच पेडिक्यूर, मॅन्यूकर, हेड मसाज, शेविंग असे अनेक गोष्टी केल्या जातात. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात आता मोठ्या संख्येने तरुण मुली येत आहेत. युनिसेक्स सलून मोठ्या प्रमाणात सुरु होत आहेत.

मुंबई सारख्या शहरामधून गेल्या दहा वर्षात सलूनची संख्या पंचवीस टक्क्याहून अधिक वाढली असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. ब्लुन्ट, क्रिमी , ज्यूस, जावेद हबीब , क्रिस्टिअन जॉर्जेओ, टोनी अँड गाय या सारखे आंतरराष्ट्रीय हेअर डिझायनरची सलून भारतामध्ये आली आहेत.

भारतातील ३८ टक्के महिला महिन्यातून दोनदा तर ६१ टक्के पुरुष महिन्यातून एकदा सलूनला भेट देत असल्याची आकडेवारी सांगते. एकूण ग्राहाकापैकी २५ ते ३५ टक्के ग्राहक १८ ते २५ या वयोगटातील तरुण आहेत. वर्षाला सुमारे ५० हजार कोटीचा उलाढाल करणाऱ्या या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात कुशल कारागिरांची गरज असून वर्षाला लक्षावधी रुपये खर्च करून तरुण या संस्थामधून शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत.

अफ्रिकेत भारतीय केसांपासून बनवलेल्या गंगावणांना भरपूर मागणी

भारतीयांचे केस काळे, जाड, लांब आणि थोडसे नागमोडी असल्याने प्रामुख्याने पाश्चिमात्य देशामध्ये या केसांना प्रचंड मागणी आहे. भारतामधून वर्षाला दोन हजार कोटीचे केस परदेशात निर्यात केले जातात. या केसांपासून गंगावन त्याचबरोबरच टोप बनवले जातात. हे केस गोळा करण्यासाठी भारतातील खेडेगावातून काही मध्यस्थ फिरत असतात आणि गरीब, गरजू स्त्रियाकडून केस विकत घेतात. आजही भारतीय खेडेगावात केसांची निगा राखण्यासाठी पारंपारिक तेल वा तत्सम वापरले जातात त्यामुळे अशा रासायनिक विरहित केसांना प्रचंड मागणी आहे.

दक्षिण भारतातील देवळांतून मोठ्या प्रमाणात केस गोळा केले जातात. आपल्याकडे देवाला काहीतरी अर्पण करण्याची प्रथा आहे, नवस बोलण्याची प्रथा आहे. याच प्रथेचा भाग म्हणून दक्षिण भारतात देवाला नवस म्हणून केस अर्पण करण्याची पद्धत आहे. केस मानवी सौंदर्याचा अनमोल भाग असल्याने आपल्याकडील सर्वात अमुल्य ते देवाला अर्पण करणेही त्यामागची श्रद्धा आहे. आपली एखादी इच्छा पूर्ण झाली की भारतातील काही प्रांतातील मुख्यत्वे दक्षिण भारतातील स्त्रिया अगदी विवाहित स्त्रिया देखील देवाला केस अर्पण करतात. आंध्रप्रदेशमधील तिरुपती देवास्थानामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात केस अर्पण केले जातात. तिरुपती देवास्थानामध्ये गेली अनेक वर्षे असे अर्पण केलेले केस विकले जातात. अमेरिका, युरोप तसेच चीन या देशातून मोठ्या प्रमाणात या केसांना मागणी असून यासाठी तिरुपती देवस्थानच्या वतीने रीतसर लिलाव केला जातो. तिरुपती देवस्थानच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार लिलावाची प्रक्रिया भारत सरकारच्या MSTC या कंपनीच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जाते. या लिलावाच्या माध्यमातून वर्षाला साधारणपणे १५० ते २०० कोटीरुपयाची उलाढाल होते. दरदिवशी सुमारे ३५हजार भाविक येथे केस अर्पण करतात आणि त्यातून साधारण ९०० किलो केस तिरुपती देवास्थानामध्ये जमा होतात. एकूण पाच प्रकारामध्ये या केसांचे वर्गीकरण केले जाते. पहिल्या वर्गात अर्थातच लांब केसांना प्राधान्य दिले जाते. ३१ इंच लांब असलेल्या केसांना २५हजार रुपये प्रती किलो इतका दर दिला जातो तर १६ इंच ते ३० इंच लांब असलेल्या केसांना १९ हजार रुपये. त्याखालोखाल १० इंच ते १५ इंच लांब असलेल्या केसांना प्रती किलो ४५०० रुपये तर ५ इंच ते ९ इंच लांब असलेल्या केसांना ३५०० रुपये दर मिळतो आणि सर्वात कमी ५ इंचापेक्षा कमी लांब असलेल्या केसांना फक्त ३१ रुपये प्रती किलो इतका दर आहे. “ग्रे हेअर” म्हणजेच जेष्ठ नागरिकांच्या केसांना देखील प्रती किलो ६ हजार सातशे इतका दर आहे. अर्थात हे दर मागणी आणि पुरवठा या संकल्पनेनुसार बदलत असतात. देवस्थानच्या “कल्याण कट्टा” या विभागातर्फे भाविकांचे केशवपन केले जाते. आणि त्यासाठी १४०० पुरुष आणि २५० स्त्रिया “नायी ब्राह्मण” समाजाच्या नियुक्त केल्या आहेत. देवस्थानतर्फे त्यांची आरोग्य तपासणी केली जाते तसेच या कामासाठी उत्तम दर्जाच्या वस्तू पुरवल्या जातात. सुमारे १५०० कुटुंब या व्यवसायावर अवलंबून असल्याचे देवस्थानतर्फे सांगण्यात आले. गोळा झालेले केस शास्त्रीय पद्धतीने साठवून त्याचा दरमहिन्याला लिलाव केला जातो.

भारतातून सुमारे तीन हजार टन केस दरवर्षी निर्यात केले जातात. चेन्नईमध्ये गंगावन बनवणारे दोनशे कारखाने असून नामिबिया सारख्या देशामधून भारतीय गंगावानाला प्रचंड मागणी आहे.

तरुण वयामध्ये “टक्कल पडणे” ही गंभीर समस्या बनून राहिली आहे. पूर्वी टोप घालणे हा एकमेव उपाय उत्तम होता. त्यातही हे टोप उत्तम दर्जाचे नसत त्यामुळे टोप घातला आहे हे समोरच्या व्यक्तीस सहज लक्षात येत असे. आता मात्र टोप न घालता या समस्येवर “ट्रायकॉलजी” च्या माध्यमातून कायम स्वरूपी उपाय करता येतो असे “रिचफील” या संस्थेचे संस्थापक डॉक्टर अपूर्व शाह यांनी सांगितले. इंग्लडमध्ये १९०२ साली विकसित झालेले हे ट्रायकॉलजी शास्त्र डॉक्टर अपूर्व शाह यांनी भारतात १९८७ साली आणले. त्याच्या माध्यमातून उपचार करण्यास सुरवात केली. तणावपूर्ण जीवनशैलीमुळे तरुण वयात टक्कल पडत असल्याचे डॉक्टर शाह यांचे म्हणणे आहे. टक्कल पडल्याने बाह्यरूपात परिणाम होतो, याच्यामुळे बरेच तरूण आत्मविश्वास गमावतात ही काही प्रमाणात खरे आहे. “ट्रायकॉलजी” मध्ये या समस्येवर बरेच उपचार आहेत. बहुतेक वेळा टक्कल मध्ये किंवा पुढच्या बाजूस पडते आणि बाजूने केसाची झालर असते. अशावेळेस आम्ही शरीरातील इतर अवयवाप्रमाणे केस सुद्धा ट्रान्सप्लांट केले जातात. डोक्याच्या बाजूने असलेल्या केसामधून मुळासकट केस काढून जेथे टक्कल पडले आहे अशा जागी केस प्लान्ट केले जातात. भारतामध्ये या ट्रान्सप्लान्ट करिता साधारण ६०हजार ते १ लाख रुपये खर्च येतो.

-विकास नाईक

Updated : 4 March 2017 5:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top